आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विक्रमादित्य सचिन तेंडुलकरसह अव्वल क्रिकेटरत्ने घडवणारा ध्येयवेडा द्राेणाचार्य

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मैदानावर उतरताच आपल्या कुशल खेळीने विक्रमाला गवसणी घालणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर घडवण्याचे माेलाचे कार्य द्राेणाचार्य रमाकांत आचरेकर यांनी केले. याच विक्रमादित्य सचिनपासून आंतरराष्ट्रीय सामने गाजवणारी क्रिकेटरत्ने त्यांनी भारतीय क्रिकेटला दिली. सचिन तेंडुलकरपासून विनोद कांबळीपर्यंत आणि बलविंदरसिंग संधूपासून रामनाथ पारकर, लालचंद राजपूत, प्रवीण आमरे यांच्यापर्यंत शेकडो कसोटी आणि प्रथम दर्जाचे क्रिकेटपटू घडवणारे क्रिकेटचे भीष्मपितामह, गुरू द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांचे आज मुंबईत वृद्धापकाळामुळे निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. 

 

सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी या जगप्रसिद्ध क्रिकेटपटू जोडीला घडवणारे रमाकांत आचरेकर त्यांच्या विशिष्ट क्रिकेट प्रशिक्षण शैलीमुळे अजरामर झाले. त्यांच्याकडे सरावासाठी येणाऱ्या मुलांमधील गुणवत्ता अचूक हेरण्याची नजर होती. त्या गुणवत्तेला आकार देण्याचे कौशल्य त्यांच्या क्रिकेट प्रशिक्षण शैलीत होते. कोणता खेळाडू कितपत पुढे जाऊ शकतो याचा अचूक अंदाज बांधण्याचा त्यांचा गुण त्यांना सचिन तेंडुलकरसारखा भारतरत्न क्रिकेटपटू घडवण्यास कारक ठरला. मुंबईच्या क्रिकेट नर्सरीमध्ये रमाकांत आचरेकर यांच्याइतके शालेय स्तरावर, रणजी स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्तरावर घडवणारा क्रिकेट प्रशिक्षक सापडणे कठीण आहे. 

 

अडचणीत असलेल्यांची स्वत:च्या घरी खास व्यवस्था 
पावसामुळे पुराच्या पाण्यात मुले अडकली की ते सर्वांना स्वत:च्या घरी ठेवायचे. दंगलीत मुलांना सुखरूप घरी पोहोचवायचे किंवा स्वत:च्या घरी सुरक्षित न्यायचे. आपल्या प्रशिक्षणार्थींची ते स्वत:च्या मुलांप्रमाणे काळजी घायचे. वेळप्रसंगी ते लहान मुलांच्या वयाचे व्हायचे. त्यामुळे खेळाडूंना त्यांच्या रूपात फक्त प्रशिक्षकच नाही तर मित्र दिसायचा. काळजी घेणारे पालक ते आचरेकरांमध्ये पाहायचे. खेळाडूंच्या क्रिकेट गुणांची मशागत करायचेच; पण ते करता करता मुलांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत नाही ना, याकडेही त्यांचे लक्ष असायचे. केवळ प्रशिक्षक म्हणून नव्हे तर ते नेटमध्ये येणाऱ्या प्रत्येकाचे फ्रेंड, फिलॉसॉफर, गाइड होते. 

 

जिवाचे रान करून प्रशिक्षण 
एखाद्या खेळाडूमध्ये गुणवत्ता दिसली, तो 'लंबी रेस का घोडा' आहे हे उमजले की आचरेकर सर त्याच्यासाठी जिवाचे रान करायचे. त्यांची शिस्त करडी होती. सचिन तेंडुलकरसारखा, विनोद कांबळीसारखा खेळाडू त्या शिस्तीपुढे चळचळा कापायचा, इतर खेळाडूंची तर बातच सोडा. मात्र त्यांच्या शिस्तीच्या चौकटीलाही प्रेमाची किनार होती. प्रत्येक खेळाडूची ते काळजी घ्यायचे. 

 

सरांच्या खाणीतून अनमाेल रत्ने गवसली 
आचरेकर सरांच्या खाणीतून देशाला सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, चंद्रकांत पंडित, प्रवीण आमरे, अमोल मुजुमदार, अजित आगरकर, रमेश पोवार, समीर दिघे, अतुल रानडे यांच्यासारखी क्रिकेटरत्ने गवसली. त्यांची क्रिकेट प्रशिक्षण शैली अगदी साधी, सरळ होती. ते तंत्रशुद्धतेच्या पाठी लागायचे नाही किंवा तसा त्यांचा अट्टहासही नसायचा.