Home | International | Other Country | Sri Lankan President Sirisena shocks; Minister gave support to Vikramsinghe

श्रीलंकेत राष्ट्राध्यक्ष सिरिसेनांना झटका; मंत्र्याने दिला विक्रमसिंघे यांना पाठिंबा

वृत्तसंस्था | Update - Nov 07, 2018, 09:47 AM IST

जयसूर्या यांनी विक्रमसिंघेंना वैधानिकदृष्ट्या पंतप्रधान म्हणून मान्यता दिली होती.

 • Sri Lankan President Sirisena shocks; Minister gave support to Vikramsinghe

  कोलंबो - श्रीलंकेतील राजकीय रस्सीखेचीत राष्ट्राध्यक्ष मैत्रिपाला सिरिसेना यांना तगडा झटका बसला आहे. सिरिसेना यांच्या नेतृत्वाखालील यूपीएफए सरकारचे कामगार उपमंत्री मानुषा नानायक्कारा यांनी मंगळवारी राजीनामा दिला. नानायक्कारा यांच्या राजीनाम्यानंतर पदच्युत पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. राजपक्षे यांना पाठिंबा देणाऱ्या ९६ खासदारांच्या यादीत नानायक्कारा सहभागी होते.त्यांनी सिरिसेना यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, संसदेचे सभापती कारू जयसूर्या यांनी विक्रमसिंघेंना वैधानिकदृष्ट्या पंतप्रधान म्हणून मान्यता दिली होती. त्यांना हटवायला नकाे होते.

  मानुषा नानायक्कारा यांच्या राजीनाम्याआधी राष्ट्राध्यक्ष सिरिसेना यांनी सांगितले होते की, लोकांनी संशय घेऊ नये. नव्या सरकारला २२५ खासदारांपैकी ११३ खासदारांचा पाठिंबा मिळेल. या राजकीय कोंडीत स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले की, १०-१० कोटी रुपयांत खासदारांची खरेदी करण्याचा प्रयत्न झाला आहे. दुसरीकडे, नव्या सरकारच्या समर्थनार्थ कोलंबोत संसदेसमोर हजारो नागरिकांनी मोर्चा काढला.

  मनमानी राजकीय मान्य नाही : नानायक्कारा
  नानायक्कारा यांनी जारी केलेल्या व्हिडिओ संदेशात म्हटले की, मनमानी पद्धतीच्या राजकीय नियुक्तीचा स्वीकार करू शकत नाही. लोकशाही संरक्षणासाठी संघर्ष सुरूच राहील. २२५ सदस्यांच्या संसदेत ११३ खासदारांचे पाठबळ असल्याचे सिरिसेना यांनी जाहीर केल्यानंतर नानायक्कारा यांनी तत्काळ पदत्याग केला.

  बहुमताशिवाय राजपक्षेंना मान्यता नाही : जयसूर्या
  सभापती जयसूर्या यांनी सोमवारी सिरिसेना यांच्यावर टीका करत विक्रमसिंघे यांना पदच्युत करणे व संसद निलंबित करण्याचा निर्णय घटनाबाह्य असल्याचे म्हटले होते. राजपक्षे यांनी बहुमत सिद्ध केल्याशिवाय त्यांना नवे पंतप्रधान म्हणून मान्यता दिली जाणार नसल्याचे जयसूर्या यांनी स्पष्ट केले हेाते. दरम्यान, जयसूर्या आपल्या पक्षाचे नेते रानिल विक्रमसिंघे यांना पाठबळ देत असल्याचा आरोप राष्ट्राध्यक्ष सिरिसेना यांच्या बाजूने केला जात आहे.

  सिरिसेना यांच्यावर आंतरराष्ट्रीय दबाव
  श्रीलंकेतील राजकीय संघर्ष दूर करण्यासाठी संसदेचे अधिवेशन लवकर बोलावण्यासाठी अमेरिका व राष्ट्रकुलने भर दिला आहे. राष्ट्रपतींनी विक्रमसिंघे यांना बडतर्फ केले. यानंतर विक्रमसिंघेंना विश्वासदर्शक प्रस्ताव मांडण्यासाठी सिरिसेना यांनी अधिवेशन बोलवावे यासाठी आंतरराष्ट्रीय दबाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे श्रीलंकेतील राजदूत अलिना बी. तेप्लिझ यांनी सभापती कारू जयसूर्या यांची भेट घेतली आहे.

Trending