आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात रंगांपलीकडचा विशेष रंग

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीकांत सराफ

चित्रामागील विचार, परिमिती, रंगसंगती यांचा अचूक संगम झाला की ते बघणाऱ्याच्या चित्तवृत्तीला खिळवून ठेवते. त्यात दडलेले अनेक अर्थ चित्र स्वतःच उलगडून सांगू लागते. असाच अनुभव नेहा पाटणी, सृष्टी पाटील, यशवंत शिंदे या तरुण चित्रकारांच्या चित्रकृतींतून येतो.
 
चित्रातून काहीतरी गोष्ट, विचार सांगण्याची कला दृश्य कलांमधील सर्वात प्रभावी मानली जाते. कारण बहुतांश वेळा ती त्या कलावंतांची एकट्याची ऊर्जा असते. त्यासाठी त्याने दीर्घकाळ निरीक्षण, मंथन केलेले असते. त्यातून येणारी अस्वस्थता त्याला प्रकट करायची असते. ही अस्वस्थता जेवढी खोलवर, विस्तारलेली असेल तेवढी त्याची कलाकृती समुद्राच्या तळासारखी अथांग होत जाते. कधी कधी चित्रकाराला अपेक्षित नसलेला विचारही रेखाटनातून बाहेर पडत असतो. चित्रामागील विचार, परिमिती, रंगसंगती यांचा अचूक संगम झाला की ते बघणाऱ्याच्या चित्तवृत्तीला खिळवून ठेवते. त्यात दडलेले अनेक अर्थ चित्र स्वतःच उलगडून सांगू लागते. असाच अनुभव नेहा राजेश पाटणी, सृष्टी भरत पाटील, यशवंत विजय शिंदे या तरुण चित्रकारांच्या चित्रकृतींतून येतो. त्यांच्या १०० रेखाटनांचा एक प्रकारचा महोत्सवच औरंगाबादेतील मालती आर्ट गॅलरीत नुकताच भरला होता. हे तिन्ही चित्रकार विशेष वर्गातील. जन्मतःच निसर्गाने त्यांच्यातील श्रवणशक्ती हिरावून घेतली आहे. पण, असे करताना त्यांना इतर शक्ती प्रदान करण्यास निसर्ग विसरला नाही. त्यामुळे सृष्टी, नेहा, यशवंत यांची कला पाहताना सात रंगांपलीकडचा विशेष रंग अनुभवण्यास येतो. असे म्हटले जाते की, केवळ अंगभूत कला असून चालत नाही. ती खुलवण्यासाठी एक चांगला गुरू भेटावा लागतो. या तिघांना तो कलाशिक्षक विठ्ठल पैठणकर यांच्या रूपाने भेटला. 

विशेष मुलांमधील कलागुणांना व्यापक मंच मिळवून देण्यासाठी धडपडणाऱ्या उत्कर्ष संस्थेने हा प्रदर्शन रूपातील महोत्सव आयोजित केला होता. त्यात नेहा, यशवंत, सृष्टीने कॅनव्हाॅसवर जी मांडणी केली; ती अर्थातच त्यांच्या भावविश्वातील, अनुभवातील विचारांचे प्रकटीकरण होते. त्याची विविध रूपे त्यांनी साकारली. नेहाने मास्टर्स इन फाइन आर्ट््स मध्ये शिक्षण पूर्ण करताना ‘गिटार’ हा विषय निवडला होता. गिटार हे वाद्य किती वेगवेगळ्या परिमाणात दिसू शकते; त्याचा मानवी विचारांशी कसा संबंध आहे, हे तिने ज्या सखोलतेने मांडले; ते पाहून आपण गुंतून जातो. विचार कधी भरकटतात, स्थिरावतात, कधी अक्राळविक्राळ होतात. कधी मनाच्या तळाला ढवळून काढतात. कधी आनंदाच्या लाटा निर्माण करतात, तर कधी दुःखाने वेढून टाकतात, अशी संकल्पना तिने गिटारभोवती गुंफली. प्रत्येक चित्रात ब्रशचा स्ट्रोक, रंगसंगती नेहातील कौशल्याची जाणीव करून देतेच शिवाय ती कोणत्या पद्धतीने जीवनाकडे बघते, हेही लक्षात येते. इयत्ता अकरावीची विद्यार्थिनी, बालश्री पुरस्कार विजेत्या सृष्टीची बहुतांश रेखाटने निसर्गाशी नाते सांगणारी. आजूबाजूला दिसणारा परिसर, त्यातील सौंदर्य तिने प्रत्येक चित्रात टिपले आहे. पुढील काळात जसे तिचे विश्व विस्तारत जाईल, तसे रेखाटनाचे विषय आणखी सखोल, व्यापक होत जातील, याची खात्री पटत जाते. या प्रदर्शनावर यशवंतच्या चित्रांची मोहर ठळक आणि आकर्षक होती. औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात बी. एफ. ए. पदवी मिळवलेल्या यशवंतला विषयांचे बंधन नाही. त्याने निसर्गाची अनेक रूपे तर रेखाटलीच आहेत शिवाय ऐतिहासिक प्रसंग, त्याला दिसलेली महापुरुषांची विविध रूपेही चितारली आहेत. त्यातील बाह्य आणि आतील रेषा अतिशय सूक्ष्म पण बोलक्या आहेत. विशेषतः अर्धी मांडी घालून बसलेल्या भगवान गौतम बुद्धांचे चित्र तर आपण काहीतरी नवीन, वेगळेच पाहत आहोत, हे वारंवार सांगत राहते. एवढा त्यात विचार त्याच्या कुंचल्याने प्रकट केला आहे. पुन्हा कधी ही चित्रे पाहण्यास मिळाली तर नक्की त्यांचा आस्वाद घ्यावा, एवढेच यानिमित्ताने सांगणे आहे.बातम्या आणखी आहेत...