आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'लंगडा घोडा\' किंवा \'खोटा माल\'ऐवजी आता \'व्हर्जिन टेस्ट\' हे आधुनिक नाव; कंजारभाट समाजातील कौमार्य चाचणीचा खेळ सुरूच, उच्चशिक्षितही विळख्यात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- स्त्री-पुरुषांच्या चारित्र्याचा जाहीर पंचनामा करणाऱ्या आणि जात पंचायतीच्या घटनाबाह्य सत्ता केंद्रांच्या दबावाने होणाऱ्या 'व्हर्जिन टेस्ट' (कौमार्य चाचणी) विरोधात गेल्या वर्षभरात कंजारभाट समाजातील तरुणांनी जनजागृती करण्यासाठी जिवाचे रान केले. परंतु, 'लंगडा घोडा' किंवा 'खोटा माल' हे पारंपरिक शब्द डावलून 'व्हर्जिन टेस्ट'सारखे शब्द वापरून विदेशातून मायदेशी आलेल्या एका उच्चशिक्षित वराची आणि तेवढ्याच शिकलेल्या वधूची जातपंचायतीने कौमार्य चाचणी घेतल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक असलेल्या वराच्या वडिलांच्या परिचयातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या आलिशान विवाह सोहळ्यानंतर ही चाचणी झाली. या प्रकरणी समाजाच्या दबावामुळे वर किंवा वधू यांच्यापैकी कुणीही तक्रार करण्यासाठी पुढे येत नसल्यामुळे यावर कारवाई करण्यात अडथळे येत आहेत.

 
या संतापजनक कौमार्य चाचणी विरोधात याच समाजातील काही तरुणांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात संपूर्ण राज्य ढवळून काढले. या अघोरी प्रथेला विरोध करण्यासाठी तसेच याबद्दल जनजागृती करण्यासाठी 'नो टू व्ही टेस्ट' हे अभियान राबवले. यासाठी पुढे आलेल्या व आपल्या विवाहात या प्रथेला विरोध करणाऱ्या तरुणांवर जिवावर बेतणाऱ्या धमक्यांना व हल्ल्यांना सामोरे जावे लागले. पिंपरी चिंचवड पोलिस स्टेशनमध्ये या विरोधात गुन्हा दाखल होऊन पंचांविरोधात कारवाई करण्यात आली. तरीही या समाजातील कौमार्य चाचणीची कुप्रथा थांबली नसल्याचे ३० डिसेंबरला झालेल्या या विवाहाच्या निमित्ताने बोलले जात आहे. हॉटेल्स, शाळा आणि रिअल इस्टेट या क्षेत्रात कोट्यवधींची उलाढाल असलेल्या पुण्यातील एका उद्योजकांच्या मुलाच्या लग्नात छुप्या पद्धतीने व नाव बदलून ही चाचणी झाल्याचे कळते. गेल्या वर्षीच्या बोभाट्यामुळे 'लंगडा घोडा' किंवा 'खोटा माल' हे शब्द फक्त या चाचणीत बदलण्यात आले होते. परदेशात शिक्षण घेऊन आलेला मुलगा, उच्चशिक्षित मुलगी आणि समाजात प्रतिष्ठा कमावलेले, कोट्यवधींचा खर्च करून आलिशान विवाह सोहळा करणारे त्यांचे पालक निव्वळ जात पंचायतीच्या दबावामुळे यास बळी पडल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, पुण्यातील सर्वपक्षीय आजी-माजी लोकप्रतिनिधी या विवाहास उपस्थित असताना सदर कुप्रथा बिनबोभाट सुरू असल्याचेही आश्चर्य व्यक्त होत आहे. 

 

नेमकी कशी असते कंजारभाट समाजातील कौमार्य चाचणी ? 
लग्नाच्या पहिल्या रात्री नवविवाहित दांपत्याला कंजारभाट जात पंचायतीचे सदस्य एक पांढरी चादर देऊन एका खोलीत पाठवतात. त्या चादरीवर त्यांना शरीरसंबंध बनवावे लागते. दरम्यान, जात पंचायतीचे सदस्य खोलीबाहेरच बसतात. संबंधानंतर दांपत्य ती चादर त्या सदस्यांकडे देतात. त्यावर पडलेल्या रक्ताच्या डागांवरून तसेच 'नवरा लंगडा घोडा आहे' की 'नवरीचा माल खोटा आहे' हे प्रश्न विचारून जात पंचायतीचे सदस्य त्या विवाहाचे भविष्य ठरवतात. या कौमार्य चाचणीनंतरच त्या दांपत्याच्या विवाहाला मान्यता दिली जाते. 

 

ही कुप्रथा तरुणांनी नाकारावी 
पुण्यातील हा प्रकार आमच्याही कानावर आला आहे. चुकीच्या पद्धतींचे निर्मूलन करून समाजाला पुढे नेण्याची जबाबदारी समाजातील उच्चशिक्षित व उच्चभ्रू सदस्यांवर अधिक असते. वर्षभर या विषयी जनजागृती करूनही हे प्रकार सुरूच असणे, समाजाच्या दबावाखाली स्वत:ची चाचणी होऊ देणाऱ्या उच्चशिक्षित तरुणांची कीव येते. ही अपमानकारक प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी पुढे येणे खूप गरजेचे आहे. मी गेली अनेक वर्षे या विरोधात लढतो आहे, पण लपून छपून हे प्रकार सुरू राहणे संपूर्ण समाजासाठी लज्जास्पद आहे. - कृष्णा इंद्रेकर, संचालक, धर्मादाय आयुक्त