आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Srikant Saraf Writes About Kalayan: Six Directions Of Six People In The Painting

कलायान : चित्ररंगांत सहा जणींच्या सहा दिशा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • औरंगाबादमधील मालती आर्ट गॅलरीत सहा महिला चित्रकारांनी ‘वुमेन आर्टिस्ट सेल्फ क्रिएटिव्ह एक्स्प्रेशन’ हे चित्रप्रदर्शन आयोजित केलं होतं

श्रीकांत सराफ

औरंगाबादमधील मालती आर्ट गॅलरीत सहा महिला चित्रकारांनी ‘वुमेन आर्टिस्ट सेल्फ क्रिएटिव्ह एक्स्प्रेशन’ हे चित्रप्रदर्शन आयोजित केलं होतं.  ते पाहताना सहा जणींच्या सहा दिशा असल्याने सहा सूर कानावर पडत असल्याचे वाटले. आशयसंपन्न रेखाटने, बोलकी रंगसंगती, भन्नाट त्रिमिती, विषयाची कल्पक मांडणी ही या प्रदर्शनाची वैशिष्ट्ये होती.




चित्रकला म्हणजे एक विशिष्ट आकार तयार करायचा आणि त्यात रंग भरायचे, असं मानलं जातं. त्यात अजिबातच तथ्य नाही, असं नाही.



पण चित्रकलेचं नातं केवळ रंग आणि आकार एवढ्यापुरतं मर्यादित नाही, तर त्या आकारात एक विचार भरावा लागतो आणि तो विचार आणखी ठळक करण्यासाठी रंगांमध्ये पेरावा लागतो. चित्रकार म्हणून तयार होण्याचा, नावारूपाला येण्याचा मार्ग नवशिकेपणातून जातो. त्याला ‘हॉबी पेंटिंग’ असे म्हटले जाते. काही जण अशा हॉबी पेंटर्सना कमी लेखतात. सर्जनशीलतेचा आणि हॉबी पेंटिंगचा काहीही संबंध नाही. असे हौशी चित्रकार मूळ प्रवाहाला धक्का लावत असतात, त्यांच्या चित्रकृती म्हणजे केवळ वेळ आहे म्हणून कॅन्व्हासवर केलेले रेखाटन, असेही म्हटले जाते. पण हे बऱ्याच प्रमाणात चुकीचे आहे. हॉबी पेंटिंग्जही अतिशय ताकदीच्या असू शकतात. त्यांच्यातही स्ट्रोक्स कमालीचे असतात. त्यातील मेहनत विलक्षण असते, रंगांची रचना आणि मुख्य म्हणजे चित्रकृतीतील विचार अतिशय प्रभावी असू शकतो. प्रत्येक जण आपापल्या परीने चित्रांची दुनिया जगवण्याचा प्रयत्न करतोय, हेच महत्त्वाचे.



हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे औरंगाबादेतील मालती आर्ट गॅलरीत सहा महिला चित्रकारांनी आयोजित केलेलं चित्रप्रदर्शन. ‘वुमेन आर्टिस्ट सेल्फ क्रिएटिव्ह एक्स्प्रेशन’ असं त्याचं नाव. त्यात श्वेता देवळाणकर, सानिका जैन, कीर्ती जोशी, वर्षा थोरात, मुग्धा दंडवते आणि सरिता उंबरकर-गोरे यांच्या ब्रशमधून चितारलेल्या ३० ते ३५ चित्रकृती पाहण्यास मिळाल्या. हौशी आणि व्यावसायिकतेचा संगम या प्रदर्शनात होता. त्यात हौशीपणाकडे पारडे किंचित झुकलेले होते. पण त्यामुळे चित्रांचे मोल मुळीच कमी होत नाही. उलट ते अधिक सुखावह वाटते. ‘मालती आर्ट गॅलरी’च्या विजया पातूरकर यांच्या पुढाकाराने जागतिक महिला दिनानिमित्त हे प्रदर्शन झाले.