Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | State excise raid, fake fruit beer, five people were arrested

राज्य उत्पादन शुल्कचे छापे, बनावट फ्रूट बीअर केले जप्त, पाच जण ताब्यात

श्रीनिवास दासरी | Update - Sep 02, 2018, 12:26 PM IST

'फ्रूट बिअर'च्या नावाखाली नशा येणारे रासायनिक पेय विकणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क खात्याने शुक्रवारी कारवाई केली.

  • State excise raid, fake fruit beer,  five people were arrested

    सोलापूर - 'फ्रूट बिअर'च्या नावाखाली नशा येणारे रासायनिक पेय विकणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क खात्याने शुक्रवारी कारवाई केली. पाच ठिकाणी छापे टाकून ६२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पाच जणांना ताब्यात घेतले. 'दिव्य मराठी'ने यावर प्रकाश टाकल्यानंतर यंत्रणा सक्रिय झाली. खात्याचे अधीक्षक रवींद्र आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे छापासत्र सुरू झाले. ते यापुढेही सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.

    सैदप्पा कोल्ड्रींक हाऊस (भवानी पेठ), पवार कोल्ड्रींक्स (लक्ष्मी मार्केट), दासी (घोंगडे वस्ती), सरवदे नगर (मुळेगाव रोड) आणि भवानी पेठेतील एक पत्रा शेड येथे छापे टाकण्यात आले. पाचही ठिकाणांहून १८२ लिटर पेय, ४ फ्रिज, १ सिलिंग मशीन असा एकून ६२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चेतन मोहन गोसकी (जोडभावी पेठ), सैदप्पा अर्जुन शिंदे (भवानी पेठ), सायराबानू लाडलेसाब करवल, मुरली अंजय्या श्रीपती (भवानी पेठ) आणि अजितेश अर्जुन पवार (लक्ष्मी मार्केट) यांना ताब्यात घेण्यात आले. लाडलेसाब करवल आणि राजू कोकोंडा हे संशयित फरार झाल्याचे दुय्यम निरीक्षक के. बी. बिरादार यांनी सांगितले. या कामगिरीत दुय्यम निरीक्षक ए. बी. शितोळे, आर. एस. वाकडे, एस. व्ही. बोधे आदी होते.

    आक्षेपार्ह गुंगीकारक पेय
    या कारवाईत जप्त केलेल्या फ्रूट बिअरचे विश्लेषण 'आक्षेपार्ह गुंगीकारक पेय'असे करण्यात आले आहे. या प्रकरणात ताब्यात घेतलेले पाचही जण विक्रेते आहेत. म्हणजेच यंत्रणा अद्याप उत्पादकांपर्यंत पोहोचलेली नाही. मूळ उत्पादकांवर यापूर्वी कारवाई झाली. त्यांच्या उत्पादन स्थळांना सील ठोकण्यात आले. न्यायालयात खटले भरण्यात आले. तरीही विक्रीसाठी हे पेय कुठून आले, असा प्रश्न आहे.

Trending