आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनमाड येथून सुटणारी राज्यराणी, अजिंठा एक्स्प्रेस भुसावळहून सोडा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - मनमाड ते मुंबई ही राज्यराणी आणि मनमाड ते सिकंदराबाद ही अजिंठा एक्स्प्रेस भुसावळ येथून सोडावी. भुसावळ ते पुणे नवीन गाडी, जळगाव स्थानकावरील पार्किंगचा प्रश्न सोडवून शिवाजीनगरकडील बाजूने पार्किंग, तिकीट खिडकी सुरू करणे आणि धावत्या गाड्यांमध्ये तृतीयपंथीयांकडून प्रवाशांना होणारा त्रास या मुद्द्यांवर बुधवारी झालेली विभागीय रेल्वे सल्लागार समितीची बैठक गाजली. दररोज हजारो प्रवासी, पर्यटकांची ये-जा असलेल्या श्री क्षेत्र शेगाव येथील स्थानकावर सर्व सुपरफास्ट रेल्वे गाड्यांना थांबा द्यावा, असा आग्रहदेखील सदस्यांनी बैठकीत धरला. 

 

बुधवारी दुपारी ३ वाजता झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी डीआरएम आर.के.यादव हाेते. वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांनी प्रास्ताविक केले. बैठकीत समितीचे भुसावळ येथील सदस्य अनिकेत पाटील यांनी, गेल्या पाच वर्षांपासून हुतात्मा एक्स्प्रेसला तीन स्लिपर काेच लावावे, अशी मागणी हाेत आहे. गरज असून देखील ही मागणी दुर्लक्षित का? असा प्रश्न उपस्थित केला. मात्र, हुतात्मा एक्स्प्रेसला स्लिपर कोच लावण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मुख्यालयाशी पत्रव्यवहार सुरू केला आहे, असे डीआरएम यादव यांनी सांगितले. यानंतर पाटील यांनी, रेल्वे स्थानकांवर मेडीकल स्टोअर्स सुरू करावे, अशी सूचना केली होती. त्यास प्रशासनाने लेखी उत्तरातून सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र, जेनरिक औषधी विक्रीबाबत रेल्वेचे धोरण नाही. रेल्वे बोर्डाची मल्टीपर्पज स्टॉल्सची योजना असून त्यात आवश्यक औषधीची विक्री करता येईल. विशेषत: या दुकानातून अाैषधी घेण्यासाठी डाॅक्टरांच्या चिठ्ठीची गरज पडणार नाही, असे सांगण्यात आले. 

 

विभागीय रेल्वे सल्लागार समिती बैठकीत सदस्यांचा आग्रह जळगाव स्थानकाच्या उत्तर बाजूने हवी तिकीट खिडकी 

समितीचे सदस्य राजेश झंवर यांनी मनमाड-मुंबई राज्यराणी आणि मनमाड-सिकंदराबाबद अजिंठा एक्स्प्रेस भुसावळ येथून सोडावी, ही मागणी लावून धरली. गनी मेमन यांनी जळगाव रेल्वे स्थानकावरील पार्किंगचा प्रश्न मांडून भुसावळ ते पुणे या मार्गावर नवीन गाडी सुरू करण्याचा आग्रह धरला. जळगावचे ललित बरडिया यांनी शिवाजी नगरकडील बाजूकडे पार्किंग अाणि तिकीट खिडकीची मागणी केली. अमरावती येथील किशाेर बाेरकर यांनी बडनेरा येथील रेल्वे वॅगन कारखाना, अमरावती येथील अंडरग्राऊंड मार्गात पावसाळ्यात पाणी साचून गैरसोय होते, हा मुद्दा उपस्थित केला. शेगावचे दिवाकर शिंदे यांनी श्री क्षेत्र शेगाव येथे येणारे भाविक, पर्यटकांसाठी शेगाव स्थानकावर सर्व सुपरफास्ट गाड्यांना थांबा द्यावा, अशी मागणी केली. तर अकोला येथील वसंत बाछुका यांनी धावत्या रेल्वे गाड्यांमध्ये तृतीयपंथीयांचा प्रवाशांना होणारा त्रास थांबणार कधी? अशी विचारणा केली. 

 

यांची हाेती उपस्थिती 

बैठकीला मंडळ वाणिज्य प्रबंधक व्ही.पी.दहाट, वरिष्ठ मंडळ अभियंता (इंजीनिअरिंग) राजेश चिखले, वरिष्ठ मंडल परिचालन प्रबधंक डाॅ.स्वप्निल नीला, वरिष्ठ सिग्नल दूरसंचार अभियंता निशांत द्विवेदी, मंडल सुरक्षा आयुक्त राजेश दीक्षित, सहायक वाणिज्य प्रबंधक अजय कुमार, श्याम कुलकर्णी या अधिकाऱ्यांसह विजय बाफना (बुलडाणा), नितीन बंग (धुळे), महेश पाटणकर (नाशिक), ज्ञानप्रकाश खंडेलवाल, वसंत बाछुका, दीपक मायी, विजय पनपालिया (अकोला), ललित बरडिया, गनी मेमन, डॉ.सोनल नंदाश्री (जळगाव), मनोज सोनी (खंडवा), अनिकेत पाटील, राजेश झंवर, राजेश सुराणा (भुसावळ), महेंद्र बुरड (मलकापूर), धर्मा पाटील (पाचोरा), किशोर बोरकर (अमरावती), रवी मलानी (नेपानगर), मोहन शर्मा (मलकापूर), महेश पाटील (अमळनेर), दिवाकर शिंदे (शेगाव) हे सदस्य उपस्थित होते. 

बातम्या आणखी आहेत...