‘भीतिदायक वास्तव’ या अग्रलेखात (14 फेब्रुवारी) आपण मांडलेले वास्तव बोलके असून भयावह आहे. सध्या सभागृहात जे चालते, तो गोंधळ पाहून मन विषण्ण होते. वास्तविक घटना तयार करताना घटनाकारांनी त्या वेळची परिस्थिती, राजकीय नेत्यांचे सद्वर्तन, विद्वत्ता वगैरे गोष्टी विचारात घेऊन सभागृहातील सदस्यांना घटनेने अबाधित स्वातंत्र्य व संरक्षण दिलेले होते; परंतु काळाबरोबर सर्व गोष्टी बदलल्या. त्याला राजकीय नेतेही अपवाद ठरले नाहीत. राजकारणामध्ये सत्तेबरोबरच आर्थिक लाभ व सन्मानही मिळतो. सर्वच स्तरांतील लोक राजकारणाकडे आकर्षित झाले. त्यामध्ये गुन्हेगार प्रवृत्तीचे व त्याची पार्श्वभूमी असलेल्यांनीही प्रवेश केला. परिणामी, सभागृहात मारामार्या, फर्निचरची मोडतोड, विषारी वायूचा स्प्रे, चाकूचा धाक दाखवण्याचे प्रकार वाढले आहेत. यामधील काही जण गर्भश्रीमंतीच्या जोरावर व दहशतीने निवडून येतात. राजकीय पक्षही अशा लोकांनाच स्वार्थासाठी तिकिटे देतात, जेणेकरून त्यांच्या पक्षाची संख्या लोकसभेत वाढली पाहिजे. त्यायोगे त्यांना अप्रत्यक्षपणे सत्ता मिळेल. किमानपक्षी सताधार्यांना ब्लॅकमेल करण्याची संधी मिळेल. तेव्हा या सर्व गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी अत्यंत कठोर पावले उचलण्याची गरज भासू लागली आहे. तेव्हा घटनेत दुरुस्ती करून सभागृहात गैरवर्तन करणार्या, मारामार्या करणार्यांना गुन्हेगार ठरवून त्यांच्यावर आम आदमीप्रमाणे कायदेशीर कारवाई करणे क्रमप्राप्त झाले आहे. अन्यथा जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.