आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांधींच्या भूमीत ठरणार संघ, केंद्रविरुद्ध रणनीती; काँग्रेसच्या नेत्यांची वर्धा येथे होणार बैठक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- गांधी जयंतीचे निमित्त साधून वर्धा येथे आयोजित होणाऱ्या काँग्रेसच्या अखिल भारतीय कार्यसमितीच्या बैठकीत संघ परिवार आणि केंद्र सरकारच्या विरोधात व्यापक रणनीती निश्चित होणार आहे. २०१९ लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीतील निर्णय अत्यंत महत्त्वाचे असतील, अशी माहिती काँग्रेसच्या केंद्रीय नेत्याने दिली. 


काँग्रेसचे अखिल भारतीय महासचिव अशोक गहलोत, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनी सोमवारी वर्धा येथे बैठकीत कार्यसमिती बैठकीच्या पूर्वतयारीची चाचपणी केली. या बैठकीनंतर "दिव्य मराठी'शी बोलताना प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले, केंद्रीय समितीला आजच्या वर्धा येथील बैठकीचा अहवाल सादर करण्यात आल्यावर २ अॉक्टोबरच्या कार्यसमितीच्या संभाव्य बैठकीसंदर्भात निर्णय होईल. तथापि, काँग्रेसचे महासचिव अशोक गहलोत यांनी नागपुरात बोलताना बैठक जवळपास निश्चित असल्याचे संकेत दिले. 


या बैठकीसंदर्भात काँग्रेसच्या एका केंद्रीय नेत्याने "दिव्य मराठी'ला सांगितले की, कार्यसमिती बैठकीचा अजेंडा अद्याप तयार झालेला नाही. मात्र, वर्धेच्या गांधी भूमीत कार्यसमितीची बैठक घेऊन देशाला महत्त्वाचा संदेश देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. २०१९ च्या निवडणुका फार लांब नाहीत. त्या पार्श्वभूमीवर संघ परिवार आणि केंद्र सरकारविरोधात रणनीती आखून एखादे व्यापक देशव्यापी अभियान गांधी भूमीतून छेडले जाण्याची शक्यता आहे. या बैठकीत माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, सोनिया गांधी, काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे किमान ७० नेते उपस्थित राहतील, अशीही माहिती या नेत्याने दिली. 

बातम्या आणखी आहेत...