Stone pelting / वादग्रस्त फेसबुक पोस्टमुळे लातुरात दुकाने, बसवर दगडफेक

शहरात काही काळ तणाव, तिघांना घेतले ताब्यात

दिव्य मराठी

Jul 28,2019 08:31:00 AM IST

लातूर - राष्ट्रपुरुषांची बदनामी करणाऱ्या फेसबुकवरील एका वादग्रस्त पोस्टवरून लातूर शहरात शनिवारी सकाळी काही काळ तणाव निर्माण झाला. या पोस्टवरून भडकलेल्या तरुणांनी अचानक रस्त्यावर उतरून दोन बसच्या काचा फोडल्या. तसेच गंजगोलाई, मिनी मार्केट परिसरात दुकानांवर दगडफेक केली. पोलिसांनी तातडीने कारवाई केल्यानंतर हे प्रकार थांबले.


लातूर शहरात शनिवारी सकाळी सर्व व्यवहार सुरळीत सुरू असतानाच संतप्त तरुणांचा एक गट अचानक रस्त्यावर उतरला. लोकांनी कारण विचारल्यानंतर फेसबुकवर राष्ट्रपुरुषांची बदनामी करणारी पोस्ट टाकल्याच्या निषेधार्थ आंदोलन सुरू केल्याचे सांगण्यात आले. या तरुणांनी विवेकानंद चौकातील दुकानांवर दगडफेक केली. अहमदपूर-पुणे या एसटी बसवर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या. चौकातच असलेल्या पोलिस ठाण्यातील कर्मचारी धावतच तेथे पोहोचले. त्यांनी हस्तक्षेप करून तरुणांना बाजूला केले. त्यातच शहरातील गंजगोलाई, मिनी मार्केट भागातील दुकानांवरही दगडफेक करण्यात आली. त्यामुळे या परिसरातील दुकाने काही काळ बंद झाली. पोलिस अधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून हे प्रकार बंद केले. विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतले आहे. वादग्रस्त फेसबुक पोस्ट टाकणाऱ्यावरही कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

X