आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएंटरटेन्मेंट डेस्क : सौरभ वर्मा दिग्दर्शित 'विकी वेलिंगकर' हा चित्रपट ६ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. सोनाली कुलकर्णीसह चतुरस्र अभिनेत्री स्पृहा जोशीदेखील या चित्रपटात वेगळ्याच भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. यानिमित्ताने तिच्याशी मारलेल्या गप्पा...
यात तू कोणती व्यक्तिरेखा साकारत आहेस ?
मी या सिनेमामध्ये विद्या नावाची भूमिका साकारत आहे. मला जेव्हा सौरभ वर्मा सरांनी सिनेमाच्या कथेविषयी आणि व्यक्तिरेखेबद्दल सांगितले, त्यानंतर माझ्या मनात शंकाच उरली नव्हती. कारण 'विद्या' ही या संपूर्ण कथेमधील एक प्रमुख भूमिका आहे. तिच्याशिवाय 'विकी वेलिंगकर'ची कथा पुढे सरकूच शकत नाही.
तू एखादा सिनेमा निवडताना नेमका काय विचार करतेस?
कोणताही चित्रपट स्वीकारताना मी लांबीला कधी महत्त्व दिले नाही. व्यक्तिरेखेवर माझा भर असतो. एखाद्या चित्रपटाचा स्वीकार करताना त्याआधी केलेल्या भूमिकांची पुनरावृत्ती होणार नाही, यावर भर देते. त्याच्यामुळे मी वैविध्यपूर्ण व्यक्तिरेखा साकार करू शकले. व्यक्तिरेखा निवडताना माझ्यातील कलाकाराच्या क्षमतेला पूर्ण न्याय मिळेल यावर माझा पूर्ण भर असतो. पटकथेतून मला कलाकार म्हणून पूर्ण वाव मिळेल, याकडे मी लक्ष देते.
सौरभ वर्मांचा हा पहिला सिनेमा आहे, याविषयी तू काय सांगशील?
सौरभ वर्मा सरांची कथा सांगण्याची शैली आवडली. त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता, मराठी चित्रपटसृष्टीत थ्रिलर ही तशी दुर्मिळ गोष्ट आहे. त्यातही सौरभ वर्मा यांच्यासारखी प्रतिभा लाभणे तर अधिकच दुर्मिळ! म्हणूनच या दोन्ही गोष्टीं माझ्यासाठी महत्त्वपूर्ण होत्या. त्याशिवाय अशा प्रकारची भूमिका यापूर्वी मी कधीही केली नव्हती. सौरभ वर्मा सरांना त्यांच्या कथेबद्दल पूर्ण शाश्वती होती आणि त्यांच्या संकल्पनाही अगदी स्पष्ट होत्या.
सोनालीबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता ?
मी आणि सोनाली खूप जवळच्या मैत्रिणी आहोत, एखाद्या चित्रपटामध्ये एकत्र काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. 'विकी वेलिंगकर'मध्येसुद्धा ती अगदी परफेक्ट भूमिकेत आहे. या व्यक्तिरेखेसाठी तिने स्वतःमध्ये काही बदल घडवून आणले आणि शारीरिकदृष्ट्याही तिने मेहनत घेतली आहे. माझ्यासाठी सोनालीबरोबर एक सहकलाकार म्हणून काम करणे हा अनुभव समृद्ध करणारा होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.