आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीलंकेत जातीयवादी हिंसाचारानंतर 9 मुस्लिम मंत्र्यांचे राजीनामे, देशभरातील मुस्लिमविरोधी दंगलींचा निषेध

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलंबो - श्रीलंकेत 21 एप्रिलच्या साखळी बॉम्बस्फोटानंतर देशभर अजुनही जातीय हिंसाचाराचे लोण पसरले आहे. राजधानीसह विविध ठिकाणी मुस्लिमबहुल भागांमध्ये हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर श्रीलंकेतील 9 मुस्लिम मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. देशभर अल्पसंख्याकांना लक्ष्य करून हिंसाचार आणि जाळपोळ केली जात आहे. त्यांना वाचवण्यात सरकारला अपयश आले असे त्यांनी म्हटले आहे. राजीनामा देणाऱ्या मंत्र्यांमध्ये कॅबिनेट मंत्री कबीर हाशिम, गृहमंत्री हलीम आणि रिशद बतीउद्दीन यांचाही समावेश आहे. यासोबतच, राज्यमंत्री फैजल कासिम, हारेश, अमीर अली शिहाबदीन, सय्यद अली झहीर मौलाना यांच्यासह उपमंत्री अब्दुल्ला महरूफ यांनीही पद सोडले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, या मंत्र्यांनी राजीनामा देण्यापूर्वी बौद्ध भिक्षूंनी जोरदार निदर्शने केली होती.


निलंबित पोलिस प्रुखांनी दिला राष्ट्राध्यक्षांना दोष
श्रीलंकेचे निलंबित पोलिस प्रमुख पी.जयसुंदरा यांनी 21 एप्रिलला झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांत राष्ट्राध्यक्ष मैत्रिपाला सिरीसेना यांना जबाबदार धरले आहे. जयसुंदरा यांनी राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात 20 पानांची तक्रार सुप्रीम कोर्टात दाखल केली. त्यानुसार, राष्ट्राध्यक्षांना 9 एप्रिल रोजीच श्रीलंकेत हल्ला होणार अशी गुप्त माहिती मिळाली होती. परंतु, त्यावर दुर्लक्ष करत राष्ट्राध्यक्षांनी काहीच कारवाई केली नाही. विशेष म्हणजे, राष्ट्राध्यक्ष सिरीसेना यांनी देखील ही गोष्ट मान्य केली होती. भारताकडून हल्ल्याच्या 15 दिवसांपूर्वी इशारा देणारी गुप्त माहिती मिळाली होती असे ते म्हणाले होते. मात्र, राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान आणि प्रशासनाने एकमेकांकडे बोट दाखवण्याव्यतिरिक्त काहीही केले नाही. 21 एप्रिल रोजी झालेल्या या हल्ल्यात 258 जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने घेतली. तेव्हापासून आतापर्यंत देशात शेकडो संशयितांना अटक करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...