Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | Strike the fireworks before the saint Goroba Kaka's paw,

संत गोरोबा काकांच्या पालखीसमोर फटाके फोडण्यावरून दगडफेक, सोहळ्याला गालबोट

प्रतिनिधी | Update - Nov 11, 2018, 09:24 AM IST

पालखी सुलतान चौकात आल्यानंतर गोंधळ वाढत गेला. जसजसा अंधार वाढत गेला तशी हुल्लडबाजीही वाढतच गेली.

 • Strike the fireworks before the saint Goroba Kaka's paw,

  उस्मानाबाद / तेर - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर केवळ रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके उडवण्यासाठी शासनाने मुभा दिली असली तरी दिवाळीत दिवसभर तसेच निर्धारित वेळेपेक्षा अधिक फटाक्यांची आतषबाजी झाली. मात्र, पोलिसांना फटाक्यांची आतषबाजी ऐकायला आली नाही. दरम्यान, तेर (ता.उस्मानाबाद) येथे वैराग्य महामेरू संत गोरोबाकाकांच्या पायी कार्तिकी पालखी सोहळ्याच्या प्रस्थानदिनी शुक्रवारी(दि.९) पालखीसमोर फटाके उडवण्यावरून तसेच टवाळखोरांच्या हुल्लडबाजीमुळे पालखी सोहळ्याला गालबोट लागले. दोन गटांत झालेल्या हाणामारीत एकाचे डोके फुटले, तर गोंधळामुळे भाविकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले.
  शुक्रवारी(दि.९) संत गोरोबा काकांच्या कार्तिकी एकादशी पालखी सोहळ्याचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पाटील, माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, उपसरपंच बाळासाहेब कदम, कुंभार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विठ्ठलराव राऊत, जिल्हा संघटक महादेव खटावकर, सेनेचे तालुकाप्रमुख सतीशकुमार सोमाणी, शंकरअप्पा झाडे यांच्यासह भाविकांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पालखीचे पूजन करण्यात आले. पालखी सोहळ्याचा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी १० हजारांवर भाविक सहभागी झाले होते. मात्र, सायंकाळी पालखीसमोर भाविकांच्या अंगावर फटाके फेकण्याच्या हुल्लडबाजीमुळे अनेक महिला वृद्ध भाविकांना दर्शनापासून वंचित राहावे लागले.

  पालखी सुलतान चौकात आल्यानंतर गोंधळ वाढत गेला. जसजसा अंधार वाढत गेला तशी हुल्लडबाजीही वाढतच गेली. याचा अतिरेक सावता माळी चौकात दगडफेकीने झाला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या हाणामारीत तर कोण कोणाला मारहाण करीत होते हेच समजत नव्हते. अर्धा तास चाललेल्या या राड्यात एक जणाचे डोके फुटले. भररस्त्यावर चाललेल्या या राड्यामुळे महिलांसह भाविकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

  पालखी सोहळ्यात नियोजनशून्य बंदोबस्त होता. गोरोबाकाकांच्या पालखीला निरोप देण्यासाठी तेरमधील व शेजारच्या १२ वाड्यातील भाविक येत असतात. त्यांना त्रास होऊ नये म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्याची गरज होती. परंतु अवघ्या एका पोलिसावरही जबाबदारी सोपवण्यात आली. हुल्लडबाजी वाढत गेल्यानंतर काही पोलिस अवतरले. तेही सिव्हिल कपड्यावर. पोलिसांनी टवाळखोरांना वेळीच आवरले असते तर आजच्या पालखी सोहळ्याला गालबोट लागले नसते. यावरून हा सोहळा पोलिसांनी गांभीर्याने घेतलेला नाही हे दिसून येते.


  पाऊस नसल्याने शेतीतील कामे ठप्प झाल्याने पालखीसोबत जाणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ झाली असून गोंधळामुळे भाविकांना त्रास सहन करावा लागला.दरम्यान, याप्रकरणी ढाेकी पोलिसांत तक्रार देण्यात आली असून, शनिवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. गोरोबाकाकांचा पालखी सोहळा १८ नोव्हेंबरला पंढरपुरात पोहोचणार असून १९ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी अाहे.


  फटाके कमी पण नियमांचे उल्लंघन : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्य शासनाने २ ते ९ नोव्हेंबर दरम्यान रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके उडवण्यासाठी मुभा दिली होती. मात्र, उस्मानाबादकरांनी दिवाळीमध्ये या नियमांचे उल्लंघन केले. मात्र, याप्रकरणी जिल्हाभरात एकही गुन्हा दाखल झालेला नाही. या वर्षी नियमामुळे तसेच जनजागृतीमुळे फटाक्यांचा वापर निम्म्यापेक्षा कमी झाला असला तरी मुभा दिलेल्या वेळेव्यतिरिक्त फटाक्यांची आतषबाजी मोठ्या प्रमाणावर झाली. त्यामुळे निर्धारित वेळेव्यतिरिक्त फटाके फोडणाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी पोलिसांना पाळता आली नाही.

  संतांच्या उत्सवात फटाकेबाजी कशासाठी?
  संतशिरोमणी गोरोबाकाकांच्या पालखी सोहळ्यात आतषबाजी केली जाते. पालखी सोहळ्याच्या पुढे अर्धा किलोमीटर अंतरावर ही अातषबाजी असली तरी पालखी सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांच्या अंगावर फटाके फेकण्याचा भयंकर प्रकार घडतो. त्यामुळे बाहेरगावाहून आलेल्या सामान्य भाविकांना इजा होतात. हा प्रकार या वर्षीही झाला. मात्र, फटाके फोडण्यावरून गावातील दोन गटांत वाद झाल्याने त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. संपूर्ण जगाला समतेचा, न्यायाचा संदेश देणाऱ्या संत गोरोबाकाकांच्या पालखी सोहळ्यात गट-तटाचा वाद कशासाठी, हुल्लडबाजी करणाऱ्यांना पोलिस रोखत का नाहीत, फटाक्यांची फटाकेबाजी कशासाठी, यातून टवाळखोरांना नेमक काय साध्य करायचे आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. गावकऱ्यांनी तसेच पोलिसांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून सोहळ्याला गालबोट लावणाऱ्यांना धडा शिकवण्याची गरज आहे.

Trending