आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पात्र विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती पाच वर्षांपासून प्रलंबित; बैठक समाजकल्याण विभागाला शिष्यवृत्ती अदा करण्याचे निर्देश

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- सन २०१३-१४ या शैक्षणिक वर्षापासून काही महाविद्यालयातील पात्र विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित आहे. अशा शिष्यवृत्ती प्रलंबित असलेल्या पात्र विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्यांना त्वरित द्यावी, ती देताना येत असलेल्या तांत्रिक किंवा इतर अडचणींचे तत्काळ निराकरण करावे, यासंदर्भात संबंधित महाविद्यालयांकडून आवश्यक ती कार्यवाही करून शासनाकडे पाठवल्या जाव्यात, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सामाजिक न्याय विभागाला दिल्या आहेत. 

 

जिल्ह्यातील बहुतांश महाविद्यालयांनी त्यांच्या महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाइन सादर केलेले नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक घेऊन सर्व प्राचार्यांना त्यांच्या महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाइन भरून तत्काळ सादर करावे, जेणेकरून विद्यार्थ्यांना वेळेत शिष्यवृत्ती मिळेल, असे आदेश दिले आहेत. गुरुवारी दुपारी झालेल्या बैठकीत हे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. 

 

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी समाजकल्याण विभाग आणि तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) महाविद्यालय आणि जिल्ह्यातील इतर महाविद्यालयांच्या प्राचार्यांसह शिष्यवृत्ती अर्जांसंदर्भात बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त पांडुरंग वाबळे हेही उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील बहुतांश महाविद्यालयांच्या प्राचार्यांची या वेळी उपस्थिती होती. 

 

विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, त्यासाठी महाविद्यालयांनी त्यांचे अर्ज दाखल करून घ्यावेत आणि तपासून पात्र अर्ज तत्काळ प्राचार्यांमार्फत समाजकल्याण विभागाकडे सादर करावेत. एकगठ्ठा अर्ज सादर करण्याची वाट न पाहता जसजसे विद्यार्थ्यांचे अर्ज येतील त्याप्रमाणे तत्काळ कार्यवाही करा. कोणत्याही परिस्थितीत महाविद्यालयांच्या पातळीवर अर्जांची प्रलंबितता ठेवू नका, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी प्राचार्यांना यावेळी दिल्या. काही प्राचार्यांनी ऑनलाइन अर्ज भरताना अडचणी येत असल्याचे सांगितले. त्यावर विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्यांना वेळेवर मिळावी, यासाठी महाविद्यालयांनी यासंदर्भातील कार्यवाही वेळेवर करावी. तांत्रिक बाबींची अडचण येत असेल, तर उच्चशिक्षण, तंत्रशिक्षण आणि सामाजिक न्याय विभागाच्या संबंधित वरिष्ठांशी पाठपुरावा करून तसेच अभ्यासक्रमासंदर्भातील विषय असेल, तर विद्यापीठाशी पाठपुरावा करून तो विषय मार्गी लावावा, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीअभावी अडचणींचा सामना करावा लागत आहे. 


जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक घेऊन सर्व प्राचार्यांना त्यांच्या महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाइन भरून तत्काळ सादर करण्याचे निर्देश दिले. 

 

प्रलंबित प्रकरणांचा आढावा 
महाविद्यालयातील पात्र विद्यार्थ्यांना काही अडचणींमुळे पात्र असूनही शिष्यवृत्ती मिळण्यास अडचणी येत आहेत. महाविद्यालयनिहाय अशी किती प्रकरणे आहेत, कोणकोणत्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालेली नाही, ती का मिळालेली नाही, याचा आढावा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी या बैठकीत घेतला. त्यानंतर प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांची शिष्यवृत्ती त्वरित अदा करावी, ऑनलाइन अर्ज त्वरित भरावेत, असे आदेश त्यांनी समाजकल्याण विभाग व प्राचार्यांना दिले. 

 

तक्रारींनाही मिळेना उत्तर 
जिल्ह्यातील बहुतांश महाविद्यालयांतील पात्र विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित आहे. समाजकल्याण विभागाकडे चौकशीला गेले असता महाविद्यालयात चाैकशी करा, महाविद्यालयात चौकशी केली असता समाजकल्याण विभागात जाऊन विचारा, अशी उत्तरे विद्यार्थ्यांना ऐकायला मिळतात. काही विद्यार्थी संघटनांनी याबाबत वारंवार तक्रारी व आंदोलने करूनही विद्यार्थ्यांना न्याय मिळत नव्हता. त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी बैठक घेऊन आता स्पष्ट सूचना दिल्या आहेत.