वर्गात आपली नक्कल / वर्गात आपली नक्कल करतो म्हणून संतापलेल्या शिक्षकाने छडीने विद्यार्थ्याला केली बेदम मारहाण

प्रतिनिधी

Jan 03,2019 06:28:00 PM IST

पुणे- वर्गात आपली नक्कल केल्याने संतापलेल्या शिक्षकाने विद्यार्थ्यास काठीने बेदम मारहाण करून त्यास डांबून ठेवल्याची घटना पुण्यातील पिंपरी- चिंचवड येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोषी शिक्षकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी विद्यार्थ्याच्या पालकांनी शिक्षकाविरोधात भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शंकर महादेव खोचरे (14) असे मारहाण झालेल्या मुलाचे नाव आहे. व्यंकटेश कळसाईत असे मारकुट्या शिक्षकाचे नाव आहे.

शंकर हा पिंपरी-चिंचवड परिसरातील महापालिकेच्या बाऱ्हाडेवाडी, मोशी येथील शाळेत आठवीत आहे. बुधवारी हिंदी विषयाचे शिक्षक कळसार्इत हे वर्गात शिकवत होते. त्यावेळी शिक्षकांनी वर्गातील एका मुलीस आडनावाने हाक मारली. त्यानंतर पुन्हा अशाच प्रकारची हाक विद्यार्थ्यांमधून एकाने दिली. त्यावर रागावलेल्या कळसार्इत यांनी शंकर खोचरे याने नक्कल केल्याचे समजून त्याला छडीने बेदम मारहाण केली. यात त्याच्या पाठीवर छडीचे वळ उमटले. जखमी झालेल्या शंकरला त्यांनी शाळा सुटल्यानंतरही घरी न सोडता वर्गातच डांबून ठेवले. काही वेळानंतर शंकर घरी गेल्यानंतर त्याने घडलेला प्रकार आर्इ बबिता खोचरे हिला सांगितला. आर्इने थेट पोलिस ठाणे गाठत शिक्षक कळसार्इत विरोधात तक्रार दिली. दरम्यान, मारहाण करणाऱ्या शिक्षक कळसार्इत यांनी आपली बाजू मांडताना सांगितले की, वर्गात विद्यार्थ्यांचा गोंधळ सुरू होता. त्यावेळी एका विद्यार्थिनीला मी आडनावावरून हाक मारून शांत बसण्यास सांगितले. त्यावेळी आडनावाचे शब्द उच्चारताना अडखळलो. ते पाहून वर्गातील विद्यार्थी सदर मुलीस चिडवत होते. हे पाहून विद्यार्थ्यांना मी शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शंकर हा दुसऱ्या विद्यार्थ्यांचे नाव घेत संबंधित विद्यार्थिनीला चिडवत असल्याने मी त्यास शिक्षा केली.

X
COMMENT