आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरटे 24 तासांत तावडीत; सहा दिवसांनंतरही दानपेटी सापडेना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- गुन्ह्यांच्या तपासात चोरांच्या मुसक्या आवळण्याप्रमाणेच ऐवज हस्तगत करण्याचेही आव्हान पोलिसांसमोर असते. परंतु, संस्थान गणपती मंदिरातील दानपेटीच्या चोरी प्रकरणात पोलिस अर्ध्याच यशाचे मानकरी ठरले आहेत. चोरीच्या घटनेनंतर गुन्हे शाखा सिटी चाैक पोलिसांनी अवघ्या २४ तासांत चोरट्यांना गजाआड केले खरे; परंतु सहा दिवसांनंतरही दानपेटी मात्र त्यांच्या हाती लागलेली नाही.

 

शहराचे ग्रामदैवत असलेल्या राजाबाजार येथील संस्थान गणपती मंदिरातून २३ डिसेंबर रोजी पहाटे पाचच्या सुमारास रिक्षातून आलेल्या चोरट्यांनी ही अवजड दानपेटी पळवली. सिटी चौक पोलिस व गुन्हे शाखेने पिराजी संजय सोनवणे (३०) व इब्राहिम खान आलम खान (३३, रा. दोघेही पडेगाव) या चोरट्यांना २४ तासांत अटक केली. मात्र, आरोपींची पोलिस कोठडी संपली तरी त्यांनी विहिरीत फेकलेली दानपेटी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही.

 

दरम्यान, पोलिस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने दोन्ही आरोपींची रवानगी हर्सूल कारागृहात केली आहे. पैसे काढून जिल्हा परिषद मैदानावरील विहिरीत दानपेटी फेकल्याचे आरोपींनी सांगितले होते. पोलिसांनी विहिरीत दोन दिवस शोध घेतला. परंतु दानपेटी न आढळल्याने ती पुन्हा चोरीला गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

 

पोलिसांसमोर प्रश्न : दानपेटी गेली कुठे?
विहिरीतून काढून दानपेटी भंगार विक्रेत्यांना विकली असावी, या अंदाजावरून सिटी चौक पोलिसांनी परिसरातील काही भंगार विक्रेेत्यांची चौकशी केली. आरोपींनी ती उघड्यावर फेकली असावी आणि पहाटे कचरा वेचण्यासाठी आलेल्या महिलांनी ती पळवली असावी, या संशयावरून पोलिसांनी सफाई कर्मचाऱ्यांचीही पाच तास चौकशी केली. त्यातूनही काही हाती लागले नाही. त्यामुळे ही दानपेटी गेली कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.


चोरीच्या घटनेनंतर संस्थान गणपती मंदिरात आता नव्या दानपेटी बसवण्याचे काम सुरू असून ती नट-बोल्टने जमिनीत पक्की बसवली जाणार असून पुन्हा चोरी होऊ नये, यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत, असे मंदिराचे विश्वस्त अनिल चव्हाण यांनी सांगितले.

 

बातम्या आणखी आहेत...