आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभारी अायुक्तांनी दिला वादग्रस्त भूसंपादनाच्या २१ काेटीला 'हात'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- गंगापूरराेडवरील अाकाशवाणी टाॅवरलगत असलेल्या वादग्रस्त भूखंडाचे २१ काेटी रुपये अदा करण्यासाठी स्थायी समितीने ब्रेक लावला असताना किंबहुना पालिकेची अार्थिक स्थिती नसल्यामुळे राेखएेवजी टीडीअार देण्याबाबत स्पष्ट अादेश असतानाही नियमित अायुक्त नसल्याचा फायदा घेत संबंधित पैसे जमीनमालकाला अदा केल्याची धक्कादायक बाब गुरुवारी उघडकीस अाली. प्रभारी अायुक्त राधाकृष्णना बी. यांनी संबंधित धनादेश अदा करण्याचे अादेश दिले असून नियमित अायुक्त राधाकृष्ण गमे हे येणार असल्याचे माहिती असतानाही त्यांनी घाईघाईत हा धनादेश का अदा केला, असा प्रश्न अाता भाजपला पडला अाहे. त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच तक्रार करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सभागृहनेते दिनकर पाटील यांनी दिली.

 

२०१५ पासून बहुचर्चित क्रीडांगणासाठी अारक्षित असलेल्या जमीन संपादनासाठी ५६ काेटी रुपये देण्याचा निर्णय २०१६ मध्ये झाला हाेता. स्थायी समितीने प्रचंड टीकेनंतर संबंधित भूखंडाच्या राेखीत संपादन केले हाेते. त्यानंतर हे प्रकरण थंड बस्त्यात हाेते. दरम्यान, दीड महिन्यापूर्वी अचानक 'वाघ'नामक मध्यस्थाने संबंधित प्रकरणातील अंतिम २१ काेटी रुपये देण्यासाठी नगररचना सहायक संचालक सुरेश निकुंभे यांच्यावर दबाव टाकल्याचे उघड झाले. या प्रकरणाचा भाजपनेच भांडाफाेड केल्यानंतर स्थायी समितीत गंभीर पडसाद उमटले हाेते. स्थायी समितीने संबंधित भूखंडासाठी राेखीत पैसे न देता टीडीअार देण्याची मागणी केल्यानंतर तसे अादेशही सभापती हिमगाैरी अाडके-अाहेर यांनी दिले हाेते. त्यानंतर सभागृहनेता दिनकर पाटील यांनी तत्कालीन अायुक्त तुकाराम मुंढे, लेखाधिकारी सुहास शिंदे, प्रशासन उपअायुक्त महेश बच्छाव यांना पत्र देत संबंधित प्रकरणात राेख माेबदला न देता टीडीअार देण्याची मागणीही केली हाेती. मात्र, मुंढे यांच्या बदलीनंतर मध्यंतरी भाजप बेसावध असल्याचे बघून राेखीत माेबदला देण्यासाठी वेगाने हालचाली झाल्या. गुरुवारी नवीन अायुक्त गमे हे पदभार स्वीकारणार असल्याचे बघून बुधवारीच प्रभारी अायुक्त राधाकृष्णन बी. यांच्यासमाेर अचानक फाइल ठेवली गेली. त्यांना संबंधित प्रकरणात राेखीत माेबदला देणे कसे गरजेचे अाहे, न्यायालयाकडून अवमानाची कारवाई हाेऊ शकते असे पटवून दिले गेले. त्यांचेही 'समाधान' झाल्यानंतर संबंधित प्रकरणात धनादेश अदा केला गेल्यामुळे भाजपला धक्का बसला.

 

स्थायी समिती सभापतींची करणार मुख्यमंत्र्यांकडे तक्रार 

सभागृहनेते दिनकर पाटील यांनी अायुक्त राधाकृष्ण गमे यांची भेट घेत तातडीने धनादेश थांबवण्याची मागणी केली. पत्रकारांशी बाेलताना ते म्हणाले की, मुळात या प्रकरणात वाघनामक व्यक्ती दलाली करीत हाेते. स्थायी समितीत अनेकवेळा चर्चा हाेऊन टीडीअार देण्याचा निर्णय झाला हाेता.मात्र असे असताना स्थायी समिती सभापती हिमगाैरी अाडके-अाहेर यांनी पुढाकार घेतल्यामुळे हा धनादेश अदा केला गेला. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असून अायुक्त गमे यांनी एकुणच प्रकरण, यातील जबाबदार अधिकाऱ्यांची चाैकशी करण्यासाठी पत्रही दिल्याचे त्यांनी सांगितले.

 

माहिती घेऊन कारवाई करणार 

या प्रकरणाबाबत अाताच सभागृहनेत्यांचे पत्र प्राप्त झाले अाहेत. अाता काय कारवाई करता येईल याबाबत चर्चा करून निर्णय घेऊ. - राधाकृष्ण गमे, अायुक्त, मनपा

 

प्रशासनाचीच जबाबदारी 

मुळात स्थायी समितीने संबधित माेबदला अदा करण्यासाठी काेणतेही अादेश दिलेले नाहीत. यापूर्वीच्या स्थायी समितीच्या ठरावानुसार कदाचित कारवाई केली असेल. ही प्रशासकीय बाब असून पैसे अदा केले असतील तर त्याची जबाबदारी प्रशासनाचीच असेल. - हिमगाैरी अाडके-अाहेर, सभापती, स्थायी समिती.

 

लेखा विभागाचा यात संबंध नसून यापूर्वी स्थायी समितीच्या सूचनेनुसार वेळाेवेळी प्रकरण परत पाठवले अाहे. प्रभारी अायुक्त राधाकृष्णन बी. यांच्या दीड पानी अादेशानुसार हे पैसे अदा केले अाहेत. - सुहास शिंदे, लेखाधिकारी, महापालिका

बातम्या आणखी आहेत...