आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला चालवतात क्रेन तर पुरुष फोडतात पाषाण; विहीर खोदकाम करणाऱ्यांना ‘ना विमा-ना सुरक्षा’

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - जालन्याच्या औद्योगिक वसाहतीत स्थानिकपेक्षा परराज्यातील कामगार जास्त आहेत. आता तर पाण्याअभावी देशातील बहुतांश राज्य दुष्काळाच्या गर्तेत आहेत. पाण्याअभावी जिल्ह्यातील ४९ हजार ७७४ विहिरींपैकी बहुतांश विहिरी कोरड्या पडल्या आहेत. यामुळे नवीन विहिरी खोदणे, खोलीकरण, बोअर घेऊन पिण्याचे पाण्यासह ०.२६ लाख हेक्टर क्षेत्र असलेल्या फळपिके जगविण्यासाठी शेतकरी धडपड करताहेत. विहिरींची खोदकामे करण्यासाठी राजस्थान, बिहार या दोन्ही राज्यांतून ४५० कुटुंबे जालन्यात आले आहेत. परराज्यातून आलेल्या महिला क्रेन चालवितात तर पुरुष विहिरीत उतरुन काळ्या पाषाणासारखा खडक फोडून ते डब्बर क्रेनव्दारे बाहेर काढतात. दुसऱ्या विहिरींचे काम मिळावे म्हणून ६० फूट खोल असलेल्या विहिरी २३ दिवसांत खोदून देतात, परंतु ही खोदकामे करणारांसाठी कुठल्याच प्रकारचा “विमा ना-सुरक्षा नसून’ जीव धोक्यात घालून पोटाची खळगी भरावी लागत आहे.

 
जालना कामगार विभागाकडे बहुतांश गुत्तेदारांची नोंद आहे, परंतु या गुत्तेदारांमार्फत बांधकामे करुन घेतली जातात, परंतु कुठल्याच गुत्तेदारांमार्फत विहिरींची खोदकामे होत नसल्यामुळे कामगार मात्र या सुविधांपासून वंचितच आहेत. दम्यान, कामगार कार्यालयाकडून बांधकाम, माथाडी कामगार यांच्यासाठी विविध योजना आणलेल्या आहेत. नोंदणी केलेल्या कामगारांना सुरक्षा किटही दिली जाते. यात या कामगारांना आरोग्य किट, प्राथमिक उपचार पेटी, टोपी, पायातील मोजे, बूट यासह त्या वस्तू ठेवण्यासाठी बॅगही दिली जाते. या मजुरांना काही प्रमाणात का होईना सुरक्षा मिळते, परंतु विहिरींवर कामे करणारांना कुठल्याच प्रकारची सुविधा नसते. यामुळे अनेकदा घडलेल्या दुर्घटनांतून कुठल्याच प्रकारची मदत या कामगारांना मिळत नाही. बऱ्याचदा विहिरींची कामेही खासगी स्तरावर असतात. गेल्या काही महिन्यांपासून गावात हाताला काम न मिळणे, पाण्यासाठी होणारी भटकंती, सततचा दुष्काळ यामुळे घरातील कर्ता व तरुण असलेल्यांना काम करण्याची नितांत गरज असते. घरची वयोवृध्द आजी, आजोबांना घरी ठेवून दुष्काळात मिळेल तेथे काम करण्यासाठी जावे लागते. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून पाणीटंचाईने रौद्ररुप धारण केले आहे. पाणी नसल्यामुळे बेरोजगारांची संख्या वाढू लागली आहे. गावेच्या गावे ओस पडू लागली आहेत. जालना जिल्हा हा औद्योगिकतेसाठी जगभर प्रसिध्द झाला आहे.
 यामुळे या जिल्ह्यात काम करण्यासाठी येणारांची ओढही वावगी ठरणारी नाही. यामुळे जालना जिल्ह्यात असलेल्या ४०० च्या जवळपास स्टिल, लोखंड, टाक्या तयार करणे, सिडस, सळ्यांच्या बहुतांश कंपन्यांमध्ये बिहार राज्यातील कामगार आहेत. औद्योगिक वसाहतीत ४२ ते ४४ च्या तापमानात काम करणे हे खूप जिकिरीचे असते, परंतु पोटाची खळगी भरण्यासाठी काम करणेही गरजेचे असतेच. चालू वर्षात पाणी टंचाईने तर विक्रम गाठला आहे. जिल्ह्यातील बहुतांश सर्वच धरणे कोरडीठाक पडल्यामुळे पाणी टंचाईमुळे तीव्र दुष्काळ अधिकच तीव्र झाला आहे. पाणी टंचाईमुळे जिल्ह्यातील २ हजार ४०० हेक्टरवरील फळबागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी विहिरी खोदणे, कमी पाणी पडू लागल्यामुळे विहिरींचे खोलीकरण करणे सुरु केले आहे. विहिरी खोदण्याची कामे करण्यासाठी क्रेन, मजूर हे सर्वच सोबत ठेवून राजस्थान, बिहारचे अनेक कुटुंबे या कामांसाठी स्थायिक झाले आहेत. राजस्थानात अगोदरच तीव्र पाणी टंचाई असते. 


आजघडीला जिल्ह्यात विविध तालुक्यांच्या ठिकाणी, गावांमध्ये ४५० च्या जवळपास कुटुंबे कामासाठी आलेले आहेत. यात महिलाही घरी न बसता विहिरीच्या खोदकामासाठी जातात. सर्वच कुटुंबे विहिरीच्या खोदकामाला जुंपले जाते. विहिरीचे लवकरात लवकर काम करुन घेण्यासाठी हे कुटुंबे दिवसरात्र मेहनत घेऊन पोटाची खळगी भरत असतात. 

 

मन हेलावणाऱ्या महिनाभरात दोन घटना 
विहिरीतील खडक फोडण्यासाठी गुत्तेदारांकडून जिलेटीन कांड्याचा वापर करुन विहीर फोडली जाते. परंतु याचे दुष्परिणाम अनेक आहेत. दरम्यान, अंबड तालुक्यातील वलखेड येथे दगडाच्या खाणीत केलेल्या जिलेटीन स्फोटात दोन सख्खे भाऊ जागीच ठार झाल्याची घटना २१ मे रोजी घडली. तर भोकरदन तालुक्यातील उंबरखेड येथेही याच महिन्यात क्रेनच्या सापड्यातून दगड पडून एका मजुराचा मृत्यू झाला आहे.