आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चरखा चालवून मनावरचा ताण, रक्तदाब कमी होत असल्याने परदेशात मोठी मागणी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्धा - चरखा हा आपल्याकडे महात्मा गांधींचे किंवा स्वातंत्र्य चळवळीचे प्रतीक असला तरी विदेशात सध्या त्याला बऱ्यापैकी मागणी आहे ती चरखा चालवल्याने मनावरचा ताण, रक्तदाब कमी होतो याची तिकडे जाणीव झाल्यामुळे. त्यांना पुस्तकाच्या आणि छोट्या पेटीच्या आकारातील चरखे बनवून निर्यात करण्याचे काम येथील सरंजाम कार्यालयाकडून नियमितपणे सुरू आहे.

वर्धा शहरात महात्मा गांधींच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या विविध संस्था कार्यरत आहेत. ग्रामोद्योगाशी संबंधित कार्य करणाऱ्या संस्थांपैकीच एक आहे सरंजाम कार्यालय. सरंजाम म्हणजे शस्त्रनिर्मितीची जागा. गांधीजींनी चरख्याचा वापर स्वातंत्र्य चळवळीसाठी शस्त्रासारखा केला. म्हणून विनोबा भावे यांनी या चरखा निर्मितीच्या कार्यशाळेला सरंजाम असे नाव दिले आहे. या सरंजाम कार्यालयाकडे आॅगस्ट महिन्यात पुस्तकाच्या आकारातील चरखा, पेटीच्या आकारातील चरखा आणि  प्रवास चरखा यांची प्रत्येकी ५० नगांची मागणी नोंदवली गेली होती. त्यापैकी ८० टक्के चरखे पाठवले गेले. यातील ४० टक्के म्हणजे साधारण ६० चरखे विदेशात जात आहेत असे तेथील व्यवस्थापक विजय नागपुरे यांनी स्पष्ट केले. 

मानसिक आरोग्याशी संबंध :
नागपुरे म्हणाले, चरखा चालवल्याने हायपर टेन्शन, हृदयावर येणारा ताण, रक्तदाब नियंत्रित राहतो, असे आढळून आले आहे. शिवाय मनाची एकाग्रताही वाढते. चरखा चालवणे म्हणजे ध्यान करणे असा तिकडे अर्थ घेतला जातो. आपण केलेल्या ध्यानाची मोजणी करू शकत नाही, पण विदेशात विशेषत: अमेरिकन राष्ट्रांत किती सूत कातले यावर किती ध्यान केले असे मोजले जाते. आता तिकडे याचे क्लासेसही घेतले जातात आणि त्या क्लासेसला प्रतिसादही चांगला मिळतो. 

अंबर चरख्याने जिंकले बक्षीस :
चरख्याच्या तंत्रात गतिशील बदल व्हावेत म्हणून गांधीजी नेहमीच प्रयत्नशील होते. असे तंत्र तयार करणाऱ्यासाठी त्यांनी आधी पाच हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. पण तसा चरखा बनवण्यात कोणाला यश आले नाही. जुलै १९२९ मध्ये बापूजींनी ती रक्कम वाढवून १ लाख केली. त्यानंतर अंबललाल मिश्रा यांनी एकाच वेळी अनेक चात्यांवर काम करता येईल आणि धाग्याचा आकारही एकसारखा असेल असा यांत्रिक चरखा तयार केला. त्याला त्यांचेच नाव देण्यात आले आणि तेव्हापासून तो अंबर चरखा म्हणून ओळखला जाऊ लागला. 
 

पुस्तक चरख्याची कथा
पुस्तक चरखा हा अगदी पुस्तकाच्या आकाराचा आहे. त्याच्या निर्मितीची कथा नागपुरे यांनी सांगितली. त्या काळात स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेणाऱ्यांना सारखे तुरुंगात टाकले जाई. तुरुंगात गेल्यानंतर आपला स्वातंत्र्य चळवळीत उपयोग होत नाही, अशी त्यांची भावना होई. अशा वेळी त्यांना सूतकताई करता आली तर आपण चळवळीचेच काम करीत आहोत असे त्यांना वाटेल या कल्पनेतून हा चरखा बनवला गेला आणि अशा कैद्यांना तो पुस्तकाच्या गठ्ठ्यातून त्यांच्यापर्यंत पोहोचवला जात असे. म्हणून त्याला पुस्तक चरखा म्हटले जाऊ लागले. पेटी चरखा हा छोट्या पेटीच्या आकाराचा आहे. प्रवास चरखा हा प्रवासात सहज नेता यावा असा आहे. किसान चरखा म्हणजे उघड्या स्वरूपातला आणि शेतीच्या औजारासारखा दिसणारा आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...