आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
धुळे- लग्नासाठी कुटुंब बाहेरगावी गेल्याची संधी साधत चाेरट्यांनी घरफाेडी करून अडीच लाखांच्या रकमेवर डल्ला मारला. यात अहिरराव कुटुंबीयांनी घर बांधण्यासाठी उसनवार घेतलेली व भिशीची आलेली रक्कम चाेरट्यांनी लांबवली. चाेरट्यांचा माग घेण्यासाठी रात्री श्वान पथकाला पाचारण केले. वीरू नामक श्वानाने अंधारातही चाेरट्यांचा मार्ग शाेधला. याप्रकरणी मध्यरात्री दीड वाजता गुन्हा दाखल झाला. देवपूर पोलिसांनीही रात्रीतून तपास हाती घेत गती दिली. लवकर या गुन्ह्याची उकल होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
शहरातील मोठा पूल व आग्रारोडला लागून असलेल्या पांचाळवाड्यात संजय छगन अहिरराव यांचा रहिवास आहे. लग्नानिमित्त अहिरराव कुटुंब शनिवार (दि. २९)पासून बाहेरगावी गेले हाेते. मंगळवारी रात्री उशिरा ते घरी परतले. या वेळी दरवाजावरील कुलूप तोडलेल्या अवस्थेत दिसले. त्यामुळे अहिरराव कुटुंबीयांनी घरात जाऊन पाहणी केली तेव्हा कपाटात सुरक्षित ठेवलेली अडीच लाखांची रोकड नव्हती. यामुळे अहिरराव यांनी लागलीच देवपूर पोलिसांना बोलावले. यानंतर काही वेळातच पोलिस पथक आले. तर मुख्यालयातून श्वान पथकालाही बोलावण्यात आले. वीरू या श्वानाला घेऊन पोलिस रात्रीच घटनास्थळी दाखल झाले. या श्वानाला पोलिसांनी तुटलेले कुलूप व दरवाजाच्या कडीचा गंध दिला. यानंतर घरात घुटमळल्यानंतर वीरुने बाहेरचा रस्ता धरला. घराबाहेर येऊन उजवीकडे वळण घेत रस्त्यापर्यंत तो आला. याठिकाणी त्याने भुंकून पोलिसांना संकेत दिले. त्यामुळे पोलिसांना चोरट्यांचा मार्ग कळला. तर देवपूर पोलिसांनीही रात्रीतून तपासाला सुरुवात केली. श्वानाने दाखवलेल्या मार्गासोबतच त्यांनी परिसरातील काही जणांकडे विचारपूस केली. चोरटा याच परिसरातील असावा असा पोलिसांचा संशय आहे. त्यामुळे रात्रीप्रमाणे बुधवारी सकाळीही चौकशी सुरू होती. तर संजय अहिरराव ( वय ४८) यांच्या तक्रारीवरून मध्यरात्री ठीक दीड वाजता हा गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक स्वप्निल कोळी या घटनेचा तपास करत आहेत.
चोरट्यांची वाढली हिंमत...
पांचाळवाडा हा परिसर दाट वसाहतीचा आहे. मुख्यत: श्रमिकांची वसाहत म्हणून या परिसराकडे पाहिले जाते. दाट वसाहत असताना चोरट्यांनी चक्क दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करेपर्यंत कोणाला चाहूल का लागली नाही, हा मुख्य प्रश्न आहे. वास्तविक दाट वसाहतीत शिरून चोरी करण्याची हिंमत चोरटे दाखवत असतील तर कॉलनी व सोसायटी-संकुलांमध्येही चोरटे सहज हात साफ करू शकतात. त्यामुळे नागरिकांनीही सजग होणे गरजेचे आहे.
गुन्ह्याची लवकरच उकल
घटनेनंतर लागलीच तपास सुरू करण्यात आला आहे. याप्रकरणी काही जणांकडे चौकशीही सुरू आहे. आतापर्यंतची परिस्थिती पाहता लवकरच या गुन्ह्याची उकल होईल, असा विश्वास आहे. चोरटा याच परिसरातील असल्याचा संशय आहे. -स्वप्निल कोळी, पोलिस उपनिरीक्षक, देवपूर पोलिस ठाणे
घरासाठी लाखोंचा जुगाड...
अहिरराव यांना शहरापासून जवळ असलेल्या बाळापूर शिवारात घर बांधायचे होते. त्यासाठी त्यांनी काही पैसा गोळा केला होता. तर आपल्या एका जवळच्या नातलगाकडून एक लाख रुपये उसनवार घेतले होते. शिवाय भिशीचे पैसेही त्यांना मिळाले होते. त्यामुळे लग्नावरून आल्यावर घर बांधकामाकडे लक्ष देण्याचा त्यांचा विचार होता; परंतु त्यापूर्वीच चोरट्यांनी संधी हेरली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.