Home | Sports | Other Sports | Spirit of Selja Jain of Nashik

भारताने संधी नाकारली, इराणच्या कोच बनून संघाला केले चॅम्पियन!

वृत्तसंस्था | Update - Aug 25, 2018, 06:21 AM IST

कबड्डीमध्ये पुरुष संघाच्या पराभवानंतर शुक्रवारी भारतीय महिला संघालाही इराणकडून २४-२७ ने पराभव पत्करावा लागला.

 • Spirit of Selja Jain of Nashik

  जकार्ता- कबड्डीमध्ये पुरुष संघाच्या पराभवानंतर शुक्रवारी भारतीय महिला संघालाही इराणकडून २४-२७ ने पराभव पत्करावा लागला. आशियाई स्पर्धेत पुरुष व महिला अशा दोन्ही गटांत भारताचा पराभव होण्याची ही पहिलीच वेळ आहे. इराणच्या विजयाचे श्रेय जाते नाशिकच्या शैलजा जैन यांना. १८ महिन्यांपूर्वी त्या भारतीय संघाच्या प्रशिक्षक होत्या. शैलजा म्हणाल्या, ‘कबड्डी फेडरेशनने प्रशिक्षकपद नाकारले तेव्हा मी इराणला गेले. तेथील भाषा व अन्न यामुळे अडचण झाली. कारण मी शाकाहारी आहे. मी खेळाडूंच्या दिनचर्येत योग, प्राणायाम समाविष्ट केला. याचा फायदा झाला.’


  नाशिकच्या कबड्डी प्रशिक्षक शैलजा जैन यांची जिद्द, भारताला हरवून इराणने जिंकले सुवर्ण
  भारताला सुवर्णपदक मिळाले नाही याचे एक भारतीय म्हणून दु:ख आहे. मात्र, व्यावसायिक प्रशिक्षक म्हणून मी फक्त इराणचाच विचार करते.
  - शैलजा जैन


  भारतीय कबड्डीत चुकीच्या पंचगिरीचा फटका

  कबड्डीत महाशक्ती म्हणून ओळख असलेल्या दोन वेळच्या सुवर्णपदक विजेत्या भारतीय महिला कबड्डी संघाला या स्पर्धेच्या अंतिम लढतीत चुकीच्या पंचगिरीचा फटका बसला. यात भारतीय संघाचे ८ गुणांचे नुकसान झाले. अखेर इराणविरुद्ध २७-२४ अशा गुणफरकाने भारताचा पराभव झाला. पुरुष कबड्डी संघापाठोपाठ महिला संघाचा झालेला पराभव धक्कादायक ठरला.


  सहाव्या दिवशी दोन सुुवर्णांसह सात पदके, रोइंगमध्ये नाशिकचा दत्तू भोकनाळ चमकला
  भारताने स्पर्धेत सहाव्या दिवशी एकूण २ सुवर्ण, एक रौप्य व चार कांस्यपदके पटकावली. रोइंगमध्ये क्वाड्रपल स्कल्समध्ये नाशिकचा दत्तू भोकनाळ, स्वर्णसिंह, ओमप्रकाश व सुखमीत यांनी सुवर्ण पटकावले. सिंगल स्कल्स व डबल स्कल्स प्रकारातही दोन कांस्य मिळाली. टेनिसमध्ये बोपन्ना-दिविज जोडीने सुवर्णपदक तर पुरुष एकेरीत प्रजनेश गुणेश्वरन कांस्य मिळवले. कबड्डीमध्ये भारतीय महिलांना इराणकडून पराभव पत्करावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, तर नेमबाजीत हिना सिद्धूने कांस्य पटकावले.

  मी याेग्यता सिद्ध केली, भारतीय संघालाही प्रशिक्षण देणे अावडेल

  'भारतीय कबड्डी संघटनेने महिला संघाच्या प्रशिक्षकपदाची संधी मला दिली नाही. ते शल्य माझ्या जिव्हारी लागले होते. मात्र, मी खचले नाही. इराणचे प्रशिक्षकपद स्वीकारले. ती 'जखम' घेऊनच मी इराणला गेले. माझी योग्यता सिद्ध करून दाखवायची होती आणि आज तो दिवस अखेर उजाडलाच...' जकार्ता येथील आशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाला साखळीत आणि अंतिम फेरीतही पराभूत करून सुवर्णपदक मिळवणाऱ्या इराणच्या प्रशिक्षक शैलजा जैन 'दिव्य मराठी'शी बोलत होत्या. 'भारताचे सुवर्णपदक गेल्याबद्दल वाईट वाटते. परंतु यापुढेही मला भारतीय संघाला प्रशिक्षण देण्याची संधी मिळाली तर ती अवश्य स्वीकारीन,' असेही त्या म्हणाल्या.


  शैलजा मूळच्या नाशिकच्या. या महिलेने भारतीय कबड्डी संघटनेने केलेला अपमान मनाला लावून घेतला होता. आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी त्या शोधत होत्या आणि इराणने त्यांना ती संधी दिली. जैन म्हणाल्या की, इराणने लीगमधून निवडलेल्या ४५ खेळाडू माझ्या हवाली केल्या. अंतिम १२ खेळाडू निवडण्याचे अधिकार मला दिले. एवढा विश्वास भारताच्या संघटननेने कधीही टाकला नव्हता. मग मात्र मी जिद्दीने उतरले. सर्वप्रथम इराणची फारसी भाषा शिकली. इराणच्या फक्त एका महिला खेळाडूला इंग्रजी येत होते, तिच्याच मदतीने मी इतर खेळाडूंशी संवाद साधत होते.


  शैलजा म्हणाल्या, 'दिवसातून चार-चार वेळा मी सराव घेतला. प्रशिक्षणादरम्यान मी तलाव, इतर सुविधांचाही पूर्ण वापर करून घेतला. सोना, स्टिम बाथ, हॉट-कोल्ड बाथ, सॉल्ट थेरपीचा प्रयोग यशस्वीही झाला. सात महिन्यांच्या खडतर प्रशिक्षणानंतर संघाने सुवर्णपदकावर नाव काेरले.'


  भारतीयांपेक्षा इराणी खेळाडू खूप सरस
  'इराणच्या खेळाडू खूपच तंदुरुस्त आणि काटक आहेत. त्या रग्बी तर उत्तम खेळतातच, परंतु फुटबॉल आणि मार्शल आर्ट््समध्येही तरबेज आहेत. त्यांचा फिटनेस इतका जबरदस्त आहे की भारतीय कबड्डीपटू फिटनेसच्या बाबतीत त्यांच्या आसपासही फिरकू शकत नाहीत,' असे शैलजा सांगतात.

Trending