आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लातूरमधील 'ती' चोरी 25 लाखांची; ग्रामीण भागातही घर फोडून हजारोंचा ऐवज लंपास

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- लातूर शहरातील कंत्राटदार विवेक रेड्डी यांच्या घरात रविवारी पहाटे झालेल्या चोरीत २५ लाखांचा ऐवज चोरीला गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सोमवारी रात्री रेड्डी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ते नववर्षाचे स्वागत करण्यासाठी कुटुंबीयांसोबत बाहेरगावी गेले होते. त्यावेळी त्यांच्या घरात कुणीही नव्हते. खालच्या मजल्यावरील भाडेकरू आणि सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून रविवारी पहाटे चोरटे घरात शिरले. त्यांनी कपाटातील रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने असा २५ लाखांचा ऐवज पळवला आहे. त्याचबरोबर परकीय चलनातील काही रक्कम कपाटात होती. तीही चोरीला गेली आहे. तसेच एक पिस्तूल आणि काही काडतुसेही चोरीला गेली आहेत. या तक्रारीवरून शिवाजीनगर ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नववर्षांच्या प्रारंभीच पोलिसांना या चोरीचा तपास करण्याचे आव्हान असणार आहे. 

 

ग्रामीण भागातही चोरी 
दरम्यान, रेणापूर तालुक्यातील भंडारवाडी येथील एक बंद असलेले घर फोडून चोरट्यांनी ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पळवले. सुरेश नागनाथ शेळके यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की त्यांच्या बंद असलेल्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. कपाटाचे कुलूप तोडून तेथे ठेवलेले चार तोळयांचे सोन्याचे दागिने चोरले. याप्रकरणी रेणापूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.