आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आमदारांच्या प्रश्नावर राज्यमंत्री सावेंची गोची, अजितदादांनी सांगितला फॉर्म्युला

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रत्नागिरी जिल्ह्यात अनधिकृत उत्खननाशी संबंधित प्रश्नाच्या छापील उत्तरावर विरोधकांनी आक्षेप घेतला. संबंधित माहिती पुरवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का? यावर कागदपत्रांची शहानिशा करू, तपासून बघू, अशी उत्तरे नवनिर्वाचित उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांनी दिल्याने विरोधक आक्रमक झाले. विरोधकांच्या चक्रव्यूहात अडकलेल्या सावेंना सोडवण्यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई धावून आले. अखेरीस अजित पवार यांनी “दोषी आढळले तर त्यास निलंबित करू’, हा साचेबद्ध उत्तर देण्याचा फॉर्म्युला सांगताच सावेंची सुटका झाली.


कॅबिनेट विस्तारात पहिल्यांदाच राज्यमंत्री झालेले अतुल सावे यांनी बुधवारी तारांकित प्रश्नोत्तरांच्या तासात उद्योग आणि खनिकर्म खात्याशी संबंधित प्रश्नाला उत्तर दिले. दापोली तालुक्यातील उंबरशेत येथे आशापुरा माइनकेम लिमिटेड कंपनीने १००० एकर जागेवर अनधिकृत उत्खननाची केल्याची तक्रार आहे. १०० फुटांची परवानगी असताना ३०० ते ४०० फूट उत्खनन केले जात आहे. ग्रामस्थांचा विरोध डावलून प्रकल्प सुरू आहे. गावातील पाणी दूषित झाले आहे. आंबा, काजूचे पीक नष्ट झाले आहे. यावर काय कारवाई करणार, असा प्रश्न भांडूपचे आमदार अशोक पाटील यांनी उपस्थित केला होता.


सावेंनी लेखी उत्तर वाचून दाखवले, विरोधकांनी घेरलेे : प्रश्नावर सावे यांनी लेखी उत्तर वाचून दाखवले. हा प्रकार खरा नाही. ३-४ मीटरच उत्खनन सुरू आहे. हा प्रकल्प शेतीपासून दूर असल्याने पिकांचे नुकसान होत नाहीये. तहसीलदार, अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी यांनी प्रदूषण होत नसल्याचा अहवाल दिलाय. केंद्रीय पर्यावरण खात्याने ना-हरकत प्रमाणपत्र दिले आहे, असे सावे म्हणाले. मात्र, त्यावर विरोधकांचे समाधान नाही झाले. या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी अधिकारी पाठवणार का, असा सवाल त्यांनी केला. यावर गरज पडली तर उच्चाधिकारी पाठवून चौकशी करू, असे सावे म्हणाले. यावर विराधेकांनी परत आक्षेप घेतला. त्यावर संबंधित आमदारांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांसह पाहणी करू, असे ते म्हणाले. यावर विरोधकांनी त्यांना परत घेरले. परत पाहणी करणार, याचा अर्थ यापूर्वी अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिली. मग त्याचे निलंबन करणार का? असा प्रश्न विरोधकांनी केला. त्यावर सावे गोंधळले.


सुभाष देसाई मदतीला धावले 
सावेंच्या या उत्तरावरही विरोधकांचा गोंधळ कायम पाहून सुभाष देसाई उभे राहिले. ते म्हणाले, उंबरशेतची 
जिल्हास्तरीय पाहणी झाली आहे. परत मंत्रालयीनस्तरीय पाहणी करू. रस्ते, फळबागांचे नुकसान याची कडक तपासणी करू. दोन्ही अहवालांत तफावत आढळली तर संबंधितांवर कारवाई करू. या उत्तरावर विरोधक शांत झाले. 
 

 

सत्ताधारी सावेंना विरोधक अजित पवारांचा सल्ला
आमदार अशोक पाटील यांनी प्रकल्पासाठी एका शेतकऱ्याची जागा बळजबरीने घेतल्याची कोर्टातील कागदपत्रे दाखवत, हे खरे आहे का, संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करणार का? असा प्रश्न विचारला. त्यावर तपासून बघू, असे सावे म्हणाले. यावर विरोधकांनी परत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. मग अजित पवार उभे राहिले आणि ते खरे की नाही हे तपासण्याची गरजच काय? सत्ताधारी आमदार सांगताहेत तर ते खोटे असेल का, असा सवाल त्यांनी केला. दोषी आढळले तर निश्चित कारवाई करू, असे सांगा, असा सल्ला त्यांनी दिला. सावे म्हणाले, कागदपत्रे तर बघावी लागतील, शहनिशा करावीच लागेल. या उत्तरानंतर लगेच पुढचा प्रश्न घेतल्याने पुढील गोंधळ टळला.