आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांची सूचना प्रदेशाध्यक्ष पाटलांनीच अव्हेरली, मलिकांच्या नियुक्तीस दिला नकार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ज्या शरद पवार यांनी केवळ राज्यातच नव्हे, तर देशातही वेगळा पक्ष काढून स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यांचेच आता पक्षात ऐकले जात नाही, असे विदारक चित्र दिसू लागले आहे. सचिन अहिर यांनी राजीनामा दिल्यानंतर नवाब मलिक यांना मुंबई प्रदेश अध्यक्ष करावे, अशी सूचना त्यांनी केली असतानाही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ती अव्हेरली आणि दुसरे नाव शोधणार असल्याचे सांगितले. त्यामुळे गेले पाच दिवस राष्ट्रवादीचे मुंबई प्रदेश अध्यक्षपद रिकामे राहिले आहे.


ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला संपूर्ण महाराष्ट्रात खिंडार पडत असल्याचे दिसत आहे. अनेक मोठे नेते, आमदार, माजी मंत्री भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करत असल्याने राज्यात राष्ट्रवादी कमकुवत होत असल्याचे दिसत आहे. पक्ष सावरावा आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादीला ताकद मिळावी म्हणून शरद पवार या वयातही पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. मात्र, पक्षातच त्यांचे कुणी ऐकत नसल्याचे चित्र आहे. चित्रा वाघ यांनी राजीनामा दिल्यानंतर २४ तासांच्या आतच त्यांच्या जागेवर पुणे शहर महिला अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची नेमणूक करण्यात आली. परंतु, मुंबई प्रदेश अध्यक्षपद रिकामे ठेवण्यात आले. याबाबत राष्ट्रवादीतील सूत्रांनी सांगितले, सचिन अहिर यांनी राजीनामा दिल्यानंतर पवार यांनी नवाब मलिक यांना फोन करून तुम्ही मुंबईची जबाबदारी सांभाळा, असे सांगितले. एवढेच नव्हे, तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही याबाबतचे आदेश दिले. मात्र, जयंत पाटील यांनी पवारांनाच थांबण्याचा सल्ला देत, “मी योग्य तो निर्णय घेतो,’ असे सांगितले. आजवर असे कधीही झाले नव्हते. शरद पवार सांगतील ते तातडीने अमलात आणले जायचे, परंतु आता दिवस बदलले आहेत, असेही या नेत्याने सांगितले.


याबाबत जयंत पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळू शकला नाही. 
 

मी निवडणूक व जबाबदारीस तयार : नवाब मलिक
मला शरद पवार साहेबांनी जबाबदारी स्वीकारण्यास सांगितले होते. परंतु, मुंबई प्रदेश अध्यक्षपदाचा अजून निर्णय झालेला नाही. मला निवडणूक लढवायची असल्याने त्या पदाला न्याय देऊ शकणार नाही, असे मला वाटते. तसे मी नेत्यांना कळवले आहे. निवडणूक लढवणे आणि प्रदेश अध्यक्षपद निवडणुकीच्या काळात सांभाळणे अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडणे कठीण असते. तरीही पक्षाने माझ्यावर जबाबदारी टाकली तर मी निश्चितच स्वीकारीन आणि पदाला न्याय देईन, असे नवाब मलिक यांनी “दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

बातम्या आणखी आहेत...