आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चटपटीत छोल्यांचे पदार्थ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योती मोघे 

हिरव्या चण्याची कचोरी
 

साहित्य - मैदा २ कप, ताजे हिरवे चणे - १ कप, कोथिंबीर - २ चमचे (बारीक चिरून),आले - १ इंचाचा तुकडा (किसलेले), बारीक चिरलेली हिरवी मिरची १-२, बडीशेप पावडर अर्धा चमचा, धने पावडर अर्धा चमचा, मीठ चवीनुसार, जिरे - १/४ चमचे, हिंग चिमूटभर, लाल तिखट पाव चमचा, पाव चमचा, गरम मसाला, तेल कणीक तयार करण्यासाठी, तेल कचोरी तळण्यासाठी

कृती - मैदा चांगला मळून घ्या. चणे बारीक वाटून घ्या. कढई गरम करून त्यात १ चमचा तेल घाला आणि गरम होऊ द्या. नंतर त्यात हिंग, जिरे घाला. हिरव्या मिरच्या नंतर तळून घ्या. हरभरे, मीठ घाला. धणे पूड,  बडीशेप पावडर,  गरम मसाला, लाल तिखट घाला. पंधरा मिनिटांनंतर ते परतून घ्या. मळलेला मैदा सेट झाला असेल नंतर त्याचे छोटे गोळे करून घ्या. त्यात वरील सारण भरून  व्यवस्थित बंद करा. कचोरी तयार करून तळून घ्या.

चणे निमोना
 

साहित्य - हिरवे चणे २५० ग्रॅम, बटाटे दोन ते तीन, बारीक चिरलेला कांदा एक वाटी, टोमॅटो प्युरी एक कप, खसखस पेस्ट एक चमचा, लाल मिरची पावडर एक चमचा, हिंग अर्धा चमचा, लसूण पेस्ट एक चमचा, हळद पावडर एक चमचा, धणे पावडर एक चमचा, हिरवी मिरची, आलं पेस्ट एक चमचा, दालचिनीचा तुकडा, फोडणीसाठी जिरे.

कृती - पॅनमध्ये तेल टाकून हिरवे वाटाणे भाजून घ्या, अर्धा हिरवा वाटाणा हा वाटून घ्या. एका पॅनमध्ये तेल टाकून त्यात जिरे, दालचिनी टाकून बारीक चिरलेला कांदा, आलं-लसूण पेस्ट,हिरवी मिरची पेस्ट टाकून भाजून घ्या. नंतर त्यात लाल मिरची पावडर, टोमॅटो प्युरी, हळदी पावडर टाकून मिश्रण चांगले हलवून घ्या. नंतर त्यात बटाटे आणि वाटलेले हिरवे चणे टाकून आवश्यकतेनुसार पाणी आणि मीठ टाकून चांगलं शिजवून घ्या. त्यानंतर त्या ग्रेव्हीत भाजलेले चणे टाकून एक उकळी येऊ द्या. 

चणे छोले मसाला
 

साहित्य - मैदा २ वाट्या, चवीनुसार मीठ, आवश्यकतेनुसार तेल, स्टफिंगसाठी  एक कप हिरवे चणे उकडून घ्या. खोवलेलं नारळ एक चमचा, खसखस पेस्ट एक चमचा, आलं-लसूण पेस्ट एक चमचा, पनीर किसलेले दोन चमचे, एक चमचा भाजलेले बेसन, लाल मिरची आणि धने पावडर प्रत्येकी  एक चमचा, हिरवी मिरची अर्धा चमचा, कोथिंबीर दोन चमचे.

कृती - मैद्यामध्ये कोमट तेल, मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून मळून घ्या. पॅनमध्ये तेल घेऊन त्यात जिरा, हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट, खसखस पेस्ट, खोवलेलं नारळ टाकून एकत्र करून घ्या. त्यात उकडलेले हिरवे चणे घालून मिश्रण एकजीव करा. मळलेल्या पिठाच्या पुरीप्रमाणे लाटून त्यात वरील मिश्रण भरुन चांगल्या प्रकारे बंद करून गरम तेलात मंद गॅसवर तळून घ्या. 

चण्याचे कोफ्ते
 

कोफ्त्यासाठी साहित्य-  उकडलेले चणे एक कप, बेसन दोन चमचे, हळद पावडर एक चमचा, लाल मिरची पावडर, अर्धा चमचा, हिरवी मिरची पेस्ट अर्धा चमचा, उकडून कुस्करलेले बटाटे दोन चमचे, स्टफिंगसाठी साहित्य - हळद पावडर अर्धा चमचा, धने पावडर एक चमचा, आलं पेस्ट एक चमचा, आलं पेस्ट एक चमचा, खसखस पेस्ट एक चमचा, गरम मसाला एक चमचा, हिंग चिमूटभर, जीरा फोडणीसाठी.

कृती - कोफ्ते बनविण्यासाठी सर्व साहित्य एकत्र करा. त्याचे गोल आकाराचे कोफ्ते बनवा. हे कोफ्ते मंद आचेवर तळून घ्या. ग्रेवीसाठी पॅनमध्ये तेल गरम करून घ्या. त्यात जिरा, दालचिनी हिंग, चिरलेला कांदा, आलं- लसूण पेस्ट, हिरवी मिरची, टोमॅटो प्युरी टाकून मिश्रण चांगले एकजीव करा. जेव्हा मिश्रणाला तेल सुटेल त्या वेळी त्यात गरम मसाला पावडर टाकून हलवून घ्या. नंतर त्यात तळलेले कोफ्ते टाका वरून कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.

चटपटीत छोले चाट
 

साहित्य - टिक्की बनवण्यासाठी बटाटे उकडून स्मॅश करा. ब्रेडचा चुरा दोन चमचे, आवश्यकतेनुसार तेल, भिजवलेले छोले १०० ग्रॅम, कांद्याची पेस्ट दोन चमचे, टोमॅटो पेस्ट चार चमचे, हळदी पावडर अर्धा चमचा, लाल मिरची पावडर अर्धा चमचा, धने पावडर एक चमचा, मीठ स्वादानुसार, बडीशेप अर्धा चमचा, जिरा फोडणीसाठी, आलं, लसूण, हिरवी मिरची पेस्ट एक चमचा, चिरलेली कोथिंबीर

कृती - उकडलेल्या बटाट्यांमध्ये ब्रेडचा चुरा, मीठ टाकून मळून घ्या. नंतर त्याची मध्यम आकाराची टिक्की बनवा. नॉनस्टिक तव्यावर तेल टाकून ही तांबूस रंग होईपर्यंत भाजून घ्या. कढईत तेल टाकून त्यात जिरे, वरील सर्व साहित्य टाकून मिश्रण एकजीव करा. नंतर उकडलेले छोले टाकून परतून घ्या. थोडा वेळ झाकून शिजवा. सर्व्ह करताना प्रथम प्लेटमध्ये टिक्की ठेवा. त्यावर छोले टाकून नंतर हिरवी चटणी, गोड दही टाका. त्यावर चिरलेली कोथिंबीर पसरवा. 
 

बातम्या आणखी आहेत...