आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भ विकासासाठी ९५८ कोटी रुपयांचा विशेष कार्यक्रम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या जलद विकासासाठी विशेष कार्यक्रम आखण्यात आला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत विदर्भासाठी ९५८ कोटी ७८ लाख रुपयांचा विशेष आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये नागपूर विभागासाठी ६४४ कोटी ९५ लाख आणि अमरावती विभागासाठी ३०२ कोटी ८३ लाख रुपये असल्याची माहिती विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष तथा नागपूर विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अमरावती विभागीय आयुक्त पियुष सिंह, मंडळाचे तज्ञ सदस्य डॉ. रविंद्र कोल्हे, डॉ. कपील चांद्रायण, डॉ. किशोर मोघे, सदस्य सचिव एन. के. नायक आणि नियोजन उपायुक्त कृष्णा फिरके उपस्थित होते. 


या विशेष कार्यक्रमात कृषी तसेच कृषी विद्यापीठ, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, व दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय, वनाधारित उद्योग, कौशल्य विकास, रोजगार निर्मिती, दळणवळण, वित्तीय सेवा पर्यटन व सांस्कृतिक कार्य आणि कृषी सिंचन व जलसंधारण तसेच विद्युत विकास आणि मानव संसाधन विकासासाठी ६९५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असल्याची माहिती अनूप कुमार यांनी दिली. नागपूर येथे ५३ कोटी रुपये किमतीच्या डिफेन्स आणि एअरोस्पेस क्लस्टरची उभारणी करण्यात येणार आहे. त्याप्रमाणे नागपूर येथे पहिल्या टप्प्यात उड्डाण कौशल्य विकास केंद्र आणि दुसऱ्या टप्प्यात निर्माण सामान्य सुविधा केंद्र याप्रमाणे दोन टप्प्यात क्लस्टर उभारण्यात येणार आहे. 


कृषी व सलग्न सेवांमध्ये शासनाच्या फळ रोपवाटिकेमध्ये लिंबूवर्गीय फळांच्या सुधारित रोपवाटिकांची स्थापना करणे, मिरची संकलन व प्रक्रिया केंद्र उभारणे, आत्माच्या माध्यमातून ब्लॅक राईसचे पीक घेणे, रुरल मॉल स्थापन करणे, वर्धा जिल्ह्यातील वायगाव हळद प्रकल्प, सामूहिक सिंचन योजना, श्री पध्दतीचा वापर करुन नैसर्गिक शेती करणे, पलाश जिल्हास्तरीय महिला बचत गटाचे विक्री केंद्र यांचाही समावेश आहे. त्याशिवाय शेतीवर आधारित उद्योगनिर्मिती, चंद्रपूर, नागभीड व ब्रम्हपुरी येथे ब्राउन राईस प्रोसेसिंग, ठिबक सिंचन योजनेच्या अनुदान मर्यादेत वाढ, चंद्रपूर येथील कृषी विद्यापीठाचे बळकटीकरण, टसर रेशीम शेती, कापड निर्मिती व विक्री व्यवस्थापन प्रकल्प आणि नागपूर येथे सेक्स सॉटेड सिमेन निर्मिती प्रयोगशाळा स्थापन करणे गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथे दुधाचा गोंडवाना ब्रँड विकसित करणे यांचाही समावेश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...