आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोयरिक तीन देशांची, जवळीक विदेशी नात्यांची; श्रीलंका व पोर्तुगालच्या तरुणी झाल्या वाईच्या सासुरवाशीण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा - सनई-चौघड्यांच्या निनादात सातारा जिल्ह्यातील वाईत एक आगळावेगळा विवाह सोहळा साेमवारी पार पडला. श्रीलंका व पोर्तुगालच्या दोन तरुणी वाईच्या सासुरवाशीण झाल्या. फुलेनगर येथील  कुणाल व कुशल विलास जमदाडे या दोन जुळ्या भावांचा विवाह हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे शनिवारी पार पडला. या विवाह सोहळ्याला वाईकरांची मोठी उपस्थिती होती.   


कुणाल व कुशल यांचा विवाह सोहळा वाई येथील धनश्री मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात व मंगलमय वातावरणात पार पडला. वाईत प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर कुणाल व कुशल यांनी पुण्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर दोघे गेल्या पाच वर्षांपासून अबुधाबी व कतार येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी करत आहेत. या वेळी कुणाल याची त्याच पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी करणाऱ्या पोर्तुगालमधील सारा या तरुणीशी ओळख झाली. नंतर त्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. कुशल हाही कतारमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये नाेकरी करत असून त्याच हॉटेलमध्ये असलेल्या श्रीलंकेतील येथील कल्पना या तरुणीशी त्याची ओळख झाली. जुळे भाऊ असलेल्या कुणाल व कुशल यांनी सारा व कल्पना यांच्यासोबत आयुष्यभर एकत्र राहण्याचा मनोदय व्यक्त करत लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दोन्हीकडील आईवडिलांच्या सहमतीनंतर विवाह करण्याचे निश्चित झाले. कुशल व कल्पना यांचा विवाह काही दिवसांपूर्वी श्रीलंकेत त्यांच्या रीतिरिवाजाप्रमाणे पार पडला. कुणाल व सारा यांचाही विवाह पोर्तुगाल रीतिरिवाजाप्रमाणे पार पडणार आहे. तत्पूर्वी हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे विवाह पार पडला. नऊवारी साड्या व हातावर मेंदी काढलेल्या, डोक्याला मुंडावळ्या बांधलेल्या सारा व कल्पना उपस्थितांचे लक्ष वेधत होत्या. विवाहाला साराची आई ल्लीडिया व वडील अमेरिको फर्नांडिस दा सिल्वा तसेच कल्पनाची आई निलमिनी व वडील नलिन फर्नांडो उपस्थित होते. 

 

सोयरिक तीन देशांची, जवळीक विदेशी नात्यांची
या दोघांच्या लग्नाच्या लग्नपत्रिकेची चर्चाही झाली. चुलते सुभाष जमदाडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या आगळ्यावेगळ्या पत्रिकेवरचे “सोयरिक तीन देशांची, जवळीक विदेशी नात्यांची’, “इंटरनॅशनल लगीनघाई, देशी सोहळा ठिकाण वाई” या स्लोगनमुळे लग्नपत्रिका लक्षवेधी ठरली.