आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'डाग' चांगले आहेत..?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रश्न राजकारणाचा आहे. राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचा आहे. राजकारणाचे गुन्हेगारीकरण' झाले की गुन्हेगारीचे राजकारण' झाले, याचाही आहे. आणि या दोघांनाही प्रतिष्ठा प्राप्त करून देणाऱ्या समाजाचाही आहे. असे असले, तरीही या देशात कोणतीच गोष्ट गांभीर्याने घ्यायची नसते. कोणत्याही आदेशांचे, दिलेल्या निर्देशांचे, करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करायचे नसते. त्यांना केराची टोपली दाखवायची असते. या टोपलीत अलीकडे केराऐवजी असे आदेशच खूप सापडतात. अशा वातावरणातही निवडणूक आयोगाने राजकारणाचे गुन्हेगारीकरण' हा विषय भलताच गांभीर्याने घेतला. आयोगाने प्रथम निवडणूक शपथपत्रात उमेदवाराने त्याच्यावर दाखल फौजदारी म्हणजेच गुन्हेगारी प्रकरणांची माहिती देणे अनिवार्य केले! यामुळे उमेदवार पक्षी राजकारणी सुधारतील', असे आयोगास वाटले! पण, आयोगाचा लवकरच भ्रमनिरास झाला. तसा तो कधी ना कधी होणारच होता... शपथेवर खोटे बोलणे, हे राजकारणाचे पहिले क्वालिफिकेशन! फौजदारी गुन्हे असले, तरी ते विरोधकांनी रचलेले कुभांड असते, हे आयोगाने समजून घेतले नाही. त्यामुळे अशा फौजदारी गुन्ह्यांच्या डिक्लेरेशनमुळेही राजकारणाचे गुन्हेगारीकरण कमी होण्यास काहीच फायदा झाला नाही, हे आयोगाच्या लक्षात आले. मग आयोगाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. राजकीय पक्षांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना तिकीट देऊ नये, असे आदेेश देण्याची विनंतीच आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला केली. त्यावर न्यायालयाने आयोगालाच याचे निकष आणि नियमाची चौकट तयार करून देण्यास सांगितले. म्हणजे आयोगाचे पाय त्याच्याच गळ्यात लटकावले... राजकारणाचे गुन्हेगारीकरण हा तसा फार तर चर्चा वा परिसंवादाचा विषय. अशा परिसंवादात होऊ घातलेले संभावित राजकारणीही असतातच. पण, आयोगाने हा विषय भलताच गांभीर्याने घेतला आहे. तो राजकीय पक्षांवर बेतणारा आहे. स्वच्छ चारित्र्य आणि चरित्र ही राजकारणातील अंधश्रद्धा आहे. असे का कधी करायचे असते? राजकारणी आणि राज्यकर्ते छत्रपती शिवरायांपासून डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यत अनेक महापुरुषांच्या नावाने कारभार करीत असतात! त्यांनी दाखवलेल्या मार्गानेच वाटचाल करीत असतात!! म्हणजे त्या त्या कार्यक्रमात गेले की तसे बोलायचे असते. प्रत्यक्षात महापुरुषांच्या मार्गानेच वाटचाल करतो म्हटले, तर सर्वांनाच कठीण होऊन जाईल... पुतळे जाळणे, पोलिसांना मारहाण करणे, बसची तोडफोड, सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करणे, हे खरे क्वालिफिकेशन आहे. हे सर्व करणारा आज खरा सामाजिक कार्यकर्ता असतो. कपडे बदलले तर पक्षाचा आदर्श कार्यकर्ता होऊ शकतो. राजकारण्यांच्या व्यासपीठावर त्याचा वावर असतो... असे स्टेप बाय स्टेप त्यांना पुढे जायचे असते. नंतर आपणच राजकारणाच्या गुन्हेगारीकरणावर बोलायचे असते... निवडणूक आयोग राजकारणाची घडीच विस्कटवण्याला निघाला आहे! आम्ही याचा निषेध करतो! जिथे गंगेतील गटारेही स्वच्छ झाली नाहीत, तिथे राजकारणाच्या गटारगंगेची स्वच्छता केलेली चालणार नाही..!!