आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गगनभरारी : हमारी ही मुठ्ठी में आकाश सारा...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आता पर्मनंट कमिशन मिळाल्याने महिलाही देशसेवेचे स्वप्न साकारत कारकिर्दीच्या सर्वोच्च पदांपर्यंत पोहोचू शकतील.

फ्लाईट लेफ्टनंट शिवाली देशपांडे  

नेतृत्वगुण बघूनच अकादमीतील प्रशिक्षणासाठी निवड होतेे. त्यामुळे अधिकारी झाल्यावर महिला एखाद्या युनिट किंवा स्क्वाॅड्रनचे नेतृत्व करू शकत नाहीत, असे कसे म्हणता येईल? आता पर्मनंट कमिशन मिळाल्याने महिलाही देशसेवेचे स्वप्न साकारत कारकिर्दीच्या सर्वोच्च पदांपर्यंत पोहोचू शकतील. 


करिअरची निवड करताना ते रूटीन नव्हे, तर ‘हटके’ असावे, अशी खूणगाठ मी लहानपणापासूनच मनाशी बांधली होती. मला ना डॉक्टर व्हायचे होते, ना इंजिनिअर. त्यातही युनिफॉर्ममधील कडक शिस्तीच्या सेवांबद्धल मला प्रचंड आकर्षण होते. एक तर ‘आयपीएस’ होऊन पोलिस सेवेत जाण्याचा अथवा संरक्षण दलात अधिकारी म्हणून जाण्याचे पर्याय माझ्यापुढे होते. आमच्या घरातील वातावरणच लष्करातील सेवेचे. माझे वडील (कर्नल सुनील देशपांडे), काका आणि आत्याचे यजमान लष्कारात होते. वडिलांचे आर्मी लाईफ मला फार आकर्षित करायचे. ते मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटचे. या रेजिमेंटचा युद्धघोषच ‘बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय!’ असा होता. मी एनसीसीची कॅडेट होते. १९९३ मध्ये मी दिल्लीला प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये राज्याचे नेतृत्व केले. देशाची सर्वोत्कृष्ट महिला कॅडेट म्हणून माझी निवड झाली. तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या हस्ते मला सुवर्णपदक, ट्रॉफी प्रदान करण्यात आली. त्यानंतर ‘एनसीसी’च्या वतीने इंग्लंडमध्ये देशाचे प्रतिनिधित्वही केले. 

संरक्षण दलातील सेवेची प्रेरणा देणारी तिसरी महत्वाची बाब, म्हणजे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचा १९९० चा गाजलेला ‘प्रहार’ चित्रपट. त्यावेळी मी इयत्ता दहावीत असेन. वडिलांची नेमणूक बेळगावमध्ये होती. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी त्यांचे आणि पाटेकरांचे प्लॅनिंग, गप्पा पहाटेपर्यंत चालत. या चित्रपटात माझी छोटीशी भूमिका आहे. लष्करात प्रशिक्षण घेणारे काही जवान एका मुलीला शिट्ट्ी मारतात. त्यावेळी लष्कराचा अधिकारी (नाना पाटेकर) त्या शिट्ट्या मारणाऱ्या जवानाची ओळख पटवून त्याला कठोर शिक्षा करतात, असा तो प्रसंग. ती भूमिका आजही माझ्या आयुष्याचा मोठा ठेवा आहे. लष्करात महिलांना किती आदर व सन्मान मिळतो, याची जाणीव ‘प्रहार’मधील त्या प्रसंगातूनही मला झाली. 

माझ्या सुदैवाने १९९३-९४ या काळातच संरक्षण दलांमध्ये महिलांना प्रवेश सुरू झाला. त्यापूर्वी केवळ डॉक्टर होऊन आर्मी मेडिकल कोअरमध्ये महिलांना दाखल होता येत होते. त्यामुळे संरक्षण दलांतच अधिकारी म्हणून सेवा देण्यासाठी मी आर्मी आणि एअर फोर्स सेवेसाठी अर्ज केले. बारावीत गणित आणि विज्ञान विषय नसल्याने नेव्हीचा पर्याय मात्र निवडता आला नाही. आर्मी आणि एअर  फोर्सच्या मुलाखती उत्तीर्ण केल्यावर माझ्यापुढे दोन पर्याय होते. आमचे संपूर्ण कुटुंब आर्मीत होते. त्यामुळे वेगळेपण जपण्याच्या हेतूने मी ब्ल्यू युनिफॉर्मचा (एअर फोर्स) पर्याय निवडला.

एअर फोर्सच्या हैदराबादमधील अकादमीत किमान वर्षभराचे प्रशिक्षण घ्यावे लागले. हवाई दलातील प्रशिक्षण इतके अप्रतिम असते की त्यातून देशभक्तीसह तुमच्यात नेतृत्व आणि नियोजनाचे कौशल्य विकसित होते. त्यासाठी अकादमीच्या प्रशिक्षण अधिकाऱ्यांचे परिश्रम खूपच महत्वाचे ठरतात. प्रशिक्षणात स्त्री आणि पुरुष असा कुठलाही भेदाभेद केला जात नाही. मानवी क्षमता किती प्रचंड मोठ्या असू शकतात, याचा साक्षात्कारच अकादमीतील कठोर प्रशिक्षणातून मिळत असतो. प्रशिक्षणानंतर मला पायलट ऑफिसर म्हणून एअर ट्रॅफिक व फायटर कंट्रोलर ब्रँचमध्ये पहिली नियुक्ती मिळाली. बरेलीला पहिले पोस्टिंग मिळाले. रडारच्या माध्यमातून हवाई दलाच्या विमानांच्या नियंत्रणाची ही जबाबदारी. बरेली आणि त्यानंतर नागपूर अशा दोन तळांवर मला सेवा देता आली. त्या काळात शॉर्ट सर्व्हिस कमिशन पाच वर्षांचेच होते. आता ते किमान दहा वर्ष अथवा सेवानिवृत्तीपर्यत आहे. 

माझा हवाई दलातील कार्यकाळ पाच वर्षांचाच होता. मात्र, त्यानंतरही मला रूखरूख वाटली नाही. त्यामागील प्रमुख कारण म्हणजे, प्रहार संस्थेच्या रूपाने माझ्यापुढे संरक्षण दलातील अधिकारी घडवण्यासाठी काम करण्याचे वेगळे विश्व तयार होते. युनिफॉर्ममध्ये असते, तर नक्कीच खूप मोठा पल्ला गाठताही आला असता. पण, ‘प्रहार’ची जबाबदारी हाती घेतल्यावर जे शक्य झाले, त्याचे समाधान खूप मोठे आहे. या संस्थेच्या माध्यमातून संरक्षण दलांसाठी आम्ही आजवर २९० अधिकारी घडवले. ते सध्या सैन्यदलांमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे या कामाचे समाधान खूप मोठे आहे. अलीकडेच महिलांना सैन्यदलांमध्ये परमनंट कमिशन मिळण्याचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने मोकळा केल्याने खूप आनंद झाला. खरे तर, नेतृत्व गुण बघूनच अकादमीतील प्रशिक्षणासाठी निवड होत असते. त्यामुळे अधिकारी झाल्यावर महिला एखाद्या युनिट किंवा स्क्वाड्रनचे नेतृत्व करू शकत नाहीत, असे कसे म्हणता येईल? आता महिलाही देशसेवेचे स्वप्न साकारत कारकीर्दीच्या सर्वोच्च पदांपर्यंत पोहोचू शकतील, याची खात्री वाटते. माझ्यासाठी प्रेरणादायी ठरलेल्या ‘प्रहार’ चित्रपटातील ‘हमारी ही मुठ्ठी में आकाश सारा.. जब भी खुलेगी चमकेगा तारा..’ या गाण्याच्या ओळी अशी भरारी घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकीला स्फूर्ती देत राहतील.   (लेखिका भारतीय हवाई दलातील निवृत्त अधिकारी आहेत.)
 

बातम्या आणखी आहेत...