आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेल्मेटसक्तीची कथा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चार-पाच वर्षांपूर्वी शहरात हेल्मेटची सक्ती प्रभावीपणे राबवण्यात आली. उलटसुलट चर्चांना उधाण आले. हेल्मेट सक्ती कशी राबवली जाईल. दुचाकीस्वारांच्या चेह-यावर हेल्मेट असल्याने ओळखू येणार नाहीत, इत्यादी. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात हेल्मेटसक्ती ठराविक तारखेपासून करण्यात येणार होती. त्याच दरम्यान ब-याच दुकानात हेल्मेट उपलब्ध झाली. इतकेच काय रस्त्यावरही हेल्मेट विक्री करण्यात येत होती. एक तर सहाशे ते 1500 रुपयांना भुर्दंड पडायचा.

इतक्या महागाचे हेल्मेट कोठे विसरले तर कायमचे हरवले असे समजा. शिवाय हेल्मेटशिवाय प्रवास म्हणजे पाचशे रुपये दंडाची पावती फाडण्याचा धोका असल्याने शहरवासीयांनी हेल्मेट खरेदीसाठी दुकानात अक्षरश: रांगा लावल्या. याच दरम्यान माझ्या एका मित्राने गप्पांच्या ओघात एक किस्सा सांगितला, एकजण दुचाकीवरून मोटारसायकलवर बायकोसह चालला होता. सेव्हनहिल उड्डाणपुलावर असताना, अचानक पोलिसांची गाडी येताना दिसली. तेव्हा त्याने बायकोच्या जवळ हेल्मेट ठेवण्यास दिले होते; तो तिला म्हणाला, पटकन हेल्मेट माझ्या डोक्यावर घाल. तिने हेल्मेट त्याच्या डोक्यावर घातले ते नेमके उलटे आणि ते दोघेही गाडीवरून खाली कोसळले. आम्हीसुद्धा गंभीर चेहरा करून हेल्मेट वापराचे दुष्परिणाम ऐकत होतो.

पुढे काही दिवसांनी हाच किस्सा मला अन्य एका मित्रांच्या तोंडून ऐकण्यास मिळाला. मात्र, स्थळ - काळ आणि वेळ निराळी होती. म्हणजे परवा दिवशी.. मोंढ्याकडे उतारावरून जाताना मोटारसायकलवरून जाणा-या नवरा-बायकोला अपघात झाला, अशी माहिती तो सांगत होता. मला ही गोष्ट फेकाफेकीची वाटली, परंतु मी यासंदर्भात काहीच प्रतिक्रिया दर्शवली नाही. माझा तोच मित्र लातूरला गेला असताना हाच किस्सा ऐकवला. तो पोट धरून हसत सुटला! कारण आतापर्यंत असा प्रसंग सांगणारा पाचवा व्यक्ती भेटला होता.