आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठमोळा नाताळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘शांतीची रजनी

सुखाची कहाणी 
गोशाली पहुडला 
शेज तृणाची त्याला
येशू बाळ जन्मला…’
वा
‘जगी तारक जन्मा आला
चला पाहू चला हो त्याला…’

 

वसई हे मुंबई या महानगरीचं एक उपनगर, परंतु कोकणासारखं निसर्गसौंदर्याने नटलेलं. इथे स्पष्ट दिसतो भारतीय आणि पोर्तुगीज संस्कृतींचा मिलाफ. त्यामुळे इथे ख्रिस्तजन्मही साजरा होतो उत्साही, मराठी वातावरणात. नाताळात वसईकर काय काय करतात, कसा आनंद लुटतात, याची ही झलक.

 

ना ताळ म्हणजे ख्रिस्तीजनांची दिवाळी. येशूचा जन्मदिवस म्हणून हा सण जगभरातल्याप्रमाणेच भारतातही उत्साहात साजरा केला जातो. प्रभू येशूचा जन्म पॅलेस्टाईनमधीत बेथलेहेम या नगरात झाला. त्याचा जन्म नक्की कोणत्या दिवशी झाला यावर कुठेही एकवाक्यता नाही. मात्र, पूर्वी रोमन साम्राज्यात सूर्यदेवाचा सण २५ डिसेंबरला साजरा केला जाई. त्यामुळे प्रारंभीच्या ख्रिस्ती लोकांनी ख्रिस्त - जगाचा प्रकाश या अर्थाने त्याच दिवशी ख्रिस्ताचा जन्मोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. भारतातील ख्रिस्ती धर्माकडे नजर टाकल्यास दिसते की, सर्वप्रथम इ.स. ५२ ते ६० दरम्यान ख्रिस्तशिष्य संत थॉमस भारतात येऊन गेला होता. सोळाव्या शतकात, २३ डिसेंबर १५३४ रोजी पोर्तुगीजांनी वसईवर कब्जा मिळविला. त्यानंतर पोर्तुगीज व स्पॅनिश मिशनरी वसईत येऊ लागले. पोर्तुगीजांनी २०५ वर्षं वसईवर हुकूमत गाजवली. १६ मे १७३९ रोजी पोर्तुगीजांनी चिमाजीआप्पांच्या सेनेपुढे शरणागती पत्करली. दरम्यानच्या काळात इथे ख्रिस्ती धर्म बऱ्यापैकी स्थिरावला होता. ख्रिस्ती धर्माचे मूळ आशिया खंडातील असले, तरी या धर्माची जनमानसातील प्रतिमा ही एक पाश्चिमात्त्य धर्म अशीच आहे. वसई-विरार परिसरात हा धर्म युरोपियन पोर्तुगीजांनी आणला. मात्र या भूमीतील मराठमोळ्या संस्कृतीशी फारकत न घेता एक वेगळा उपासना धर्म म्हणून तो समन्वय व स्नेहभावाने आजवर वास करीत आहे.  मूळ ‘यहोशेवा’ या हिब्रू शब्दापासून येशू व ‘ख्रिस्तोस’ या ग्रीक शब्दापासून ख्रिस्त. अशा प्रकारे येशू ख्रिस्त हा मराठी शब्द बनला आहे. तीच गोष्ट नाताळची. ‘दिएस नातालीस’ या मूळ लॅटीन शब्दाचा मराठी अपभ्रंश म्हणजे नाताळ. त्याचा अर्थ जन्मदिवस. आमचे ख्रिस्तेतर बांधव इंग्रजीतून ‘हॅप्पी ख्रिस्मस’ म्हणून आम्हाला शुभेच्छा देतात. वसईत मात्र लिहिताना, बोलताना नाताळ असाच उल्लेख अगदी सहज केला जातो! नाताळच्या एक आठवडा आधीपासून नाताळ सणाला आरंभ होतो. याला आगमन काळ म्हणतात. घराघरांतून लोक प्रभूजन्माच्या तयारीला लागतात. याचाच एक भाग म्हणून येथील युवक-युवतींची गायन मंडळे संध्याकाळनंतर गावागावांतून नाताळगीतांचे गायन करीत फिरू लागतात -

‘उठा प्रभूचे स्वागत करण्या
मार्ग प्रभूचा सजवा…’
‘गाईच्या गोठ्यात ख्रिस्त जन्मला, पूर्वेच्या चांदण्यात तारा उगवला’

 

रात्रीच्या नीरव, शांत वातावरणात कानावर पडणाऱ्या अशा भक्तीपूर्ण गायनामुळे जणू देवबाळाच्या जन्माची वर्दी सर्वदूर दिली जाते व आपल्या अंत:करणात आनंदाचे सूर झंकारू लागतात. नाताळ सणाचा प्रारंभ नाताळच्या पूर्वसंध्येला, म्हणजे २४ डिसेंबरला होतो. त्या दिवशी रात्री १० वाजता वसईतील सर्व ख्रिस्तमंदिरांतून घंटानाद होतो व पुरोहित बाळ येशूच्या सन्मानार्थ प्रभूयज्ञ (होली मास) अर्पण करतात. या धार्मिक विधीसाठी धर्मग्रामस्थ सहकुटुंब हजर राहतात. हा संपूर्ण विधी मराठीतून संपन्न होतो. या वेळी तबला, पेटी, टाळ-मृदुंगाच्या साथीने नाताळ गौरवगीतांचे सामूहिक गायन होते. वसई परिसरात नाताळ सण अगदी मराठमोळ स्वरूपात साजरा केला जातो. येथील मूळची संस्कृती कृषिआधारित असल्याने गुरांचा गोठा, गाई, म्हशी, त्यामध्ये येशू बाळ व त्याची आई मरीया, पिता जोसेफ असा नाताळ देखावा उभारण्याची परंपरा खूप जुनी आहे. गवत, बांबू, माती, शेण अशा सहज उपलब्ध असणाऱ्या व पर्यावरणस्नेही वस्तूंनी हा गोठा तयार केला जातो. आता गणेशोत्सवाप्रमाणे वसईत सार्वजनिक गोशाला स्पर्धा असतात. निरनिराळया संस्था, बँका व स्थानिक शिवसेना शाखा या स्पर्धा आयोजित करतात व उत्कृष्ट गोठ्यांना पारितोषिके दिली जातात. नाताळ हा आनंदाचा, मौजमजेचा सण. त्यामुळे घरोघर गोडधोड बनवले जाते व हा फराळ शेजारी-मित्रांना वाटला जातो. यामध्ये करंज्या, शंकरपाळे, चिवडा, लाडू असे परंपरागत गोड पदार्थ असतात. टीव्ही, यूट्यूबवर खानाखजाना वगैरे आल्यावर वसईत केक्सचे आगमन झाले! आता तर सर्वधर्मीय लोक ‘ख्रिस्मस केक’ कापून नाताळ सण साजरा करतात. नाताळचे भोजन हे प्रामुख्याने मांसाहारी असते. माहेरवाशिणी तसेच जावईबापूंना सणाला आमंत्रित केले जाते. सर्व कुटुंबीय एकत्र जमून भोजन घेतात. या वेळी चिकन, मटण, वडे, विंदालु व एखादी भाजी असा मेनू असतो. नाताळचा साहित्यिक फराळही इथे जोरदार असतो. दिवाळी अंकांप्रमाणे नाताळनिमित्त वसईतून सुवार्ता, गीत, कॅथलिक, निर्भय आंदोलन, जनपरिवार असे कथा, कविता, लेख व परिसंवादाने भरगच्च नाताळ विशेषांक काढले जातात. ख्रिस्तायन हा डिजिटल स्वरूपातील अंकही प्रसिद्ध होतो. अशा प्रकारे मायमराठीतून नाताळचा साहित्यिक जागर घातला जातो. ख्रिस्मस म्हटला म्हणजे ‘ख्रिस्मस ट्री’ डोळ्यासमोर लखलखतं. ही तशी परकीय संकल्पना आपल्याकडे रूढ झाली आहे. सदाहरित वसईत ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी’ अशी मनोवृत्ती मुळावलेली असल्याने इथे प्रत्येकाच्या दारात आंबा, नारळ, केळीची झाडे डोलताना दिसतात. हेच होतात मग आमचे नाताळ वृक्ष ऊर्फ ख्रिस्मस ट्री! या झाडांवर विद्युत दिव्यांच्या माळा सोडल्या जातात. त्यामुळे रात्रीच्या वेळी ‘गगन सदन तेजोमय’ अशी दिवाळी दारोदारी उजळून निघालेली दिसते. नाताळच्या दिवशी वसईत भव्य शोभायात्रा काढल्या जातात. स्थानिक संस्कृतीचे दर्शन, विविध धर्मियांची सांस्कृतिक वैशिष्ट्ये व ख्रिस्तविचार दर्शविणारे फ्लोट्स, लेझिम तसेच बैलगाडी, टांगे, घोडे, शेळया-मेंढ्या यांसहित पारंपरिक वेशातील शेकडो स्त्री-पुरुष, मुले वाजत-गाजत मिरवणुकीने वसईभर फिरतात. नाताळची संध्याकाळ म्हणजे गावकऱ्यांचा सहकुटुंब स्नेहमेळावा असतो. आता शहरीकरण वाढत असले तरी अजूनही गाव, गावकी येथे टिकून आहेत. नाताळच्या सायंकाळी सर्व गावकरी गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी एकत्र जमतात. तिथे खेळ, स्पर्धा, हास्य-विनोद, चहा-फराळाचा आस्वाद घेतला जातो.

बातम्या आणखी आहेत...