Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Stop way protest against the administration

अन्यायग्रस्तांना न्याय देण्याऐवजी पोलिसांचे वाळूतस्करांना संरक्षण; प्रशासनाच्या निषेधार्थ रास्ता रोको

प्रतिनिधी | Update - Aug 28, 2018, 10:50 AM IST

वाळूतस्करांकडून माणसांपाठोपाठ जनावरे चिरडण्याचे काम सुरू अाहे. मात्र, पोलिस व महसूल प्रशासन अन्यायग्रस्ताला न्याय देण्या

 • Stop way protest against the administration

  राहुरी शहर- वाळूतस्करांकडून माणसांपाठोपाठ जनावरे चिरडण्याचे काम सुरू अाहे. मात्र, पोलिस व महसूल प्रशासन अन्यायग्रस्ताला न्याय देण्याऐवजी वाळूतस्करांना संरक्षण पुरवत असल्याचा आरोप करत मेंढपाळ संघटनेचे अध्यक्ष व नांदगावचे सरपंच सखाराम सरक यांनी प्रशासनाच्या खाबुगिरीचे वाभाडे काढले.


  महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या उजव्या कालव्याजवळ वाळूच्या डंपरची धडक बसून १४ मेंढ्या ठार झाल्याची घटना २२ ऑगस्टला रात्री घडली. पारनेर तालुक्यातील कण्हेर पोखरी येथील पोपट कोंडिबा हंडे हे मेंढ्या चारण्यासाठी राहुरी भागात आले होते. मेंढ्याचा कळप माघारी घेऊन जात असताना नगरकडून वेगाने आलेला वाळूचा डंपर कळपात घुसल्याने १४ मेंढ्या जागेवर चिरडून ठार झाल्या, तर ११ मेंढ्या जखमी झाल्या.


  या घटनेला आठवडा उलटला असताना पोलिस प्रशासनाकडून डंपरचालकाविरुध्द कारवाईत चालढकल सुरू असल्याच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी नगर-मनमाड राज्य मार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष सरक या वेळी म्हणाले, वाळूतस्करांनाच सुरक्षा पुरवण्याचे काम पोलिस व महसूल प्रशासनाकडून सुरू असल्याने तस्करांची दादागिरी वाढली.


  मुळा व प्रवरा नदीपात्रातील वाळूचा चोरट्या मार्गाने उपसा करून नगर-मनमाड राज्यमार्गावर रोज शेकडो डंपरची वाळू वाहतूक सुरू असताना प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. गरीब धनगराच्या मेंढ्या चिरडून वाळूतस्कर घटनास्थळावरून निघून गेल्याने राहुरीत तस्करांची मुजोरी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसते.वाळूतस्करांना सुरक्षा पुरवणाऱ्या प्रशासनाविरुध्द धनगर समाजाच्या वतीने मेंढ्या व बिऱ्हाडासह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जाब विचारला जाईल, असा इशाराही सरक यांनी दिला.


  राहुरी तालुक्यात पोलिस व महसूल प्रशासनाकडून वाळूतस्करांना अभय असल्याने गुन्हेगारी वाढल्याचे या वेळी धनगर समाज संघटनेचे विजय तमनर, ज्ञानेश्वर बाचकर यांनी सांगितले. तहसीलदार दौंडे व पोलिस उपनिरीक्षक दिलीप राठोड यांना आंदोलकाच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले. अर्धा तास चाललेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे नगर-मनमाड राज्यमार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती.


  डंपर पोलिसांच्या ताब्यात
  तहसीलदार अनिल दौंडे म्हणाले, वाळूतस्करी रोखण्यासाठी महसूल प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मेंढ्या चिरडणारा डंपर रविवारी रात्री पोलिसांनी ताब्यात घेतला असून संबंधितावर वाळूतस्करीचा गुन्हा दाखल केला जाईल. हांडे यांना मेंढ्याच्या नुकसानीबाबत न्याय देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही दौंडे यांनी दिली

Trending