आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाभारत-2019/ 1971 : 'बैलजोडी' गोठल्यावर इंदिराजींनी आणले होते 'गाय-वासरू'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशाच्या संसदीय इतिहासात पाचव्या लोकसभेपेक्षा जास्त चर्चित, वादग्रस्त निवडणूक आणि कार्यकाळ दुसऱ्या कुठल्याही लोकसभेचा झाला नाही. चर्चित यासाठी कारण प्रथमच इंदिरा गांधींनी जोरदार मुसंडी मारली. गरिबी हटावची आतापर्यंतची सर्वात चर्चित घोषणा दिली आणि दोन तृतीयांश जागा मिळवल्या. वादग्रस्त यासाठी की देशातील आतापर्यंतची पहिली आणि शेवटची आणीबाणी लागली. १९७१ ची निवडणूक लोकसभेच्या निश्चित मुदतीच्या एक वर्ष आधी झाली आणि कार्यकाळ निश्चित मुदतीच्या एक वर्षापेक्षा जास्त राहिला. 


निवडणुकीआधी काँग्रेसची दोन शकले झाली. काँग्रेसचे बैलजोडी हे निवडणूक चिन्ह आयोगाने गोठवले. त्यानंतर इंदिरा गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसने (आर) वासराला दूध पाजणारी गाय हे चिन्ह घेतले. स्वातंत्र्याला २४ वर्षे पूर्ण झाली होती. त्यामुळे राजकारणात दुसऱ्या पिढीच्या अनेक नेत्यांनीही प्रवेश केला होता. या निवडणुकीत अनेक नेते प्रथमच संसदेत आले. त्यात कम्युनिस्ट पक्षाचे इंद्रजित गुप्ता, सोमनाथ चटर्जी, प्रजा समाजवादी पक्षाचे मधू दंडवते, काँग्रेसचे दिग्गज यशवंतराव चव्हाण, प्रियरंजन दासमुन्शी, पूर्व दिल्लीतून काँग्रेसचे एच. के. एल. भगत, गुणातून माधवराव शिंदेंचा समावेश होता. प्रथमच फक्त लोकसभेची निवडणूक झाली, विधानसभांची नाही. 


इंदिरा गांधी १९६६ मध्ये पंतप्रधान झाल्या होत्या, तेव्हा काँग्रेसमध्ये फुटीची चिन्हे सुरू झाली होती. इंदिरा गांधींना पक्षावर मजबूत पकड हवी होती. पण अनेक ज्येष्ठ नेत्यांना ते मान्य नव्हते. राष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार नीलम संजीव रेड्डी होते, तर इंदिराजींनी व्ही. व्ही. गिरींना पाठिंबा दिला. अखेर गिरींचा विजय झाला. नंतर इंदिरा गांधींनी मोरारजी देसाईंनाही हटवले. त्यानंतर काँग्रेसची दोन शकले झाली. इंदिराजींनी काँग्रेस (आर) पक्ष स्थापला. लवकर निवडणुकीचे तेही एक कारण होते. पंतप्रधान झाल्यानंतर इंदिरा गांधींनी बँकांचे राष्ट्रीयीकरण सुरू केले होते. प्रीव्ही पर्स बंद केले होते. सरकारच्या या कामांना सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. त्यामुळेच इंदिरा गांधींनी १९७१ मध्ये मुदतीआधी १४ महिने लोकसभा विसर्जित करून निवडणुकीचा निर्णय घेतला. 


इंदिराजींचा निवडणूक प्रचारात ५८ हजार किमी प्रवास 
- निवडणुकीत दोन मुख्य घोषणा झाल्या. इंदिरा गांधींनी 'गरिबी हटाओ'चा नारा दिला. विरोधकांनी उत्तरात घोषणा दिली: 'देखो इंदिरा का ये खेल, खा गई राशन, पी गई तेल।' 
- प्रचारादरम्यान इंदिरा गांधींनी यांनी सुमारे ५८ हजार किमी अंतर कापले व ३०० सभांमध्ये भाषण केले. साधारण २ कोटी लोकांनी त्यांना पाहिले व ऐकले. 
- इतिहासकार रामचंद्र गुहा यांचे पुस्तक 'इंडिया आफ्टर गांधी'मध्ये ते लिहितात की, राजेशाहीची विस्मृतीत गेलेली आठवण इंदिरा गांधी यांनी करून दिली. देशातील समस्यांसाठी काही मर्यादेपर्यंत हे लोक जबाबदार असल्याचे त्यांचे म्हणणे होते. 
- विरोधी पक्ष नव्या चिन्हाची खिल्ली उडवत म्हणत की, गाय इंदिरा व वासरू संजय गांधी आहेत. 
- १९७१ च्या पाचव्या लोकसभेची मुदत १९७६ मध्ये संपत होणार हाेती. मात्र, काँग्रेस सरकारने या लोकसभेची मुदत एक वर्षाने वाढवली. याविरोधात समाजवादी नेते मधू लिमये व शरद यादव यांनी लोकसभा सदस्यत्वाचा १९७६ मध्ये राजीनामा दिला. 
- या निवडणुकीतील विजयी दिग्गज नेत्यांपैकी दोघे नंतर राष्ट्रपती झाले. काँग्रेसच्या तिकिटावर आसामच्या बारपेटा मतदारसंघातून फखरुद्दीन अली अहमद व भोपाळहून डॉ. शंकरदयाळ शर्मा निवडून आले होते. 


1971 मध्ये लोकसभेच्या एकूण जागा ५१८ 
एकूण उमेदवार २७८४ 
मतदान टक्केवारी ५५.२७ 
काँग्रेस(आर) जिंकली ३५२ 
काँग्रेस(ओ) जिंकली १६ 

बातम्या आणखी आहेत...