आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणवेशात नसल्याने हटकले; बाहेरुन टवाळखोरांना बोलावून थेट शिक्षकांनाच दमदाटी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शाळेचा गणवेश का घातला नाही? या कारणावरुन शिक्षकाने एका नववीच्या विद्यार्थ्यास हटकले. त्याचा राग आल्यामुळे त्याने बाहेरुन टवाळखोरांना बोलावून थेट शिक्षकांना दमबाजी केली. मोबाइलमध्ये व्हिडिओ शूटिंग काढून ती साेशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही दिली. शहरातील ला. ना. शाळेत शुक्रवारी दुपारी १२ वाजता हा प्रकार घडला. त्यानंतर संबंधित विद्यार्थ्यास जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. 


शिक्षक दिन साजरा करुन दोन दिवस लाेटले जात नाहीत, तोपर्यंत शिक्षकांच्या अंगावर विद्यार्थी धावून जाण्याचा हा खळबळजनक व संतापजनक प्रकार घडला आहे. गुरुवारी ला. ना. शाळेत दुपार सत्राच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होती. तर काही विद्यार्थी सकाळी ९ वाजेपासून शाळेत दाखल झाले होते. यातील एका विद्यार्थ्याने शाळेचा गणवेश परिधान न करता जीन्स पॅण्ट घातली होती. त्यामुळे शिक्षकाने त्यास हटकले. याचा राग येऊन विद्यार्थी थेट शिक्षकांच्या अंगावर धावून गेला. त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या प्रकारामुळे शिक्षक अवाक‌् झाले. त्यांनी विद्यार्थ्यास शिक्षा देण्याच्या उद्देशाने हात उगारताच मोबाइलवरुन फाेन करून सात-आठ टवाळखोरांना बोलावून घेतले. काही मिनिटातच टवाळखोर शाळेत पोहाेचले. त्यानंतर सर्वांनी मिळून शिक्षकांना शिवीगाळ, दमबाजी केली. त्यांच्या अंगावर धावून गेेले. शिक्षकांनी प्रतिकार केला असता एका टवाळखोराने मोबाइलमध्ये व्हिडिओ शूटिंग करण्यास सुरुवात केली. हे शूटिंग सोशल मीडियावर व्हायरल करुन शिक्षकांची बदमानी करण्याची धमकी टवाळखोरांनी दिली. हा प्रकार पाहून मुख्याध्यापक बाहेर आले होते. टवाळखोरांनी त्यांनाही दमबाजी केली. तसेच सुरक्षारक्षकांची कॉलर पकडून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळ मात्र, शाळेत प्रचंड गोंधळ उडाला होता. 


टवाळखोरांचा 'प्रताप' पाहून इतर विद्यार्थी धास्तावले आहे. अखेर शिक्षकांनी पोलिसांना बोलावण्याची तयारी करताच टवाळखोर शाळेतून पळून गेले. तर ज्या नववीतल्या विद्यार्थ्यांनी त्यांना बोलावले होते. त्यास पकडून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आणले. पोलिसांनी संबंधित विद्यार्थ्याच्या पालकांना शाळेत बोलावून तंबी दिली. त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. दोन वर्षांपूर्वी ला. ना. शाळेतील एका विद्यार्थ्याच्या दप्तरात चाकू मिळून आला होता. या वेळी देखील मोठी खळबळ उडाली होती. शाळा प्रशासनाने याबाबतीत संपूर्ण चौकशी करून संबंधित मुलावर कारवाई केली होती. या कारवाईमुळे सकारात्मक बदल घडून आला होता. त्यानंतर शुक्रवारी थेट शिक्षकांनाच धमकावण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 


जळगावातील ला. ना. शाळेत दुपारी १२ वाजता घडलेला प्रकार 
१ दप्तरात हाेता गुटखा

नववीच्या वर्गात शिकत असलेल्या या विद्यार्थ्याच्या दप्तराची पोलिसांनी तपासणी केली. या वेळी त्याच्या दप्तरात गुटख्याच्या पुड्या मिळून आल्या. शाळेत अनेक मुले सर्रासपणे गुटखा खात असल्यामुळे आपल्याही दप्तरात पुड्या असतात, असे उत्तर त्या विद्यार्थ्याने दिले आहे.


२ मोबाइल, दुचाकीचा सर्रास वापर
नववीच्या वर्गात शिकणाऱ्या या विद्यार्थ्याकडे मोबाइल मिळून आला आहे. शाळेच्या दप्तरात मोबाइल घेऊन येत त्याचा गैरवापर करीत असल्याचे या घटनेतून उघडकीस आले. याबाबतीत शाळा प्रशासनाने मुलांच्या दप्तरांची तपासणी करणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय हा विद्यार्थी दुचाकीने शाळेत येत असतो. १४ वर्षे वय असल्यामुळे त्यास दुचाकी चालवण्याचा परवाना मिळू शकत नाही. दुचाकी चालवण्यास पात्र वय नसताना पालकांकडून जबरदस्तीने दुचाकी घेऊन तो शाळेत येत असल्याची माहिती समोर आली आहे. 


३ पाेलिसांच्या भितीने टवाळखाेर झाले पसार...
शाळेतील एका शिक्षकाने दुचाकीवरुन संबंधित विद्यार्थ्यास जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आणले. पोलिसांनी त्याच्या पालकांना बोलावून तंबी दिली. विद्यार्थ्यास गैरकृत्य करण्यासाठी मदत करणाऱ्या टवाळखोरांना पोलिसांनी बोलावले होते. परंतु, ते भीतीपोटी पोलिस ठाण्यात आलेच नाहीत. दरम्यान, शाळेतील शिक्षकांशी बेदरकार वर्तन करणाऱ्या या नववीच्या विद्यार्थ्याचे अाजाेबा अादर्श शिक्षक म्हणून सन्मानित अाहेत. नातवाच्या या प्रतापाने त्यांच्या प्रतिमेला मात्र, माेठा धक्का पाेहाेचला अाहे. 

बातम्या आणखी आहेत...