आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटातलं ओठात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘डॉक्टर, माझ्या पोटात हल्ली प्रचंड दुखतं.’
‘हंऽऽऽऽ, झोपा बघू त्या टेबलावर. इथं दुखतं? इथं? की या बाजूला?’
‘जरा आणखी खाली, मध्यभागी!’
‘इथं?’
‘ओयोयोयोयोयो!’
‘अच्छा, बेंबीजवळ दुखतंय तर.’
‘भयंकर!’
‘मोठ्ठा आऽऽऽऽ करा पाहू.’
‘आऽऽऽऽ.’
‘अरे बापरे! अशी केस पहिल्यांदाच पाहतोय!’
‘काय झालं डॉक्टर? एनीथिंग सीरियस?’
‘नाही म्हटलं तरी सीरियसच आहे.’
‘पण झालंय तरी काय नेमकं?’
‘तुमच्या बेंबीच्या देठावर ना, सूज आलीय.’
‘अरे बापरे! मग आता काय करायचं?’
‘भाषणं देताना बेंबीच्या देठापासून मुळीच ओरडायचं नाही. नाहीतर बेंबीचं देठ खूऽऽऽऽप लांब होईल आणि मग ते कोणत्या मार्गानं बाहेर येईल ते सांगता येणार नाही!’
‘हल्ली या विमान कंपन्यांची काळजीच वाटायला लागलीय!’
‘पण तुम्ही कुठं विमानानं प्रवास करता? तुम्ही लाल डब्बावाले.’
‘खरंय, पण आपल्याच देशांतल्या कंपन्या त्या. एकेक कंपनी बंद पडली की जीव कसा तीळतीळ तुटतो.’
‘कंपन्या त्यांच्या, अन् जीव मात्र तुमचा तुटतो तीळतीळ!’
‘एक जबाबदार भारतीय नागरिक या नात्यानं...’
‘एक जबाबदार भारतीय नागरिक या नात्यानं काय करणार आहात तुम्ही? तुमचा प्रॉव्हिडंट फंड देऊन टाकणार आहात?’
‘तसं नव्हे अगदी, पण परवा त्या जेट कंपनीचं काय झालं पाहिलंत ना? अन् आता त्या स्पाइसजेट कंपनीबद्दल नाही नाही ते ऐकायला येतंय.’
‘स्पाइसजेटचं अजिबात टेन्शन घेऊ नका, बरं का.’
‘टेन्शन घेऊ नका? म्हणजे?’
‘अहो, ती जेट म्हणजे साधी जेट होती. स्पाइसजेट म्हणजे मसाला जेट आहे!’
‘अहो, पुरणपोळी वाढू का आणखी?’
‘हं, वाढ ना. आणखी तूप टाक. कंजूषी नको.’
‘अहो, कोलेस्टे...’
‘छ्या, गोळी घेतोय ना मी. आणि कटाची आमटी पण वाढ. भुर्रुक!’
‘कसा झाला आजचा प्रोग्राम?’
‘मस्तच. बटाट्याची भाजी काय चमचमीत केलीयस!’
‘बऱ्याच जणांनी भाग घेतला होता म्हणे.’
‘हो ना! कुरड्या टाक दोन-चार... भजीपण.’
‘कशी गायलीत पोरं?’
‘बहार आणली सगळ्यांनी. पुरणपोळी बासुंदीत बुडवून खाल्ली तरी चालतं ना गं’
‘मग पहिलं कोण आलं?’
‘अगं, आम्हा परीक्षकांचा अगदी कस पाहिला पोरांनी. परवा रविवार आहे बरं का. मटणाचा बेत होउन जाऊ दे.’
‘कोणाचा आला पहिला नंबर?’
‘एक मुलगी होती. नाव विसरलो. अरे वा, रताळ्याच्या पुऱ्यापण केल्यायस? छान!’
‘आणि कुठलं गाणं म्हटलं होतं तिनं?’
“भारतीय नागरिकांचा घास रोज अडतो ओठी, सैनिकहो तुमच्यासाठी...” अगं अशी मठ्ठासारखी काय उभी आहेस? पुरणपोळी कधीचीच संपलीय बघ ताटातली!’
‘बघा मोटाभाय, निवडणुका शेवटच्या टप्प्यांत असताना हे काय घडलंय?’
‘ते गडचिरोलीतल्या नक्षलवादी हल्ल्याबद्दल म्हणताय ना? फारच वाईट घडलंय!’
‘अग आता काय करायचं?’
‘काय म्हणजे? सणसणीत निषेध नोंदवलाय की आपण!
‘पब्लिकला ते निषेध वगैरे जाम रूटीन वाटू लागलंय.’
‘मग असं करूया, माझ्या पुढच्या भाषणांमधे आपण काही अगदी नवीन मुद्दे जोडायला पाहिजेत. जरा टिपून घेता का?’
‘नवीन मुद्दे? ते कोणते?’
‘एक- हे हल्ले म्हणजे सध्याच्या सरकारच्या निश्क्रियतेचा आणि अयशस्वी धोरणांचा परिपाक आहे.’
‘सरकार आपलंच आहे की मोटाभाय!’
‘मान्य, पण लोकांच्या नाही येत पटकन लक्षात ते. मुद्दा दुसरा- असे हल्ले होऊ द्यायचे नसतील तर या नालायक सरकारला सत्तेबाहेर खेचलंच पाहिजे. आमचंच सरकार कायम सत्तेवर असलं पाहिजे. मुद्दा तिसरा- आणि हा खूप महत्त्वाचा आहे, बरं का.’
‘सांगा मोटाभाय. लिहितोय मी.’ 
‘तर मुद्दा तिसरा- गडचिरोलीत नव्यानं शहीद झालेल्या जवानांच्या नावानं डोळ्यांत पाणी आणायचं आणि त्यांच्या नावानं मतं देण्याचं आवाहन करायचं.’
‘बेस्ट, तुमची भाषणं नव्यानं ड्राफ्ट करायला सांगतो.’
‘आणि हे बघा.’
‘बोला मोटाभाय.’
‘नुकतंच त्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलंय ना यू.एन. नं?’
‘हो, तो मुद्दा कसा टाकायचा?’
‘जे नेहरू करू शकले नाहीत ते मी केलं असं सांगायचं!’

gajootayde@gmail.com

बातम्या आणखी आहेत...