आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वणी गडावर गेलेल्या कुटुंबीयांच्या घरात साडेपाच लाख रुपयांची चाेरी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- नाशिक येथे वणी गडावर देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या सदाशिवनगरातील कुटुंबीयांच्या घरात चोरट्यांनी साडेचार लाख रुपये रोख व सोने- चांदीच्या दागिन्यांसह सुमारे ५ लाख २३ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला. कुटुंबीय देवदर्शनावरून घरी परतल्यानंतर गुरुवारी ही घरफोडी उघडकीस आली.

 
शेतीसाठी लागणाऱ्या ऑर्गेनिक खते व द्रव्य बनवणे व विक्रीचा व्यवसाय करणारे दादाराव देविदास सोनवणे हे कुटुंबीयांसह सदाशिवनगरातील सुनंदिनी पार्कमध्ये राहतात. त्यांच्या दोन मुलींनी पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रवेश घेतलेला आहे. मात्र, सदाशिवनगरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे त्यांना या घरात येण्या-जाण्यासाठी त्रास होत होता. त्यांनी या घराऐवजी खोटेनगर येथे साईश्रद्धा विला येथे भाड्याने घर घेतले आहे. सोनवणे कुटुंबीय या दोन्ही घरात राहतात. ते सदाशिवनगरातील घराला कुलूप लावून कुटुंबीयांसह वणी येथे देवीच्या दर्शनासाठी गेले होते. त्यानंतर ते ३ जानेवारी रोजी पहाटे जळगाव शहरातील खोटेनगर येथील घरी आले. थंडी असल्याने त्यांनी सदाशिवनगरातील घरी जाणे टाळले. सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास सदाशिवनगरातील घराच्या मुख्य दरवाजाचे कुलपे तोडलेले असल्याबाबत त्यांचे शेजारी किरण भावसार यांनी त्यांना कळवले. त्यानंतर सोनवणे व त्यांच्या पत्नी सदाशिवनगरातील घरी आल्या. त्यांनी घरात जावून पाहिले असता, घरातील सर्व साहित्य व संसारोपयोगी वस्तू अस्ताव्यस्त फेकलेल्या होत्या. बेडरूममधील कपाटात ठेवलेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने दिसून आले नाहीत. तसेच हॉलमधील कपाटातील चांदीचा हत्ती चोरट्यांनी चोरून नेला आहे. याप्रकरणी सोनवणे यांच्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

घरफोडीमध्ये चोरीला गेलेल्या वस्तू : 
साडेचार लाख रुपये रोख, अडीच हजार रुपये किमतीचा पाच भारचा चांदीचा हत्ती, ३० हजार रुपये किमतीच्या १० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, ७ हजार रुपये किमतीच्या अडीच ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या, ९ हजार रुपये किमतीच्या साडेतीन ग्रॅम वजनाच्या कानातील रिंग, ३ हजार रुपयांची एक ग्रॅम वजनाची सोन्याची ज्योती, ८०० रुपये किमतीचे चांदीचे शिक्के, असा एकूण ५ लाख २३ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. दरम्यान, शहरात चाेरीच्या घटनामध्ये वाढ झाली असून पाेलिसांनी रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी हाेत आहे. 

 

घरबांधण्यासाठीची जमापुंजी चाेरट्यांनी लांबवली 
सोनवणे यांनी भुसावळ येथील शिवपूर कन्हाळा येथे प्लॉट घेतलेला आहे. तेथे घर बांधायचे असल्याने जमा केलेले दीड लाख रुपये व सासूकडून घेतलेले ३ लाख रुपये त्यांनी घरातील गोदरेज कपाटात ठेवले होते. घरातील पहिल्या खोलीतील कपाटाला कुलूप लावलेले नव्हते. तसेच बेडरूममधील कपाटातील तिजोरीमध्ये साडेचार लाख रुपये ठेवले होते. तिजोरीस चावी नसल्याने कुलूप लावले नव्हते. २ जानेवारी रोजी सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास सदाशिवनगरातील घरातील बेडरूममध्ये सोनवणे यांनी रोख ही रक्कम ठेवली होती. दोन्ही दरवाजांना कुलूप लावून ते वणी गडावर देवीच्या दर्शनासाठी कुटुंबासह गेले होते.