Home | Magazine | Rasik | Story of 'Muakhbhanga' article by Sushilkumar Shinde

कथा एका मुखभंगाची

सुशीलकुमार शिंदे | Update - Dec 09, 2018, 12:06 AM IST

सुबीर यांच्या साहित्यातून दिसतो शेतीप्रधान देशाचा कुरूप चेहरा

 • Story of 'Muakhbhanga' article by Sushilkumar Shinde

  पंकज सुबीर हे हिंदी साहित्यातील कथा-कविता विश्वातील अाजमितीचे एक आघाडीचे नाव. त्यांच्या कथा, कविता किंवा गझल सुरुवातीपासूनच वैविध्य राखलेल्या. मात्र, याचसोबत ‘ये वो सहर तो नहीं’ आणि ‘अकाल में उत्सव’ या शेतीमातीच्या वेदनेला आकार देणाऱ्या दोन कादंबऱ्यांमुळे त्यांचे नाव भारतातील एक आघाडीचा कादंबरीकार म्हणून घेतले जात आहे. सुबीर यांचे साहित्य एका सामूहिक मुखभंगाची कथा वाचकांसमोर आणते आहे...

  पंकज सुबीर यांच्या साहित्यात सदैव नाडला गेलेला समाज दिसतो. शेतीप्रधान देशाचा कुरूप चेहरा दिसतो. लोककल्याणकारी राज्याचं फसलेलं स्वप्न दिसतं. रोजच्या जगण्यातूनही उद्यावर विश्वास ठेवून जगणाऱ्या भोळ्याभाबड्या समाजाचं हताश चित्रण दिसतं. फैज अहमद फैज म्हणतो, तशी त्यात सार्वजनिक फसवणूक दिसते...

  मध्य प्रदेश मधील शिरसा या भागातील पंकज यांच्या कादंबरीत ते राहतात, त्या परिवेशाचा मोठा हिस्सा प्रकर्षाने आढळून येतो. त्यांच्या आजूबाजूचा एक मोठा समाज त्यातील विरोधाभासासहित त्यांच्या साहित्यात शब्दबद्ध होत राहतो. ‘ये वो सहर तो नहीं' या कादंबरीत त्यांनी अशाच आजूबाजूला घडणाऱ्या घटनेतून परेशान झालेल्या सामान्य माणसाची अगतिकता मांडलीय. निराशा मांडलीय. बऱ्याचदा आपली इच्छा असो वा नसो, आजूबाजूच्या राजकीय घडामोडींचा, उलथापालथींचा निश्चित असा परिणाम आपल्या जगण्यावर होत राहतो. त्यातून स्वार्थी धोरणांचा किंवा राजकीय महत्त्वाकांक्षेचा शिकार बनलेल्या समाजाचे चित्रण या कादंबरीत प्रकर्षाने आढळून येते. या कादंबरीतील किती तरी घटना अगदी आपल्या आजूबाजूला घडताहेत याची जाणीव वाचकाला होत राहते. यासाठी पुढील उताऱ्याचा आपण विचार करू शकतो

  ‘बात तब की है, जब उस घटना को बीते कुछ ही दिन हुए थे, जब एक संन्यासिन ने एक राजा को सूबे के चुनावों में हरा कर सत्ता हथिया ली थी. यह भी बिल्कुल अलग बात है कि राजा, राजा नहीं थे केवल नाम के ही थे और संन्यासिन भी संन्यासिन होकर केवल नाम की ही थीं. राजा केवल इसलिए राजा थे क्योंकि उनके पूर्वज किसी रियासत के राजा हुआ करते थे और संन्यासिन केवल इसलिए संन्यासिन थीं क्योंकि वे भगवा रंग के वस्त्र धारण करती हैं. इसके अलावा न तो राजा के आचरण में राजा जैसा कुछ था, और ना ही संन्यासिन के आचरण में संन्यासिन जैसा ही कुछ था. संन्यासिन के हाथ से सत्ता जानी थी, सो अन्ततः चली ही गयी. सत्ता गयी इसका मतलब यह कि उनकी पार्टी से उनको चलता कर दिया गया. उनकी पार्टी यूज एंड थ्रो में बहुत विश्वास करती थी'. हे सारे समजून घेण्यासाठी आपल्याला मध्य प्रदेशचे राजकारण माहीत असायलाच हवे, याची अजिबात गरज नसते. यासारखे कित्येक भाग रोजाना आपल्या जगण्याचा घटक झालेत आणि ते व्यंगात्मक पद्धतीने मांडण्यात पंकज सुबीर निश्चितच यशस्वी ठरतात. पंकज सुबीर यांची ‘ये वो सहर तो नहीं' यानंतर शेतीमातीची दुरवस्था आणि प्रशासकीय अनास्था शब्दबद्ध करणारी ‘अकाल में उत्सव' ही कादंबरी २०१६ मध्ये प्रकाशित झालेली आहे. त्यांच्या या कादंबरीत दुष्काळाला आणि शासन प्रेरित अडचणींना सामोरा जाणारा रामप्रसाद नावाचा हतबल शेतकरी आहे. त्याची दुरवस्था त्याच्याच समाजाचा भाग असलेल्या एका व्यवस्थेसाठी मात्र संधी ठरतेय. लूटमार करण्याची. त्याला नाडण्याची. अडवण्याची हे सारं लेखकाने या कादंबरीत मांडलंय. थोडक्यात काय, तर पी. साईनाथ यांच्या ‘दुष्काळ आवडे सर्वांना' यातील भयाण वास्तवाशी मेळ घालणारी ही हिंदी साहित्यातील लक्षवेधी कादंबरी आहे.

  रामप्रसाद आणि त्याची बायको कमला या शेतीमातीतील कुटुंबाच्या परवडीसोबतच लेखकाने यात प्रशासकीय अनास्था मांडलीय. यात जिल्हाधिकारी,तहसीलदार,तलाठी आणि असा बराच अधिकारी वर्ग येतो, जो रामप्रसादच्या आत्महत्येची सुनिश्चितता करत असतो. या देशात शेतकऱ्याची आत्महत्या होती की हत्या, असा प्रश्न लेखक वाचकासमोर ठेवतो. या कादंबरीत बरेच असे प्रसंग आलेले आहेत, जे आपल्या आजूबाजूच्या भवतालाचे प्रतिनिधित्व करताहेत. म्हणजे रामप्रसाद जेेव्हा आपल्या बायकोच्या पायातील चांदीचा तोडा सोनाराकडे घेऊन जातो, तेव्हा लेखक सांगतो - ‘किसान के जीवन में बढ़ते दुःख, उसकी पत्नी के शरीर पर घटते ज़ेवरों से आँक लिए जाते हैं’. एका शेतकरी कुटुंबाभोवती फिरणारी ही कादंबरी एक वर्गीय समीकरण मांडत जाते. गावागावात झपाट्याने भूमिहीन मजूर का वाढतोय, हे सांगताना लेखक लिहितो की - ‘छोटा किसान जब तक लड़ सकता है, तब तक किसान रहता है, और फिर हारकर मज़दूर हो जाता है'. एकंदरीतच ही कहाणी फक्त रामप्रसाद आणि कमला यांच्यापुरतीच मर्यादित राहत नाही. बळीचं राज्य येणार आहे, म्हणतच अवकळेला लागलेल्या एका शेतीप्रधान समूहाची ही सार्वत्रिक व्यथा-वेदना आहे. कालपरवा दिल्लीमध्ये धडकलेल्या किसान मोर्चाची धग समजून घ्यायची असेल, तर ‘अकाल में उत्सव' वाचायलाच हवी.

  कादंबरीसोबतच पंकज सुबीर यांच्या कथाही हिंदी साहित्यविश्वात प्रकर्षाने चर्चिल्या जातात. त्यांच्या कथेतील वैविध्यपूर्ण मांडणी नेहमीच एक भला मोठा अवकाश वाचकासमोर ठेवते. ती ज्या परिवेशात आकाराला येते, त्या परिवेशाचे ताणेबाणे त्यात प्रामुख्याने दिसून येतात. मौखिक परंपरेचा दाखला देणाऱ्या कैक किस्सेकहाण्या त्यांच्या कथेतून सर्जनशीलपणे आकाराला येतात. त्यात ऐतिहासिक घटना आढळून येतात. मिथक आढळतात. किंवा एखाद्या ऐतिहासिक पात्राला ते थेट वर्तमानात घेऊन येतात नि त्याच्या माध्यमातून सामाजिक व्यंगावर भाष्य करू पाहतात. ईस्ट इंडिया कंपनी’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह होय. त्यानंतर त्यांचा "महुआ घटवारिन’ आणि "कसाब डॉट गांधी @ यरवदा डॉट इन’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला. या कथा संग्रहातील दहशतवादी कसाब आणि गांधींचा जो संवाद लेखकाने मांडलाय तो समाज म्हणून आपले विच्छेदन करणारा आहे. अगदी तसेच याच संग्रहातील ‘लव जिहाद उर्फ उदास आंखोंवाला लड़का’ या छोटेखानी कथेचाही उल्लेख करता येईल. पंकज सुबीर यांच्या कथेत समाजातील दिवसेंदिवस क्षीण होत चाललेली मूल्यव्यवस्था नि त्याचवेळी बोकाळत चाललेली सांप्रदायिकतेचं यतार्थ विवेचन आढळून येते. त्यांचा नुकताच प्रकाशित झालेला ‘चौपड़े की चुड़ैलें' हा कथासंग्रह हिंदी साहित्यातील खूप महत्त्वाचा कथासंग्रह मानला जातोय. हिंदी साहित्यातील महत्वाच्या समीक्षकांनी या कथासंग्रहाची योग्य दखल घेतलेली आहे. या संग्रहातील ‘जनाब सलीम लंगड़े और श्रीमती शीला देवी की जवानी' ही कथा निश्चितच हिंदीतील,

  या आघाडीच्या कथाकाराचं सामर्थ्य समजवून देण्यास पुरेशी आहे.

  ‘अकाल में उत्सव' ही कादंबरी पंकज यांनी प्रा. कुलबर्गी यांना अर्पण केलेली आहे. पंकज सुबीर त्यांच्या एका कवितेत लिहितात- कानों में चुभ रही हैं / चुप्पियाँ / टीस जाता है /सन्नाटा भी / रह-रह कर / जड़ता और पशुता के बीच / डोल रहा है / पैंडुलम की तरह मौन. सचमुच कितना पीड़ादायी होता है / एक पूरी पीढ़ी का / नपुंसक हो जाना’. पंकज सुबीर यांच्या साहित्यात सदैव नाडला गेलेला समाज दिसतो. शेतीप्रधान देशाचा कुरूप चेहरा दिसतो. लोककल्याणकारी राज्याचं फसलेलं स्वप्न दिसतं. रोजच्या जगण्यातूनही उद्यावर विश्वास ठेवून जगणाऱ्या भोळ्याभाबड्या समाजाचं हताश चित्रण दिसतं. फैज अहमद फैज म्हणतो, तशी त्यात सार्वजनिक फसवणूक दिसते. सुबीर यांचे साहित्य एका सामूहिक मुखभंगाची कथा वाचकांसमोर मांडत राहते. जागतिकीकरणानंतर भयानक अशा अपेक्षाभंगाचे ओझे वागवणाऱ्या अस्वस्थ, पण घाबरट नि नपुंसक पिढीचं प्रतिनिधित्व त्यांचे साहित्य करताना आढळून येते. त्यातील वास्तवतेचा दाह निर्ढावलेल्यांना जागे करण्यास निश्चितच पुरेसा आहे आणि म्हणूनच हा शेतीमातीच्या वेदनेला आकार देणारा हा या घडीचा महत्त्वाचा लेखक ठरतो.

  लेखकाचा संपर्क - ९६१९०५२०८३

Trending