आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंगपंचमीचं बेरंगी उपोषण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीकांत सराफ गोपीनाथ व्हिलाच्या आलिशान बेडरूममध्ये लावलेल्या कॅलेंडरची पाने पंकजाताईंनी उलटली आणि त्या ओरडल्या, राम ... राम... तसं पीए राम धावत आला. काय झालं ताई ... अरे, आपलं रंगपंचमीच्या दिवशीचं बेरंगी उपोषण दोन दिवसांवर आलंय हे सांगायचं नाही काॽ राम ओशाळवाणे होत म्हणाले, ताईसाहेब ... चार दिवसांपासून तुम्हाला मेसेज केले. कॉल केले. पण तुम्ही अजूनही नॉट रिचेबलच. रामच्या या टोमण्यानं ताई भयंकर भडकल्या. पण याच्याकडं वर्षभरात विधान परिषद मिळाल्यावर बघू, असा विचार करत त्यांनी राग गिळला. चेहऱ्यावर हास्य आणत म्हणाल्या, बरं...बरं... उपोषणाची काय तयारी सुरू आहे. राम म्हणाले, तुम्ही एकदा वेळात वेळ काढून फक्त बाल्कनीतून खाली तर पाहा. फार वेळ लागणार नाही. फक्त एकच मिनिट दर्शन द्या कार्यकर्त्यांना. त्यापेक्षा त्यांची जास्त अपेक्षा पण नाही. त्यावर ताई घसा ताणत म्हणाल्या, एनसीपी जसा सुप्रियाताईंच्या बाबांचा पक्ष, तसा भाजप माझ्याच बाबानं वाढवलेला पक्ष. एकेक कार्यकर्ता बाबांनीच  तयार केला आहे. त्यामुळं कार्यकर्त्यांचं दर्शन घेण्याची गरज नाही. फार तर पडदा सरकावून छुपी नजर मारते त्यांच्यावर. रामनं मान डोलावली. मग ताईंनी खरंच छुपी नजर मारली आणि त्या पुन्हा गुबगुबीत गादीकडे वळल्या. तेवढ्यात कायम फिरतीवर असलेले आमचे बहाद्दर मित्र स. दा. उचापते व्हिल्याच्या आवारात पोहोचले. तिथं हिरवळीवर काही कार्यकर्त्यांनी तोंडावर गमचा घेऊन झाडांखाली ताणून दिली होती. काही जण उपोषणाचे बॅनर रंगवीत होते. फलक तयार करत होते. चार-पाच जणांनी तंबाखूच्या चंच्या सोडल्या होत्या. सगळे जण अधूनमधून व्हिल्याच्या वरच्या मजल्याकडे पाहत होते. म्हणून त्यातल्या एकाच्या   तोंडावरचा गमचा बाजूला सारत उचापतेने त्याला विचारले, कामुन अशे पल्डेतॽ तर त्यानं आधी तोंडातील तंबाखूची गोळी एका दाढेखालून काढत दुसऱ्या दाढेखाली इतक्या शिताफीनं सरकवली की उचापते थक्क झाला. कुठून शिकलात ही कला, असा प्रश्न आपसूकच उचापतेच्या मुखातून बाहेर पडला. तसा दुसरा गमचेवाला म्हटला, आँ... काय बोलताय राव. साऱ्या म्हाराष्ट्राला  म्हाईताय अन् तुमाला नाई व्हय. अहो, आमच्या परमआदरणीय पंकजाताईंची कार्येपद्दती पाहून पाहून एक-एक जण तयार झालाय. ताईंनी कसं केलं ना मंत्रिपदाच्या काळातॽ ताई जलयुक्तच्या ठेक्यासाठी एकाला बलवायच्या. त्यो गडी खुश होऊन या दरवाजातून त्या दरवाजात पोचूपर्यंत दुसऱ्याला बलावून त्योच ठेका त्यालाबी देऊन टाकायच्या. आन् दोघं मिळून परत आले तर तिसऱ्याच्याच झोळीत ठेका. जलयुक्तची गोळी ताईंनी अशी सारखी इकडून तिकडं फिरवीतच ठिवली. ते ऐकून उचापते आश्चर्यचकित होत म्हणाला, पण मग अशामुळं जलयुक्तची कामं बिघडली असतील नाॽ तेवढ्यात तिथं परळीचा बिलिंदर रविकांत दाखल होत म्हणाला, ओ ... कुठल्या जगात ऱ्हाताॽ ते जलयुक्त म्हंजे काही ठेकेदार पोसण्याची सरकारी युक्ती व्हती. दुसरं कायॽ पहिला गमचेवाला उसासा टाकत म्हणाला, त्ये तर सगळ्याच पक्षाच्या राज्यातच होत असतं की. कान्ग्रेस, एनसीपी, सेनावाले पण असंच करतेत. पन तुमी त्याचं टेन्शन घेऊ नका. आमीबी तळागाळातले. पण पंकजाताईंचे निष्ठावंत. रोजचे शंभर-दोनशे रुपये मिळाले अन् न्हाई मिळाले तरी समाज म्हणून पंकजाताईंच्याच पाठीशी. कधी काही हुकलं तर धनुभाऊच्या.  कधी इकडं, कधी तिकडं. पण तिसरा नेता नकोच. त्याला मध्येच रोखत उचापते म्हणाला, बरं, बरं. पण आज इथं काय खासॽ तसं रविकांत उत्तरला, सत्ता गेल्यावर काय खास असतंय व्हय. पण तरीबी ताईंनी समाजाच्या अंगात जोश भरण्यासाठी उपोषणाची घोषणा केलीय. आँ... रंगपंचमीला उपोषणॽ दुसऱ्या गमचेवाल्यानं तंबाखूची आणखी एक फक्की भरली अन् तो म्हणाला, त्या घमंडी देवेंद्रानं पाच वर्षं ताईला काही सुखासुखी काम करूच दिलं न्हाई. जलयुक्तमध्ये तोंड घाल. चिक्कीत चिकचिक कर, असं सुरूच ठेवलं. त्येच्यामुळं ताईची सारखी चिडचिड. आमच्याशी बोलणं तर सोडाच, भेटणंही होत नव्हतं. आम्ही बंगल्यासमोर बसून बसून परेशान. पण ताईचं दर्शन नाही. साधं मोबाइलवर बोलणं नाही. कोणाला कामासाठी चिठ्ठी नाही. बदलीचं काम नाही. कोणी चुकून भेटला अन् काही काम सांगितलं तर त्येच्यावरच भडकायच्या. पन त्यात ताईंचा काईच दोष न्हाई. हे सगळ्या त्या देवेंद्र – गिरीशबाबामुळं. त्यांनी परळीत थेट धनुभाऊला घुटी दिली. सत्ता गेल्यावर पिच्छा सुटंल असं वाटलं होतं ताईला. तर त्ये पन झालं न्हाई. ताईंनी फेसबुकवर कायपन पोस्ट टाकली तर तो तिला ट्रुल करू लागला. लई हैराण केलं त्यानं. म्हणून त्याच्या बंदोबस्तासाठी रंगपंचमीला बेरंग उपोषण. हे बेरंग उपोषण नेमकं काय, असा प्रश्न उचापतेच्या चेहऱ्यावर दिसताच रविकांत एक डोळा मिचकावत म्हणाला, कसंय म्हाराज, देवेंद्र म्हंजे शा-मोदीसेठचा माणूस. त्याला डायरेक थोडीच धडकता येतंय. म्हणून ताईचे पीए हायेत ना, राम – शाम. त्यांनी आयडिया काढली. साऱ्या जगाला माहिताय मराठवाड्याचे प्रश्न सुटायला किमान हजार वर्षे हायती. पण मराठवाड्याच्या प्रश्नाचा उद्धवभाऊ बेरंग करू लागलेत, असा आरोप करून स्वतंत्र उपोषण करा. उपोषणाचा अन् पक्षाचा काय संबंध नाही, असं जाहीर करून टाका, असाही सल्ला दिला. यात वार उद्धवभाऊवर अन् खरा घाव घमंडीवर बसंल. मिडिआच घमंडीला घेरंल, असं एकनाथभाऊंनीही सांगितलं. ते ताईसाहेबांना पटलंय. एका दगडात दोन पाखरं मारायचे नाहीत. नुसता दगड उचलल्यासारखं दाखवून पाखरांना घाबरवत ठेवायचं. हा गोपीनाथरावांचा धडा ताई गिरवतायत. म्हनून तर त्या आमच्या नेत्या. हे रंगपंचमीचं बेरंगी उपोषण पाखरांना घाबरवण्यासाठी आहे. बाकी काही नाही... रविकांतचं बोलणं मोबाइलवर रेकॉर्ड झाल्याची खात्री करत उचापते उठले. घमंडीच्या बंगल्याकडं निघाले.   संपर्क- ९३४००६१६२५

बातम्या आणखी आहेत...