Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Special Valentine day story  

...इश्क मजहब, इश्क मेरी जात बन गई; ही प्रेमकहाणी फक्त रोमँटिक नाही, तथाकथित धर्मरक्षकांचा विरोध, धमक्या आणि दहशतीच्या सावटातल्या जिगरबाज हिमतीची

दीपक पटवे | Update - Feb 14, 2019, 09:42 AM IST

या प्रेमी युगलातच नव्हे, तर नंतर दोन परस्परभिन्न धार्मिक कुटुंबांत रुजलेल्या प्रेमाची ती रौप्यमहोत्सवी कथा आहे. 

  • Special Valentine day story  

    औरंगाबाद- येत्या मंगळवारी म्हणजे १९ फेब्रुवारीला मिलिंद आणि मनाली यांच्या लग्नाला २७ वर्षे पूर्ण होतील. पण आजही २७ वर्षांपूर्वीच्या त्यांच्या प्रेमकथेच्या आठवणी निघाल्या की ते दोघेही तेवढेच रोमँटिक आणि भावुकही होतात. कारणही तसेच आहे. ही प्रेमकहाणी काही साधी, सरळ आणि फक्त रोमँटिक नाही. आंतरधर्मीय लग्न असल्यामुळे तथाकथित धर्मरक्षकांचा विरोध, धमक्या आणि दहशतीच्या सावटात दोघांनीही दाखवलेल्या जिगरबाज हिमतीची ती कहाणी आहे. किंबहुना, या प्रेमी युगलातच नव्हे, तर नंतर दोन परस्परभिन्न धार्मिक कुटुंबांत रुजलेल्या प्रेमाची ती रौप्यमहोत्सवी कथा आहे.

    बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाईची हाजीबेगम शेख ही १९ वर्षे वयाची तरुणी त्या वेळच्या पाटबंधारे खात्यात नोकरीला लागली आणि औरंगाबादला तिची नियुक्ती झाली. इथे वर्किंग वुमन होस्टेलमध्ये ती राहू लागली. १९८७ सालची ही गोष्ट आहे. त्याच सुमारास नाशिकहून मिलिंद जोशी नावाचा स्टायलिश तरुण बजाज ऑटो कंपनीत नोकरीच्या निमित्ताने आला होता. तो आणि त्याचे काही मित्र वेळ मिळाला की टाइमपास करण्यासाठी म्हणून सायंकाळच्या वेळी फिरायला निघत असत. या होस्टेलजवळ एक मारुती मंदिर होते. हाजीबेगम आणि तिच्या काही रूममेट त्या मंदिराजवळ जाऊन गप्पा मारत बसत. एक दिवस मिलिंद जोशी आणि त्याचे मित्र फिरत फिरत मंदिराजवळ गेले तशा या मुली तिथून निघाल्या. जाताना मिलिंद आणि हाजीबेगम यांची नजरानजर झाली आणि मिलिंदच्या मनात ती बसली. मग काय, हा नित्याचाच दिनक्रम झाला.

    मिलिंदचे हे वागणे माझ्या लक्षात आले होते, मनाली जोशी सांगत होत्या. एकदा मी आणि माझी मैत्रीण औरंगपुरा बसस्थानकावर बसची वाट पाहत उभ्या होतो. ही बातमी मिलिंदला त्याच्या मित्रांनी सांगितली. त्यामुळे झोपेतून उठून तो तसाच धावत तिथे आला. तेवढ्यात आम्ही बसमध्ये बसलो. तो आमच्या बसच्या मागे आला. रेल्वे स्थानकाजवळ आम्ही उतरलो तसा तो माझ्या मैत्रिणीजवळ आला आणि तिला त्याने 'तुझी मैत्रीण मला आवडते. तिला विचार माझ्याशी मैत्री करशील का?', असे थेट सांगून टाकले. तिने मला तो निरोप दिला, तेव्हा मी प्रारंभी नकार दिला, पण मलाही त्याचा तो धीटपणा आवडला होता. मग एकदा मी त्याच्याशी बोलले. मी मुस्लीम आहे हे त्याला सांगितले. तो म्हणाला, मला फरक पडत नाही. नंतर आमचे भेटणे आणि एकमेकांसाठीच्या आणाभाका सुरू झाल्या.

    साधारण वर्षभर हे प्रेमप्रकरण सुरू होते. एक हिन्दू तर एक मुस्लीम. त्यात हे औरंगाबाद आणि धार्मिक दंगलींचा काळ. फार दिवस आपल्याला असे राहाता येणार नाही याची खात्री पटल्यावर १९८९ मध्ये त्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळचा अनुभव मिलींद जोशी सांगत होते, आम्ही वकील मित्राला सोबत घेऊन सकाळी साडे दहा वाजता नोंदणी कार्यालयात गेलो. आमच्या नावांची नोंदणी करताच त्या कार्यालयात कुजबूज सुरू झाली. तासाभरात आम्ही तिथून बाहेर पडलो. दुपारी साडेचार वाजता मनालीचा भाऊ अंबाजोगाईहून औरंगाबादमध्ये दाखल झाला आणि वडील आजारी आहेत हे सांगून तिला घेऊन गेला. अंबाजोगाईहून औरंगाबादला यायला त्यावेळी किमान सहा तास लागत होते हे लक्षात घेतले तर आमच्या विवाह नोंदणीच्या नोटीसीची बातमी त्याला किती वाजता समजली असेल, याची कल्पना येते. तिथून पुढे दोन वर्षे दोघांना एकमेकांना भेटता आले नाही. त्यांचे मित्र आणि मैत्रिणीच मग त्यांच्या संवादाचा दुवा बनले होते. हाजीबेगम अर्थात मनाली यांच्या वडिलांचा आणि भावाचा या लग्नाला प्रचंड विरोध होता. माझ्या लहान बहिणींच्या लग्नाला त्यामुळे अडचण येईल अशी भीती त्यांना वाटत होती, त्या सांगत होत्या. घरच्यांचा हा विरोध समजण्यासारखा होता. पण या शहरातले तथाकथित धर्मरक्षक मात्र या प्रेमप्रकरणाने पेटून उठले होते. मिलींद जोशी ज्या घरात राहायचे तिथे रोज चिठ्या येऊन पडू लागल्या. 'औरंगाबाद छोडके चला जा। वरना काट दिये जाओगे।' 'मुस्लीम लडकी से मिलने की जुर्रत मत करना, वरना जिंदा नही रहोगे।' अशा धमक्यांवर धमक्या येत होत्या. स्वत:त संचारलेली प्रचंड हिम्मत आणि त्यात मित्रांचे पाठबळ यामुळे या धमक्यांनी त्यांच्या प्रेमात मात्र तुसभरही फरक पडला नाही. हल्ला झाला तर स्वसंरक्षणासाठी तलवार जवळ राहू दे, म्हणत काही दिवस एका मित्राने तलवारही रूमवर आणून ठेवली होती. 'लग्न करीन तर त्याच मुलाशी, अन्यथा लग्नाचा विचारही करणार नाही', अशी प्रतिज्ञाच मनाली यांनी त्यावेळी केली होती आणि घरच्यांनाही ते स्पष्ट सांगितले होते. त्यामुळे दोन वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर अपयशी होऊन आई, वडिलांनी लग्नाला परवानगी दिली. पण मुलीशी अबोला धरला तो पुढची साडेचार वर्षे टिकून राहिला. पुढे या दाम्पत्याला मुलगा झाला आणि दोन्ही कुटुंबात संवाद सुरू झाला. त्यातून पुढे प्रेम वाढू लागले. काही वर्षानंतर मिलींदची आई थेट आपल्या सुनेच्या माहेरी जाऊन दोन महीने राहिली. मनाली यांची लहान बहीण सावेरा हीने त्यांना परळी वैजनाथ, औंढा नागनाथ या तीर्थस्थळांचे दर्शन करवून आणले. अंबाजोगाईत अंबामातेच्या दर्शनाला रोज घेऊन जाण्याचे कामही सावेराच करायची. मनाली यांच्या आईही मधुन मधून आपल्या लेकीकडे येऊन राहातात. मनालीच्या मोठ्या बहिणीच्या मुलीचे लग्न हाेते त्यावेळी सर्व सुत्र मिलींद आणि मनाली यांच्याच हातात त्यांनी साेपवली होती. समीर आणि सायली ही दोन अपत्य असलेले हे दाम्पत्य वेळ मिळेल तेव्हा सहलीला जातात आणि मनसोक्त जिवनानंद उपभोगतात. मिलींदच्या नातलगांनीही काही काळ नाकं मुरडली, पण आज त्यांनाही मिलींदपेक्षा मनालीच आधी हवी असते, असे मिलींद सांगतात. दोन्ही कुटुंबाने एकमेकांना स्वीकारले, पण स्वत:ला धर्मरक्षक म्हणवून घेणारे मात्र, बदलायला तयार नव्हते. मनाली यांच्या कार्यालयात असलेले अनेक मुस्लीम सहकारी त्यांना जाहीरपणे त्या बाबत बोलत. अलिकडे म्हणजे १० वर्षांपूर्वीही एका मुस्लीम अभियंत्याने मनाली यांच्या टेबलाजवळ येऊन त्यांना एक धर्मग्रंथ दिला. हा ग्रंथ तुमच्या नवऱ्याला वाचायला द्या. तो वाचून तो बदलेल आणि आपल्या धर्मात येईल, असा सल्लाही त्याने मनाली यांना दिला. त्यावेळी मनाली यांनी घेतलेल्या रौद्र अवतारानंतर मात्र, गेल्या १० वर्षात त्या बाबत बोलायची हिम्मत कोणी केलेली नाही. अब्बांना चिंता होती ती माझ्या लहान बहिणींच्या लग्नाची. पण त्यांचे लग्न व्यवस्थित पार पडले आणि अब्बा राग विसरून आमच्या घरीही यायला लागले

Trending