आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संरक्षक भिंतीला ट्रॅक्टरची धडक; घरात टीव्ही पाहणाऱ्या मायलेकांचा दुर्दैवी मृत्यू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नाशिक - सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या धाेकादायक झालेल्या संरक्षक भिंतीचे काम सुरू असताना मातीने भरलेल्या ट्रॅक्टरने धडक दिल्याने भिंत लगतच्या झोपडीवजा घरात कोसळून झालेल्या दुर्घटनेत झोपडीतील मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. उंटवाडी रोडवर सोमवारी (दि. ७) सायंकाळी सहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. 

 

पोलिस आणि अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश सरकटे परिसरातील इमारतीमध्ये साफसफाईचे काम करतात. त्यांची पत्नी सत्यभामा सरकटे (४२) परिसरात धुणे-भांड्याचे काम करते. गेल्या चार-पाच वर्षांपासून हे कुटुंब येथे खासगी जागेत वास्तव्यास आहे. सोमवारी सायंकाळी सरकटे यांची पत्नी आणि मुलगा रमेश (२०) घरात टीव्ही बघत होते. त्याचवेळी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या आवारात संरक्षक भिंतीचे काम सुरू होते. जीर्ण झालेल्या या भिंतीवर भराव टाकला जात असताना सुमारे २० फूट उंचीच्या या भिंतीवर ट्रॅक्टर धडकल्याने भिंत झोपडीवर कोसळली. माती व दगडाच्या ढिगाऱ्याखाली रमेश अाणि सत्यभामा सरकटे हे मायलेक दडपले गेले. भिंत कोसळल्याचा आवाज झाल्याने काही नागरिकांनी लागलीच धाव घेत मदतकार्य सुरू केले. तोपर्यंत अग्निशामक दलाचे जवानही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ढिगारा उपसत दोघांना बाहेर काढले व तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. रमेशचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर त्याची आई सत्यभामा गंभीर जखमी झाल्या. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना त्यांचा रात्री मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

 

बांधकाम विभागावर हलगर्जीपणाचा अाराेप 

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे भिंत कोसळल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला. भिंत जीर्ण असताना ती उतरवून न घेता तसेच काम सुरू करत मातीचा भराव टाकण्यात येत हाेता. मातीच्या वजनाने अाधीच कमकुवत झालेली भिंत ट्रॅक्टरच्या धडकेने लगेच धराशायी झाली. यात हातावर पाेट असलेले मजूर कुटुंबियांचे जीवन उद‌्ध्वस्त झाले, अशा संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.

 

रमेशला प्लंबर व्हायचे हाेते.. 

मृत रमेश प्लंबरचे शिक्षण घेऊन व्यवसाय करणार होता. यासाठी तो शिर्डी येथे प्लंबरचे शिक्षण घेण्यासाठीही गेला होता. दोन दिवसांपूर्वीच तो घरी आला होता. घरात आईसोबत गप्पा मारत असताना अचानक भिंत कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे सर्वच हळहळत हाेते. 

 

अग्निशामक जवानांचे शर्थीचे प्रयत्न 
अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्काळ मदतकार्य सुरू करत गंभीर जखमी सत्यभामा यांना बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले. त्यांना तत्काळ उपचार मिळाले; मात्र दुर्दैवाने त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. रमेशच्या डोक्यावरच दगड आणि मातीचा ढिगारा पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. इक्बाल शेख, डी. आर. लासुरे, एस. एल. खुळगे, इसाक शेख, राजेंद्र नाकील, नाना गांगुर्डे, डी. ए. चंद्रमोरे, बी. पी. परदेशी. जे. ए. सांत्रस यांनी शर्थीचे प्रयत्न केले. सत्यभामा यांचा मृत्यू झाल्याने जवानांनी हळहळ व्यक्त केली. 


वडील आणि दोन भाऊ बचावले 

प्रकाश सरकटे काही वेळापूर्वीच घरातून बाहेर आले होते. तर दोन भाऊ कामावर होते. सुदैवाने रात्री हा अपघात घडला नाही अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. 

बातम्या आणखी आहेत...