expansion of ministry / राज्य मंत्रिमंडळ विस्तार : तीन महिन्यांसाठी १३ नवे मंत्री! राधाकृष्ण विखे, अतुल सावे, तानाजी सावंतांचा समावेश

सध्या आमदार नसलेल्या तीन नेत्यांना मिळाले थेट मंत्रिपद

विशेष प्रतिनिधी

Jun 17,2019 08:59:00 AM IST

मुंबई - बऱ्याच दिवसांपासून गाजत असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी सकाळी ११ वाजता राजभवनात पार पडला. “भारतीय जनता पार्टीचा विजय असो, आवाज कुणाचा... शिवसेनेचा’ अशा घोषणांमध्ये १३ नव्या मंत्र्यांना राज्यपाल विद्यासागर राव यांनी मंत्रिपद व गोपनीयतेची शपथ दिली. शिवसेनेला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद दिले जाईल असे म्हटले जात होते, परंतु शिवसेनेला दोन कॅबिनेट मंत्रिपदांचा लाभ झाला. या मंत्र्यांपैकी ८ कॅबिनेट, तर ५ राज्यमंत्री असतील. या मंत्र्यांमध्ये राधाकृष्ण विखे, जयदत्त क्षीरसागर व अविनाश महातेकर कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. परंतु तीन महिन्यांनंतर निवडणूक असल्याने त्यांना आता निवडून येण्याचीही गरज नाही. या नव्या १३ मंत्र्यांचे मंत्रिपद तीन महिन्यांचेच राहणार आहे.

विखेंना पहिला मान, क्षीरसागरांना दुसरा...

काँग्रेसचे माजी वरिष्ठ नेते आणि माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना पहिली शपथ घेण्याचा मान देण्यात आला. विखे पाटील यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या आणि लगेचच मंत्रिपदाची संधी मिळालेल्या जयदत्त क्षीरसागर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

उद्धव ठाकरे अनुपस्थित : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब आणि शिवसेनेच्या नवनिर्वाचित १८ खासदारांसह अयोध्येला श्रीरामांच्या दर्शनाला गेल्याने ते शपथविधीला अनुपस्थित होते.

या मंत्र्यांचे राजीनामे
प्रकाश मेहता, राजकुमार बडोले, विष्णू सावरा, दिलीप कांबळे, प्रवीण पोटे पाटील आणि राजे अंबरीश अत्राम या विद्यमान मंत्र्यांनी मंत्रिपदाचे राजीनामे दिले असून ते स्वीकारण्यात आले आहेत.

नवे मंत्री असे
> कॅबिनेट : राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर, आशिष शेलार, डॉ. संजय कुटे, सुरेश खाडे, डॉ. अनिल बोंडे, डॉ. अशोक उईके, तानाजी जयवंत सावंत,


> राज्यमंत्री : योगेश सागर, अविनाश महातेकर, संजय भेगडे, परिणय फुके, अतुल सावे.

X
COMMENT