आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाळ्याच्या सुट्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

घराजवळच्या एका खासगी शाळेत रवी शिक्षक होता. शाळेला मान्यता नसल्यानं त्याला जेमतेम पगार होता. त्या दिवशी तो शाळेतून घरी आला आणि मुलांनी एकच गोंगाट केला. जणू काही बाबा घरी येण्याची मुलं वाटच पाहत बसली होती. तिकडं आशा, त्याची पत्नीसुद्धा स्वयंपाकघरातून पदराला हात पुसत बाहेर आली. मुलांना शांत बसायला सांगून ती नवऱ्याला पाणी आणायला आत गेली. मुलं आनंदानं कल्ला करत लाडेलाडे वडिलांजवळ आली. आता मुलं काही तरी मागणी करणार, हट्ट करणार हे रवीनं  ओळखलं.
‘ बाबा, आपण गावाला जाऊ नं. आमचे सगळे मित्र-मैत्रिणी त्यांच्या गावी गेलेत. आता तर आम्हाला सुट्याही लागल्या आहेत...’
अपेक्षेप्रमाणं मुलांनी रवीसमोर उन्हाळ्याच्या सुट्यांत गावी जाण्याची मागणी केली. ‘ हो हो, जाऊया नं हो, मलाही खूप कंटाळा आलाय. दोन - चार दिवस कुठं तरी फिरायला जाऊयात का?’ प्रश्न विचारत रवीच्या बायकोनंही मुलांच्या मागणीला पाठिंबा दिला.    
बायको मुलांची मागणी योग्यच होती. रवीला हे पटत होतं. पण तरीही त्याच्या चेहऱ्यावर चिंतेची छाया स्पष्ट दिसत होती. उदास चेहऱ्यानं तो खुर्चीवर बसून होता. एकदा तो मुलांच्या निरागस, उत्साही चेहऱ्याकडे पाहत होता, तर नंतर स्वत:च्या  हाताल्या अर्जाकडे. कुटुंबाचा गाडा सुरळीत चालावा, दोन पैसे शिल्लक राहावेत यासाठी उन्हाळ्याच्या सुट्यांमधे पेपर तपासणीच जास्तीचं काम त्यानं मागितलं होतं.
 त्यासाठी त्यानं लिहिलेला अर्ज त्याच्या हातात होता.

बातम्या आणखी आहेत...