पंतप्रधान मोदींंच्या ‘मन / पंतप्रधान मोदींंच्या ‘मन की बात’ला काँग्रेस देणार ‘जन की बात’ने प्रत्युत्तर

Feb 08,2019 09:14:00 AM IST

मुंबई - लोकसभा निवडणुका ऐन तोंडावर आल्या असताना राजकीय पक्षांची जाेरदाच मोर्चेबांधणी सुरू आहे. आपली गमावलेली सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी काँग्रेसनेही रणनीती आखली आहे. त्यानुसार काँग्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’चा भंडाफोड करणार आहे. यासाठी प्रदेश काँग्रेस लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राज्याच्या गावागावात व चौकाचौकात ‘जन की बात’ कार्यक्रम करणार आहे.


या मोहिमेच्या माध्यमातून मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या कामांची झाडाझडती घेतली जाणार आहे. गेल्या पाच वर्षांत विकासाचे तीनतेरा कसे वाजले, सामान्य माणसाच्या आशा पूर्ण झाल्या का, याविषयी सवालांचे मोहोळ उठवले जाणार आहे. भाजप व नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात टफ फाइट देण्याची रणनीती महाराष्ट्र काँग्रेसकडून आखली जात आहे. त्यासाठी प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांच्या एकूण सात समित्या स्थापण्यात आल्याची माहिती प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली.

लाेकसभा निवडणुकीसाठी प्रदेश काँग्रेसने स्थापल्या नेत्यांच्या सात समित्या
1. जनतेच्या प्रश्नांवर मागवले इनपुट्स
प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांच्या ७ समित्या स्थापण्यात आल्या आहेत. सध्या समित्यांच्या बैठका सुरू आहेत. प्रदेश काँग्रेसचे विविध सेल आहेत. जसे, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, सफाई कर्मचारी. या सर्व सेलकडून त्यांच्या प्रश्नांसंदर्भात इनपुट्स मागवले आहेत. त्याचा अंतर्भाव प्रचार आणि जाहीरनाम्यात करण्यात येणार आहे.


2. महाराष्ट्रातील २६ जागा लढवणार
काँग्रेस राज्यातील २६ लोकसभा मतदारसंघाची तयारी करत आहे. प्रत्येक मतदारसंघाच्या जातीय गोळाबेरजेची माहिती तयार आहे. मतदारापर्यंत पोहोचवण्यासाठी काॅल
सेंटर तसेच संदर्भ व संशोधन विभाग स्थापन केले जाणार अाहे. १९ फेब्रुवारीपर्यंत काँग्रेसची रणनीती तयार असेल, असे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सांगितले.

एकच टाॅकिंग पॉइंट
२०१४ च्या निवडणुकीत भाजपने काही मुद्द्यांभोवती प्रचार केंद्रित केला होता. त्या धर्तीवर काँग्रेस आगामी निवडणुकीचा प्रचार, प्रसिद्धी, भाषणे, पत्रकार परिषदा या सर्वांमध्ये समान टाॅकिंग पॉइंट ठेवला आहे.


देश ते तालुका
लोकसभा निवडणुकीतील कळीचे मुद्दे देशपातळीचे असतात. मात्र, या वेळी देश, राज्य आणि स्थानिक मुद्द्यांचे एकत्रीकरण करून त्याभोवती आपल्या प्रचाराचे नियोजन प्रदेश काँग्रेसने आखले आहे.


वक्त्यांना प्रशिक्षण
जे वक्ते प्रचारात सहभागी होणार आहेत त्या सर्वांचे ओरिएंटेशन केले जाणार आहे. प्रसिद्धी माध्यमे, सभा, रॅलीज, पदयात्रा यामध्ये कोणते मुद्दे, प्रभावीपणे कसे मांडायचे याविषयीचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे.


जनतेचा जाहीरनामा
जनतेच्या इच्छा प्रतिबिंबित होण्यासाठी जाहीरनामा समिती जनतेकडून सूचना मागवत आहे. त्यासाठी +91 7020023232 हा व्हाॅट्सअॅप क्रमांक व [email protected] ई-मेल दिला आहे.

या सात नेत्यांवर लोकसभा निवडणुकीची धुरा
1. समन्वय समिती : मल्लिकार्जुन खर्गे 2. निवडणूक समिती : अशोक चव्हाण
3. कॅम्पेन समिती : सुशीलकुमार शिंदे 4. प्रसिद्धी समिती : रत्नाकर महाजन
5. माध्यम समिती : कुमार केतकर 6. जाहीरनामा समिती : पृथ्वीराज चव्हाण
7. निवडणूक व्यवस्थापन : शरद रणपिसे

X