flood / पूरग्रस्तांसाठी केंद्राकडे ६८०० कोटींची मागणी; मदत येईपर्यंत राज्य आपत्ती निवारण निधीतून पूरग्रस्तांना करणार मदत

मंत्रिमंडळाची मंजुरी, विशेष उपसमितीची स्थापना, मदतीचे दोन भाग: प. महाराष्ट्र व कोकण-नाशिक

दिव्य मराठी वेब

Aug 14,2019 07:42:32 AM IST

मुंबई
राज्यातील पूरग्रस्त भागाच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडे ६८१३ कोटी रुपये मदतीची मागणी राज्य सरकार करेल. या प्रस्तावास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांसाठी ४७०८ कोटी तर कोकण, नाशिक आणि इतर आपत्तीग्रस्त जिल्ह्यांसाठी २१०५ कोटींची मागणी केली जाईल. ही मदत मिळेपर्यंत राज्य आपत्ती निवारण निधीतून पूरग्रस्तांना मदत केली जाणार आहे.
यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली असून याबाबतचे पुढील निर्णय घेण्याचे अधिकार या समितीला देण्यात आले आहेत. राज्यात ऑगस्टच्या प्रारंभापासून सुरू झालेल्या पावसाने काही भागात मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. नुकसानीचा अंदाज घेण्यात आला असून त्यानुसार केंद्राकडे मागणी करावयाच्या मदतीचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, सुमारे सव्वातीन लाख चतुर्थ श्रेणी राज्य सरकारी कर्मचारी पूरग्रस्तांसाठी एक दिवसाचा पगार देणार अाहेत. मुख्यमंत्री सहायता निधीत ही रक्कम जमा केली जाईल

मदतीचे दोन भाग: प. महाराष्ट्र व कोकण-नाशिक

> पहिल्या भागात कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील नुकसानीचा समावेश करण्यात आला.

> दुसऱ्या भागात कोकण, नाशिक आणि इतर जिल्ह्यांतील पूरग्रस्तांसाठी मदत.

> दोन्ही भागांत मिळून ६८१३.९२ कोटींच्या मदतीचे निवेदन केंद्र सरकारकडे सादर करण्याचा निर्णय

विभागणी अशी....
> कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील नुकसानीपोटी आपद‌‌्ग्रस्त कुटुंबीयांसाठी ३०० कोटी.
> मदतकार्यासाठी २५ कोटी, तात्पुरत्या निवारा केंद्रांतील नागरिकांसाठी २७ कोटी, स्वच्छतेसाठी ६६ ते ७० कोटी, पीक नुकसानीपोटी २०८८ कोटी, जनावरांच्या हानीपोटी ३० कोटी, मत्स्यव्यवसाय ११ कोटी, घरे दुरुस्तीसाठी २२२ कोटी, रस्ते-पुलांच्या दुरुस्तीसाठी ८७६ कोटी, सिंचन आणि जलसंपदा विभागाच्या कामांसाठी १६८ कोटी, आरोग्यविषयक उपक्रमांसाठी ७५ कोटी, शाळांच्या इमारती आणि पाणीपुरवठा १२५ कोटी, छोट्या व्यावसायिकांना ३०० कोटी अशी एकूण ४७०८.२५ कोटी मदत केली जाईल.
> याच प्रकारे कोकण, नाशिक आणि इतर जिल्ह्यांसाठी २१०५.६७ कोटींची मदत प्रस्तावित.

राष्ट्रवादीतर्फे ५० लाखांची मदत
राष्ट्रवादी काँग्रेस ट्रस्टच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे मदत निधीचा सुमारे ५० लाखांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. शिवाय पूरग्रस्तांचे तत्काळ पुनर्वसन करण्यात यावे, यासह २५ मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.

महापौर निवडणुका ३ महिने लांबणीवर
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ज्या महापालिकांतील महापौर व उपमहापौरांचा कालावधी संपुष्टात येणार आहे त्या पदांच्या निवडणुका तात्पुरत्या स्वरूपात ३ महिने पुढे ढकलण्यात येतील.

मदतकार्यातील जवानांचे अभिनंदन
मदतकार्यात चांगले कार्य केल्याबद्दल एनडीआरएफ, एसडीआरएफ, एअरफोर्स, नौदल, आर्मी, कोस्टल गार्ड आणि सर्व संबंधित यंत्रणेचे मंत्रिमंडळाने अभिनंदन केले.

X
COMMENT