आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'भारत बंद'ला कामगारांसह राज्य कर्मचाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद, ठिकठिकाणी मोर्चे, निवेदने, धरणे, ठिय्या आंदोलनात सहभाग

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे : 'भारत बंद'च्या हाकेला प्रतिसाद देत पुणे शहर व जिल्हाभरात उत्स्फूर्तपणे कारखाने, सरकारी कार्यालये, बँका, भारत संचार निगम आदी संस्थांमधील कामगारांनी बंद पाळून शासनाच्या कामगारविषयक धोरणाला शांततेत विरोध केला. मागण्यांसाठी पुण्यातील वाकडेवाडी येथील कामगार आयुक्त कार्यालयापासून पुणे जिल्हा कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने कामगारांनी काढलेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.


मोर्चाचे नेतृत्व पुणे जिल्हा कामगार संघटना कृती समितीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम व अजित अभ्यंकर यांनी केले. मोर्चात महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघ, हिंद कामगार संघटना, विमा, बँका, बीएसएनएल, केंद्र सरकारी कर्मचारी, महानगरपालिका, वीज मंडळ, राज्य सहकारी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, रेल्वे, अंगणवाडी, आशा योजना कर्मचारी, पथारी फेरीवाले, बांधकाम, घर कामगार संघटनांचा सहभाग होता. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या कामगार आघाडीनेही या आंदोलनात सहभाग घेतला.

नाशिक : कामगार कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची मागणी

अामच्या मागण्या मान्य करा, नाही तर खुर्च्या खाली करा, इन्कलाब जिंदाबाद, भाजप सरकार हाय हाय.. मोदी-शहांचा निषेध असो, कामगार कर्मचाऱ्यांना त्यांचा हक्क मिळालाच पाहिजे, शासकीय खात्यातील रिक्त पदे त्वरित भरलीच पाहिजेत, प्रलंबित असलेल्या मागण्या मान्य केल्याच पाहिजेत, मालकधार्जिने धोरण रद्द केलेच पाहिजे, अशा गगनभेदी घोषणा देत कामगार-कर्मचारी संघटना संयुक्ती समितीच्या वतीने हजारोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. कामगार-कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची मागणी कामगार संयुक्त कृती समीतीच्या विविध संघटनांनी स्वतंत्र निवेदनांतून जिल्हाधिकाऱी सूरज मांढरे यांच्याकडे केली.

जुनी पेन्शन योजना, ५ दिवसांचा अाठवडा, केंद्राप्रमाणे महिलांना बालसंगोपन रजा यांसह विविध ३५ वर मागण्यांसाठी कामगार, कर्मचारी संघटनांच्या वतीने देशव्यापी संपाची हाक दिली होती. नाशिकमध्येही त्याला संिमश्र प्रतिसाद मिळाला. संयुक्त कृती समितीच्या वतीने सकाळी ११ वाजता गोल्फ क्लब येथून मोर्चाला सुरुवात झाली. त्र्यंबक नाका, जिल्हा परिषद, शालीमार, शिवाजी रोड येथील डाॅ. बाबासाहेब अांबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मोर्चाची सांगता झाली. त्यानंतर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात अाले. प्रत्येक कार्यालये, संघटनांनी स्वतंत्र निवेदन देत अापल्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्याची मागणी केली.

जळगाव : शासकीय कर्मचाऱ्यांची निदर्शने, कामगारांचा मोर्चा

प्रलंबित मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपात सहभागी होऊन सरकारी कर्मचाऱ्यांसह माकप, विक्री व वैद्यकीय प्रतिनिधी, आयटक, पोस्ट कर्मचारी, अाशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी, शेतमजूर, कष्टकरी तसेच संघटित, असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या मागण्यांसाठी काढण्यात आलेले मोर्चे व निदर्शनांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणला.

माकपचा मोर्चा

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष संलग्नित महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनतर्फे घरकुल, किमान रोजगार व इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

विक्री, वैद्यकीय प्रतिनिधी

महाराष्ट्र विक्री आणि वैद्यकीय प्रतिनिधी असोसिएशनतर्फे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र विक्री आणि वैद्यकीय प्रतिनिधी असोसिएशनचे सभासद देशव्यापी संपात सहभागी झाले.

पोस्टल कर्मचारी युनियन

ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉई युनियन क व ड वर्ग संघटना संपात सहभागी झाली. या संघटनेतर्फेही निदर्शने करण्यात आली. तसेच शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

महसूल कर्मचारी संघटना

जिल्हा चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेतर्फेही एक दिवसाचा संप करण्यात आला.

आयटकचा मोर्चा

ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी, आशा गटप्रवर्तक, ग्रामीण विकासोन्नती अभियान, सीआरपी, शालेय पोषण आहार बचत गट कर्मचारी, रोजगार सेवक, एस.टी. कामगार,बांधकाम कामगार या संघटित, असंघटित कामगार, कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी आयटकतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले.

सांगली : सहा कोटींची उलाढाल ठप्प

केंद्र सरकारकडून कामगार कायदा मोडीत काढण्याचा डाव आहे. तो वाचला पाहिजे, सार्वजनिक व्यवसायांचे खासगीकरण थांबवावे तसेच हमाल, मापाडी आणि माथाडी कामगारांना पेन्शन देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, हमालांच्या काम बंदमुळे मार्केट यार्डातील सहा कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. जिल्हा हमाल पंचायत, हिंद मजदूर सभेच्या वतीने हमाल नेते विकास मगदूम व बाजार समितीचे संचालक बाळासाहेब बंडगर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.

ही कार्यालये, संघटना झाल्या सहभागी

खासगी उद्योगांतील कामगार, राज्यातील योजना व कंत्राटी कर्मचारी व असंघटित क्षेत्रातील कामगार, जिल्ह्यातील राज्य व केंद्र सरकारी कर्मचारी, बँक व विमा कर्मचारी, पोस्टल कर्मचारी, अंगणवाडी-आशा कर्मचारी, महापालिका, नगरपालिका अाणि ग्रामपंचायत कर्मचारी, बांधकाम कामगार, घर कामगार, अादिवासी कर्मचारी संघटना, माथाडी कामगार अादी आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी झाले, तर सुरक्षारक्षकांनी काळ्या फिती लावून काम केले. राजपत्रित अधिकारी महासंघाने संपाला पाठिंबा देत लक्षवेध केला.

बातम्या आणखी आहेत...