आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वधूचे 42 तोळ्यांच्या दागिन्यांसह सव्वा लाख रोकड लांबविली, डॉक्टर दांपत्याच्या मुलीच्या लग्नात अल्पवयीन चोरट्याचे कृत्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहरातील प्रख्यात डॉक्टर दांपत्याच्या मुलीच्या लग्नाच्या स्वागत समारंभातून वधूचे तब्बल ४२ तोळे सोन्याचे दागिने आणि सुमारे सव्वा लाख रुपये रोख रक्कम पळवण्याची आणखी एक घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. बीड बासपासवरील गुरू लॉन्सवर झालेल्या या सोहळ्यात वधूची आई जेवत असताना तिने शेजारी ठेवलेली पर्स एका अल्पवयीन चोरट्याने पळवली. रात्री अकरा वाजता तीन जण लॉन्सवर आले. त्यापैकी एक अल्पवयीन मुलगा स्वागत समारंभात घुसला. त्याने दोन मिनिटात चोरी केली. चोरीची पर्स बाहेर उभ्या दोन तरुणांकडे देऊन हे तिघेही पसार झाले. चोरीचा हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्याने टिपला आहे.

 

लग्न समारंभात अल्पवयीन बालकांच्या मदतीने दीड महिन्यापासून चोऱ्यांचे प्रकार होत आहेत. शहरातील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डाॅ. जयंत दत्तात्रय तुपकरी (५५, रा. सारंग हाउसिंग सोसायटी, गारखेडा) यांची मुलगी कल्याणी हिचे लग्न नुकतेच पार पडले. त्यानिमित्ताने त्यांनी २५ डिसेंबर रोजी बीड बायपास येथील गुरू लॉन्सवर स्वागत समारंभाचे आयोजन केले होते. समारंभ अंतिम टप्प्यात असताना रात्री अकराच्या सुमारास डॉ. जयंत यांच्या पत्नी डॉ. ज्योती या व्यासपीठावरून खाली उतरून जेवणासाठी बसल्या व शेजारील खुर्चीवर पर्स ठेवली. ही संधी साधून एका अल्पवयीन मुलाने त्यांच्या नकळत शेजारी ठेवलेली तपकिरी रंगाची पर्स चोरून नेली. समारंभ झाल्यानंतर डॉ. ज्योती यांच्या हा प्रकार लक्षात आला. तुपकरी यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली. त्यावरून २७ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

 

दोघे दुचाकीवर थांबले होते बाहेर
पर्स चोरणारे दोघेही लॉनच्या बाहेरील व आतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. दोघेही दुचाकीवरून आले. त्यांनी समारंभात प्रवेश केला. डॉ. ज्योती या रात्री अकराच्या सुमारास स्टेजवरून खाली उतरत असताना एकाने त्यांच्या पर्सला हात लावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी चोरट्याचा प्रयत्न फसला. त्यानंतर डॉ.ज्योती कुटुंबीयांसोबत रात्री अकरा वाजेच्या सुमारास जेवणासाठी टेबलवर बसल्या. त्यांनी पर्स जवळच्या खुर्चीवर ठेवली त्याचवेळी अल्पवयीन मुलाने पर्स लांबवली आणि बाहेर वाट पाहत असलेल्या दोन तरुणांकडे पर्स सुपूर्द करून तिघेही पसार झाले.

 

आहेरात आलेले ६९ हजारही गेले
पर्समध्ये बारा हजारांचा मोबाइल, ५० हजार रोख रक्कम, ६९ हजार ६९८ रुपयांचे बंद लिफाफे व उर्वरित सर्व सोन्याचे, खड्यांचे ४२ तोळे सोन्याचे दागिने असा एकूण १३ लाख ४६ हजार ६९८ रुपयांचा ऐवज होता.

 

मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या
मागील दीड महिन्यापासून शहरातील लग्न समारंभात चोरांची टोळी सक्रिय झाली आहे. किमती ऐवज चोरीला जात आहे. रात्री नऊ ते अकराच्या दरम्यानच बहुतांश घटना घडल्या असून माेठे कार्यालय, लॉन या चोरांच्या टोळीचे टार्गेट आहे. त्यामुळे लग्न समारंभ असलेल्या कुटुंबाने दागिने, रोख रक्कम व महिलांनी पर्सची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...