नांदेड / भिंतीच्या सळया पाेटात घुसल्याने तामसा येथे विद्यार्थ्याचा मृत्यू

शाळेमागील भिंतीजवळ खेळत असताना घडला अपघात

दिव्य मराठी

Jul 25,2019 07:55:00 AM IST

नांदेड - तामसा येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकणाऱ्या एका १४ वर्षीय विद्यार्थ्याचा बुधवारी अपघाती मृत्यू झाला. शाळेच्या संरक्षक भिंतीला असलेल्या सळया पोटात घुसून हा विद्यार्थी विद्यार्थ्याला प्राण गमवावे लागले. जगदीश गजानन गजभारे असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.


जगदीश हा आजोबा व पोलिस पाटील साहेबराव वाघमारे यांच्याकडे शिक्षणासाठी राहत होता. वर्गातील पहिल्या रांगेत बसणारा व हुशार विद्यार्थी अशी त्याची ओळख होती. बुधवारी तो दुपारच्या वेळी शाळेत आला. शाळा भरण्याला काही अवधी असल्याने तो खेळत होता. शाळेच्या पाठीमागील भागात असलेल्या संरक्षक भिंतीवरुन उडी मारून जात असताना संरक्षक भिंतीवरील सळया त्याच्या पोटात आरपार घुसल्या. इतर विद्यार्थ्यानी आरडाओरड केल्याने शाळेतील शिक्षक धावत आले. त्यांनी त्याला भिंतीवरुन काढून तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. तेथे डाॅ. पी.बी.चव्हाण यांनी त्याच्यावर उपचार सुरु केले. तथापि उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. जगदीशच्या मृत्यूला शाळा प्रशासन जबाबदार असून शाळेवर कडक कारवाई केल्याशिवाय त्याचे शवविच्छेदन होऊ देणार नाही अशी भूमिका त्याच्या नातेवाइकांनी घेतली. या घटनेचे वृत्त समजताच उपविभागीय पोलिस अधिकारी मुदीराज, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, उपशिक्षणाधिकारी बंडू आमदूरकर आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

X