आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Special Interview With Congress State President A. Balasaheb Thorat By Divya Marathi

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.बाळासाहेब थोरात यांची दिव्य मराठीने घेतलेली विशेष मुलाखत; महाजनादेश काेणाला मिळणार याबाबत ते काय म्हणाले जाणून घ्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘ज्ञानेश्वरीतील पसायदान राज्यघटनेतील उद्देशपत्रिकेत प्रतिबिंंबित झाले आहे. याच शाश्वत तत्त्वज्ञानाशी काँग्रेस पक्ष बांधील आहे. पण विचारांच्या ज्या भांडवलावर आम्ही सत्तेत आलो त्याचाच विसर आम्हाला सत्तेत मश्गूल असताना पडला. त्यामुळे नव्या पिढीची वैचारिक बांधणी करण्यात आम्ही कमी पडलो, हीच आमची मोठी चूक झाली. त्यामुळे निर्माण झालेली विचारांची पोकळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भरून काढली. त्याचा विपरीत परिणाम देशाच्या व पक्षाच्याही राजकारणावर झाला,’ अशी कबुली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना दिली. भाजप सरकारने सर्व आश्वासने फाेल ठरली आहेत. या खाेटारड्या सरकारची आम्ही पाेलखाेल केली असून त्यांचा पराभव अटळ आहे, असा दावाही त्यांनी केला.
 

प्रश्न : ऐन निवडणुकीच्या तोंडावर आपल्याकडे पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद आले आहे. या पदावरून तुम्ही विधानसभा निवडणुकीकडे कसे पाहता?
> थाेरात : सध्याची स्थिती पाहता काँग्रेससमोर आव्हान मोठे आहे, परिस्थिती काहीशी कठीण दिसते आहे हे मी अमान्य करणार नाही. पण त्याची दुसरी बाजू अशी आहे की, लोकसभा आणि विधानसभा या दोन निवडणुकांकडे मतदार वेगवेगळ्या पद्धतीने पाहतात हा इतिहास आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या गुजरातमध्ये भाजपची काय स्थिती झाली हे आपण पाहिले आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानमध्ये तर जनतेने भाजपला साफ नाकारले. लाेकसभेला पुन्हा त्या पक्षाला मतदान केले. याचा अर्थ विधानसभेच्या निवडणुकीत मतदार स्थानिक प्रश्नांवर मतदान करतात. या निवडणुकीतही लोक राज्यातील युती सरकारच्या कारभारावरची नाराजी व्यक्त करतील आणि आमचे सरकार स्थापन होईल, असे चित्र मला दिसते आहे. 
 

प्रश्न : तुमच्या सरकारच्या काळात १५ वर्षांत २० हजार कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी दिले आणि या सरकारने ५ वर्षांत ५० हजार कोटी रुपये दिले, हा मुख्यमंत्र्यांचा दावा मान्य आहे?
> थाेरात : हा दावा सपशेल खोटा आहे. त्यात कुठलाही तथ्यांश नाही. ‘अच्छे दिन आयेंगे, १५ लाख देंगे’ यासारखाच हाही एक जुमला आहे. आमच्या काळात शेतकऱ्यांनाच नाही, मच्छीमारांनी मासे कमी झाले म्हटले तर त्यांनाही मदत दिली गेली होती. त्यामुळे शेतकरी मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवणार नाहीत.
 
 

प्रश्न : मुख्यमंत्री तर सांगताहेत की त्यांच्या सरकारने सर्वोत्तम कामगिरी केल्यामुळे पुन्हा त्यांचेच सरकार येणार आहे. जनादेश त्यांना मिळतो आहे, असा त्यांचा दावा आहे.  
> थाेरात : त्यांच्या दाव्यांना काहीही अर्थ नाही. त्यांची पोलखोल करणारी यात्रा आम्ही काढली आहे आणि त्यांचे दावे किती फोल आहेत हे जनतेला सांगतो आहोत. मुळात सर्वच घटकांत या सरकारच्या कारभाराविषयी प्रचंड नाराजी आहे. राज्याचं आर्थिक गणित पूर्णतः शेतीवर अवलंबून आहे. आज शेतमालाचा दर घसरतो आहे. सरकारने म्हणायला सरसकट कर्जमाफी दिली, प्रत्यक्षात त्यात अटींचा भडिमार आहे. त्यामुळे लाभाचे प्रमाण अत्यल्प आहे. थकबाकी असल्यामुळे यंदा खरिपाचे केवळ २७ टक्केच कर्ज वाटप झालं. शेतमालाचा बाजार पूर्णपणे ढासळला आहे. मागील वर्ष दुष्काळाचे होते, पण शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसान भरपाई मिळालीच नाही. त्यासाठी सत्तेत असणाऱ्या शिवसेनेला मोर्चा काढावा लागतो, याशिवाय दुसरं ढळढळीत उदाहरण कोणतं असू शकतं? बाजारपेठेत मालाला उठाव नसल्यामुळे त्याचा परिणाम औद्योगिक क्षेत्रावर झाला. त्यामुळे व्यापार थंडावला. वाहन उद्योग अडचणीमध्ये आला. आणि नजीकच्या काळात वस्त्रोद्योगासमोरही मोठे आव्हान आहे. कापूस उत्पादक आज अडचणीमध्ये आहे. भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये कापसाला सात हजार रुपये क्विंटलप्रमाणे नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन दिलं गेलं. प्रत्यक्षात चार हजार रुपयांनीसुद्धा दिले नाही. अशा अनेक निर्णयांमुळे कुटुंबच्या कुटुंबे उद‌्ध्वस्त झाली. बेरोजगारीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. तिशी-पस्तिशीच्या वयातील युवकांना नोकऱ्या नाहीत. हाताला कसलेही काम नाही. त्यांचे विवाह होत नाहीत. ही या सरकारची ‘कामगिरी’ आहे. त्यामुळे सर्वच स्तरांवर नाराजी आहे. म्हणून मतदार या वेळी त्यांना पुन्हा निवडून देतील असे मला वाटत नाही.
 

प्रश्न : तुमच्या पक्षाचे सरकार येईल असा तुम्हाला विश्वास वाटतो आहे. म्हणजे काँग्रेस स्वबळावर सत्तेत येईल की मित्रपक्षांना सोबत घेणार आहात ?
> थाेरात : अर्थातच, आमचे मित्रपक्ष आमच्या बरोबर आहेत. आज देश अशा एका वळणावर येऊन उभा आहे की धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येणे ही गरज बनली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पक्ष, बसपा, कम्युनिस्ट पक्ष अशा सर्वांशी आमची चर्चा सुरू झाली आहे. आम्ही सर्व एकत्रितपणे निवडणूक लढणार आहोत यात शंका नाही.
 

प्रश्न : यात वंचित बहुजन आघाडीचा समावेश नाही का?
> थाेरात : वंचित आघाडीही आमच्याबरोबर यावी, असाच आमचा प्रयत्न सुरू आहे. त्या दृष्टीने बाळासाहेब आंबेडकरांशी आमचे बोलणे सुरू आहे. त्या चर्चेतून व्यवहार्य तोडगा निघेल याची मला खात्री आहे. बाळासाहेबांनाही धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येण्याची आता किती गरज आहे याची जाणीव आहे आणि त्यानुसार ते सन्मान्य तोडगा काढतील.
 

प्रश्न : ३७० कलम रद्द करण्यासारखी पावले भाजपने उचलली आहेत. अशा परिस्थितीत देशात निर्माण झालेल्या ‘देशभक्ती’च्या वातावरणात धर्मनिरपेक्ष पक्षांची आघाडी कितपत टिकाव धरू शकेल ?
> थाेरात : भाजपची देशभक्ती ढोंगी आहे. ३७० कलम काश्मीरमध्ये रद्द केले. पण पूर्वांचल प्रदेशात काय स्थिती आहे? त्यासंदर्भात भाजप आणि मोदी का बोलत नाहीत? देशभक्तीच्या नावाने त्यांनी देशवासीयांना संमोहित केल्याचे दिसत असले तरी भारतीय मतदार फार काळ संमोहनात राहत नाहीत, असा इतिहास आहे. १९७८ आणि १९९९ मध्ये अशीच परिस्थिती काँग्रेसवर ओढवली होती. त्याही काळात काँग्रेस संपली, असे म्हटले जायचे. परंतु काळाचे आघात सहन करूनही काँग्रेस पुन्हा एकदा दमदारपणे उभी राहिली आहे. आताही मित्रपक्षांना बरोबर घेऊन काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल. काँग्रेसचा विचार, तत्त्वज्ञान आता आम्हाला नव्या पिढीपर्यंत पोहोचवायचे आहे. त्यासाठी वेळ द्यावा लागेल. पण आम्ही ते करणार आहोत. त्यासाठी दमदारपणे काँग्रेस वाटचाल करते आहे. 
 

प्रश्न : शिवसेनेला पाठबळ देऊन राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात पुन्हा नवा डाव खेळण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. त्याकडे तुम्ही कसे पाहत आहात?
> थाेरात : राष्ट्रवादी काँग्रेस तसे काही करेल असे मला वाटत नाही. आमचा मित्रपक्षांवर विश्वास आहे. 

प्रश्न : राष्ट्रवादी काँग्रेस राज ठाकरे यांना बरोबर घेणार असेल तर काँग्रेस ते मान्य करणार आहे का?
> थाेरात : महाआघाडी करण्यासंदर्भात अजून चर्चा सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने अजून तसे काही म्हटलेले नाही. त्यामुळे त्यासंदर्भात बोलणे बरोबर होणार नाही.
 

प्रश्न : भाजप- शिवसेना युतीचे सरकार अपयशी झाले असे तुमचे म्हणणे अाहे, मग मतदारांनी तुमच्या पक्षावर विश्वास ठेवावा, यासाठी तुमच्याकडे काय कारण आहे?
> थाेरात : डाॅ. मनमोहनसिंग सरकारचा कार्यकाळ आणि भाजप सरकारचा कार्यकाळही लोक पाहत आहेत. आता जी मंदी आली आहे ती केवळ आणि केवळ भाजपच्या केंद्रातील आणि राज्यातील सरकारांनी कृषिक्षेत्राकडे केलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आहे हे उघड आहे. मनमोहनसिंग सरकारच्या काळात जगात मंदी होती, पण भारतात ती आली नाही, याचे कौतुक जगभरातल्या माध्यमांनीच केले आहे. आमच्या सरकारच्या काळात शेती आणि शेतकरी यांना प्राधान्य दिले जात असल्यामुळे ही वेळ येत नाही याचा विश्वास शेतकऱ्यांना, व्यावसायिकांना आणि उद्योजकांनाही आहे. त्यामुळे त्याबाबतीत वेगळे कारण देण्याची आमच्या पक्षाला आवश्यकता वाटत नाही.
 

प्रश्न : राज्यात काँग्रेसचे सरकार आले तर मुख्यमंत्री तुम्ही असाल की इतर कोणी?  
> थाेरात : पक्षाने दिलेली कोणतीही जबाबदारी स्वीकारायला मी तयार आहे. पण तो नंतरचा विषय आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...