Crime / पाणी आणण्यासाठी शेतातून गेल्याच्या कारणावरून मारहाण; महिलेचा मृत्यू, दोन मुलेही गंभीर जखमी

औंढा नागनाथ तालुक्यातील येळी येथील घटना, अद्याप पोलिसांत तक्रार नाही
 

प्रतिनिधी

Jun 06,2019 09:22:00 AM IST

हिंगोली - आमच्या शेतातील रस्त्याने पाणी का नेत आहात, या कारणावरून औंढा नागनाथ तालुक्यातील येळी येथे तिघा माय लेकांना बुधवारी सकाळी ६ वाजता शेतमालकासह अाठ जणांनी बेदम मारहाण केली. यात महिला गंभीर जखमी झल्याने तिला औरंगाबाद येथे घाटी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.


औंढा नागनाथ तालुक्यातील येळी येथे सध्या तीव्र पाणीटंचाई अाहे. चंद्रकला घुगे (६०) आणि त्यांची दोन मुले दत्ता (३४) आणि राघोजी (४०) हे गावातील एका शेतकऱ्याचा शेतातील विहिरीतून पाणी आणण्यासाठी बुधवारी सकाळी ६ वाजता गेले होते. विहिरीकडे जाण्यासाठीचा रस्ता गावातील बाळू वाघमारे याच्या शेतामधून जात असल्याने तिघेही याच रस्त्याने पाणी आणण्यासाठी गेले होते. आमच्या शेतातील रस्त्याने पाणी आणण्यासाठी का जाता असे म्हणून बाळू वाघमारे व इतर सात ते आठ जणांनी चंद्रकला घुगे आणि त्यांची दोन मुले दत्ता घुगे आणि राघोजी घुगे या मायलेकांना काठ्यांनी बेदम मारहाण केली. तिघांनाही औंढा नागनाथ येथे प्रथम उपचार करून नांदेड येथे हलवण्यात आले. परंतु चंद्रकला घुगे यांची प्रकृती आणखी चिंताजनक झाल्याने नांदेड येथील डॉक्टरांनी त्यांना औरंगाबाद येथे रेफर केले. मात्र उपचारादरम्यान चंद्रकला यांचा मृत्यू झाला.

पोलिसांत तक्रार नाही
या घटनेत दोन मुलेही गंभीर जखमी झालेली असून त्यांचावर उपचार सुरू असल्याने अद्याप तरी गुन्हा दाखल झाला नाही.

X
COMMENT