आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीमद् भगवद‌्गीता : स्मरण मनुष्यधर्माचे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अॅड. अनिता देशमुख

पाच हजार वर्षांपूर्वी मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्ष एकादशीला भगवान श्रीकृष्णांनी पांडुपुत्र अर्जुनाला कुरुक्षेत्री उपदेश केला. हे बोधामृत भगवद‌्गीतारूपाने अजरामर झाले. त्याचीच आठवण म्हणून दरवर्षी गीता जयंती साजरी केली जाते.

परमेश्वराने आपल्याला बुद्धी व शरीर दिले. गुरुरूपात येऊन या माध्यमांद्वारे मनुष्यधर्म का व कसा पाळायचा याचं ज्ञान दिलं. हे ज्ञान म्हणजेच गीतेची आणि मनुष्यधर्माची ओळख. स्व-आत्म्याचीच नाही तर परमात्म्याचीही आठवण जागवणारे, जीवा-शिवाचं अतूट नातं सांगणाऱ्या तत्त्वज्ञानाच्या अध्ययनात तादात्म्य पावणे म्हणजे अध्यात्म. जिथे पावित्र्य, व्रतस्थता,श्रद्धा,भक्ती,त्याग, सत्य,अहिंसा,वेदनीती,भोग, निरपेक्ष कर्म इ.मानवी जीवनास परिपूर्ण,सफल करणाऱ्या जीवनमूल्यांचे समाज सातत्यासाठी आत्मसात करावयाचे अध्ययन म्हणजे अध्यात्म.

हे अध्ययन का करायचे? तर समाज धारणेसाठी उपयुक्त असणाऱ्या धर्माला ग्लानीदेखील समाजामुळेच येत असते. या सद्गुणांची संस्थापना एकदा करून भागत नाही. कारण ही उत्तम जीवनमूल्ये ही सदाच विशुद्ध स्वरूपात राहत नाहीत. काळाच्या ओघात कामादी वैकारिक भावांचा प्रादुर्भाव वाढतो. भक्तीची जागा दंभ घेतो,वैराग्याची जागा ढोंगीपणा तर ज्ञानाची जागा केवळ वाक्चातुर्य घेऊन बसते. अशा वेळी खऱ्या कर्माचे ज्ञान व भक्तीचे उत्थापन करण्यासाठी देव,प्रेषित,मानवी रूप धारण करून या धरतीवर अवतीर्ण होतात, असा सृष्टिनियम आपण मानतो. गीतेमध्ये हे श्लोकरूपात सांगितलं आहे,


‘यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ‌।। 
परित्राणाय साधुनां विनाशाय च दुष्कृताम् ।  धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युग
े ।।’

अर्थात ज्या वेळी आणि ज्या ठिकाणी अधर्माचे वर्चस्व होते, त्या वेळी भक्तांचा उद्धार करण्यासाठी आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी तसेच धर्माची पुनर्स्थापना करण्याकरिता मी स्वतः युगायुगात प्रकट होतो.’ या नियमातूनच समाज प्रबोधनासाठी भगवद्गीता, बायबल, कुराण, ग्रंथसाहिब, वेद,उपनिषद इ.ची निर्मिती झाली असे मानतो,ज्यायोगे त्या-त्या युगातील समाजधारणेस यातील तत्त्वे मार्गदर्शक ठरतील.

मानवधर्म सर्वश्रेष्ठ असण्याचे कारण हेच की, या योनीमधून मुक्तीचा मार्ग शोधता येतो. मनुष्य जन्माच्या सर्व कथा आणि व्यथा या पाप-पुण्य,सुख- दुःख या गोष्टींपर्यंत येऊन थांबतात. त्यासाठी सारासारविवेकबुद्धीचा वापर करून काय घ्यावे आणि काय त्यागावे हे ठरवता येते. पशुयोनी आणि मनुष्ययोनीत फरक करताना आपण मनुष्य जन्माला आलो तर नेमके काय करायला हवे?आमचा खरा धर्म कोणता? बदलत्या काळानुसार आचार-विचारात बदल कसे करायचे? ते धर्मसंगत कसे ठरतील? हे वा असे अनेक प्रश्न सतत पिच्छा पुरवीत  असतात. त्यांची समाधानकारक उत्तरं श्रीमद् भगवद‌्गीतेतून मिळतात. म्हणूनच गीतेला श्रीकृष्णाची वाङ‌्मय-मूर्ती म्हटलं जातं. 


‘गीताश्रsयेहं तिष्ठामि गीतामेचोत्तमं गृहमं। 
 गीताज्ञानमुपाश्रित्य त्रिलोकान् पालयाम्याह
ं ।।’
 
अर्थात गीता हेच माझे सर्वश्रेष्ठ स्थान असून मी गीता स्वरूपाने राहतो. तसेच गीतेमधून प्रतिपादित तत्त्वांच्या स्वरूपाने मी त्रिखंडाचे रक्षण करतो.


महाभारतकालीन युद्धाच्या वेळी संभ्रमित, शोकाकुल अर्जुनाने प्रभू श्रीकृष्णाला मित्र म्हणून नव्हे तर गुरुभावनेने वंदन करून व शरण जाऊन ज्ञानाची, उपदेशाची मागणी केली. त्याच वेळी श्रीकृष्णाने उपदेश केला. परमेश्वर स्वतः गुरुरूपाने ज्ञान देतात ते असे. मनुष्याला देहात्म बुद्धीतून मुक्त करण्यासाठी, एेहिक आणि पारमार्थिक भेदाभेद जाणण्यासाठीच भगवद्गीता सांगितली गेली आणि भगवंतांकडून ज्ञानप्राप्ती करून घेण्यासाठीच अर्जुन या स्थितीत राहिला होता.भगवन् म्हणतात,     


‘सर्वधर्मात्परित्यज्य मामेकं शरणं व्रज । 
अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि  मा शु
च:।।’
 
अर्थात सर्व प्रकारच्या धर्मांचा त्याग कर. मला शरण ये. मी तुझी सर्व पापकर्मातून मुक्तता करीन. तू भय बाळगू नकोस
या जगात दिव्य ज्ञानासारखे विशुद्ध आणि उदात्त असे इतर काहीही नाही. साक्षात भगवंतांनी सांगितलेले ज्ञान मनुष्याने प्राप्त केले तर त्याच्यासाठी ज्ञानाचे इतर सर्व विभाग हे आंशिक ज्ञानाप्रमाणे आहेत. हे ज्ञान मिळवणे हेच मनुष्य धर्माचे ध्येय आहे. पण मिथ्या अहंकारातून पुढील काळात आम्ही या ज्ञानाचे स्मरण ठेवले नाही आणि हजारो वर्ष अधोगतीत गेले. देश गुलामगिरीत राहिला. देश अंधश्रद्धा, कर्मकांड या चक्रात अडकला. पण या ज्ञानावर विश्वास ठेवून देश-विदेशात विश्वबंधुत्वाचा इथल्या अलौकिक तत्वज्ञानाचा प्रसार करणाऱ्या स्वामी विवेकानंदांना जागतिक धर्मपरिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करतानां विदेशी श्रोत्यांनी प्रश्न केला की, “तुमचे तत्त्वज्ञान एवढे श्रेष्ठ आहे तर तुमचा देश दरिद्री, अंधश्रद्ध आणि गुलाम का आहे?’ त्यावर स्वामीजी तत्काळ उत्तरले होते,“ते तत्त्वज्ञान आम्ही आचरणात न आणल्यामुळे.’ ही खरी शोकांतिका ठरते.

लेखिकेचा संपर्क :९८६०५१५९७७
 

बातम्या आणखी आहेत...